आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समांतरकडून 'टाटा'ला ६०० कोटींचे कंत्राट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समांतर कंपनीकडून पाणीपुरवठ्यासाठी मुख्य पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेतले जात नसल्याने नागरिकांसह राजकीय कार्यकर्ते तसेच नगरसेवकांकडून टीका होत होती. मात्र, आता ही प्रतीक्षा संपणार असून जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य पाइपलाइन टाकण्यासाठी टाटा कंपनीला गुरुवारी ६०० कोटी रुपयांचे टेंडर देण्यात आले आहे.

सप्टेंबर २०१४ पासूनच समांतरने पाणी वितरणाचे काम सुरू केले आहे. मात्र, ही योजना स्वतंत्रपणे सुरू करण्यासाठी मुख्य पाइपलाइन टाकण्यात आली नाही. समांतरकडून हे कामच केले जात नसल्याचा आरोप करण्यात येत होता, तर समांतरला आपले बिऱ्हाड गुंडाळावे लागणार असल्याची चर्चा सुरू असतानाच समांतरने पाइपलाइनचा आराखडा तयार करून त्यानुसार २० दिवसांपासून टेंडर प्रक्रिया राबवली होती. या टेंडरला चार कंपन्यांनी प्रतिसाद दिला. हे टेंडर मुंबई येथील कार्यालयातून काढण्यात आले होते. सर्वात कमी टेंडर टाटा प्रोजेक्ट या कंपनीने भरल्याने त्यांना हे काम देण्यात आले. ६०० कोटी रुपयांचे हे टेंडर असून कामाचा अवधी हा प्रत्यक्ष काम करण्याच्या दिवशी ठरवण्यात येणार आहे.

दोन हजार मिमीची असणार पाइपलाइन : जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ५० किमी पाइपलाइनसाठी दोन हजार मिमी व्यासाचे पाइप लागणार आहेत. पूर्वीची पाइपलाइन १२०० मिमी व्यासाची आहे. ही पाइपलाइन एमएस प्रकारची असेल. पुढील कामासाठी १२०० ते १०० मीमी व्यासाचे पाइप वापरले जाणार आहेत.

काय आहे एमएस पाइप ? : माइल्ड स्टील पाइप म्हणून ओळखळ्या जाणा-या पाइपमध्ये गंजविरोधी तंत्रज्ञान वापरले आहे. या पाइपचे आयुष्य ७० वर्षांपेक्षा जास्त असते. पुढील दहा वर्षांतील वाढीव लोकसंख्या लक्षात घेऊन हे पाइप वापरले जाणार आहेत.

पुढील महिन्यात कामाला सुरुवात
गुरुवारी टाटा कंपनीला पाइपलाइन टाकण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. पुढील महिन्यात कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
अर्णब घोष, प्रकल्प संचालक, समांतर
बातम्या आणखी आहेत...