आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर 'स्मार्ट सिटी' स्पर्धेतून औरंगाबाद शहर होईल बाद, खा. खैरे यांचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कचरा विल्हेवाटीचा प्रकल्प झाला नाही तर स्मार्ट सिटी योजनेतून औरंगाबाद रद्द होईल, असा दावा खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी आपण औरंगाबादच्या प्रगतीचे विरोधक आहोत काय, याचा गांभीर्याने विचार करावा, असेही म्हणताना औरंगाबादच्या नावावर लाल फुली मारली गेली तर पिंपरी-चिंचवडसाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी धरलेला आग्रह मान्य होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद-अहमदनगर रस्त्यावरील तिसगाव येथे खदानीसाठी डोंगर पोखरल्याने भला मोठा खड्डा तयार झाला आहे. तेथे नारेगावातील कचरा स्थलांतरित करावा. तेथेच कचऱ्यातून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारावा, असा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी खैरे यांनीच वरिष्ठ स्तरावर बैठकांचे सत्र सुरू केले आहे. याची माहिती मिळताच तिसगावचे ग्रामस्थ सक्रिय झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत तिसगावला डेपो होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. काँग्रेस आणि पँथर्स रिपब्लिकननेही त्यांना पाठिंबा दिल्याने डेपो प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे.

या संदर्भात खैरे म्हणाले की, नारेगावचा डेपो हलवण्याचे आदेश न्यायालयानेच दिले आहेत. पर्यायी जागा शोधण्याचे अनेक प्रयत्न महापालिकेने केले. परंतु प्रत्येक ठिकाणी विरोधच होत आहे. स्मार्ट सिटी योजनेत कचऱ्याच्या विल्हेवाटीचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तिसगाव येथील खदानीत कचरा टाकून वीजनिर्मिती प्रकल्प उभारावा, यासाठी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. त्यांनी केलेल्या पाहणीत तिसगावची खदान योग्य जागा असल्याचे निदर्शनास आले. खदानीत तीन वर्षे औरंगाबादचा कचरा साठू शकतो, एवढी जागा आहे. त्याचा तिसगावकरांना कोणताही त्रास होणार नाही, असेही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात म्हटल्याचा दावा खैरे यांनी केला. काही मंडळी खदानीनजीकच्या भूखंडांवर डोळा ठेवून विरोध करत आहेत. तिसगाव किंवा अन्य कुठेही प्रकल्प तर उभा करावाच लागणार आहे. त्याला पर्यायच नाही.

आता बोला समांतरवर
गेलीतीन वर्षे माझ्यावर समांतर योजनेमुळे टीकास्त्र सोडण्यात आले. त्यात माझ्या पक्षाचे, इतर पक्षांचे आणि प्रसारमाध्यमेही समाविष्ट आहेत. ही योजना होणारच नाही, असेही म्हटले जात होते. पण अखेर पाइप आले. ते टाकण्याचे काम सुरू असताना पाहणी केली जात आहे. आता विरोधकांनी समांतरवर बोलावे, असे आव्हान खैरे यांनी दिले. योजना पूर्ण करून घरोघरी मुबलक पाणी देण्यासाठीही मीच पाठपुरावा करणार असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

...अन्यथा पिंपरी- चिंचवड
काही दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन पिंपरी- चिंचवडचा स्मार्ट सिटीत समावेश करा, असा आग्रह धरला आहे. नारेगावचा कचरा डेपो स्थलांतरित केला नाही आणि कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित केला नाही तर स्मार्ट सिटी योजनेतून औरंगाबाद एकाच क्षणात वगळले जाईल. आणि तेथे पिंपरी- चिंचवडचे नाव झळकेल, असेही खैरे म्हणाले. वीजनिर्मिती प्रकल्पाचा ठेका कुणाला देणार? त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे काय? तयार होणाऱ्या विजेचा फायदा महापालिकेला होणार का? या प्रश्नांची उत्तरे सध्या देता येणार नाहीत. मात्र, त्या दिशेने पावले टाकली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. मात्र, प्रति किलो एक रुपया या दराने ठेकेदाराला रक्कम द्यावी लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.