आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मान्सूनच्या तोंडावर पाणी पेटले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तीन-तीन, चार-चार दिवस पाणी मिळत नसल्याने शहरातील जलसंकट कायम असल्याचे दिसून येते. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी दोन ठिकाणी आंदोलन केले. पुंडलिकनगर परिसरातील नागरिकांनी तेथील जलकुंभावर पालिका अधिकार्‍यांना घेराव घातला, तर मसनतपूर येथील रहिवाशांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला.

पुंडलिकनगर, हनुमाननगर, मातोर्शीनगर, न्यायनगर, हुसेन कॉलनी, गजानन कॉलनी या भागांना 29 मेपासून चौथ्या दिवशी पाणी मिळत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील दीडशेवर नागरिक सकाळी पुंडलिकनगर कुंभावर जमा झाले होते. पालिका अधिकार्‍यांना तेथे बोलवा, अशी त्यांची मागणी होती. तेथे उपस्थित असलेल्या कर्मचार्‍याला जमावाने घेराव घातला. एक दिवसाआड पाणी सोडणार नसाल तर दररोज कुंभावर मोर्चा काढू, अशी धमकी त्यांनी कर्मचार्‍याला दिली. जमावातील काहींनी कर्मचार्‍यांना शिवीगाळही केली. मसनतपूर, शहानगर आदी भागांतही हीच समस्या आहे. येथे कामगार वर्ग वास्तव्यास आहे. सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत ही मंडळी कामानिमित्त घराबाहेर राहतात. चार ते पाच दिवस पाणी येत नसल्यामुळे रात्रभर त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे बुधवारी त्यांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला. स्थायी समितीचे माजी सभापती राजू शिंदे, नगरसेवक संजय चौधरी यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

मसनतपूर आणि पुंडलिकनगर येथील आंदोलकांनी महापौर अनिता घोडेले यांच्या उपस्थितीत कार्यकारी अभियंता सखाराम पानझडे यांच्याशी चर्चा केली. पुंडलिकनगरला एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन पानझडे यांनी दिले तर मसनतपूर येथील नागरिकांनी अधिकृत जोडण्या घेतल्यास तेथेही पुरवठा सुरळीत केला जाईल.