आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांची कोंडी - सोनोग्राफीसाठी घाटीत महिनाभर वेटिंग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - डॉक्टरांच्या बंदमुळे सोनोग्राफी, गर्भधारणेच्या तपासणीसाठी घाटीत येणार्‍यांची संख्या वाढली आहे. मात्र, तपासणीसाठी एकच मशीन असल्याने रुग्णांना किमान महिनाभर वेटिंगवर रहावे लागत आहे. एमसीआयच्या नियमानुसार प्रसूती विभागात सोनोग्राफी मशीन्स ठेवणे बंधनकारक असताना येथील मशीन्स रेडिओलॉजी विभागात स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, डॉक्टरांनी बंद मागे घेतल्याने काही दिवसांनंतर ही वेटिंग कमी होण्याची शक्यता आहे.
केवळ एफ फॉर्मच्या तांत्रिक चुकांसाठी खासगी सोनोग्राफी सेंटर सील करण्यात आल्याचा निषेध करत, जोपर्यंत मागण्यांचा विचार होत नाही तोपर्यंत सोनोग्राफी, वैद्यकीय गर्भपात व कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय मंगळवारपासून स्थगित करण्यात आला होता. त्याचा परिणाम म्हणून घाटीच्या स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागामध्ये रुग्णांची संख्या दुपटीने वाढली. संघटनेच्या निर्णयाची कल्पना नसल्यामुळे मंगळवारी आधी खासगी, नंतर घाटी अशी रुग्णांची धावपळ झाली. त्यात बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) वेळ संपून अनेक रुग्णांना उपचारांपासून वंचित राहावे लागले, तर बाहेरगावच्या रुग्णांना सक्तीच्या मुक्कामाचा भुर्दंडही सोसावा लागला. बुधवारी परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचे स्पष्ट झाले. सोनोग्राफी, गर्भपातासाठी फार मोठी गर्दी उसळली होती. ओपीडी क्रमांक 114, 115, 108 मध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्याचे दिसून आले. 114-115 च्या बाहेरपर्यंत महिलांच्या रांगा होत्या.
दोन वर्षांपासून मशीनच नाही - वैद्यकीय विद्यार्थ्यांना स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र शिकवले जाते. या विभागात सोनोग्राफी मशीन असणे आवश्यक आहे. स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात व लेबर रूममध्येही सोनोग्राफी मशीन्स आवश्यक आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून या विभागातील मशीन्स इतरत्र हलवण्यात आल्या आहेत. एखाद्या गर्भवतीची तातडीने सोनोग्राफी करण्याची गरज असल्यास ती विभागात होऊ शकत नाही व यामुळे रुग्णाच्या जिवाला कधीही धोका होऊ शकतो.
विद्यार्थ्यांचे नुकसान : सोनोग्राफीसारखे उपकरण प्रत्यक्ष हाताळल्याशिवाय शिकणे अशक्य असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत असल्याची चर्चाही दबक्या आवाजात होत आहे. स्त्रीरोग विभाग दुसर्‍या मजल्यावर असून त्यांना सोनोग्राफीसाठी तळमजल्यावर यावेच लागते. त्यात कधी लिफ्ट सुरू असते, तर कधी बंद असते. लिफ्ट बंद असताना तर नवव्या महिन्याच्या गर्भवतीलाही मोठा त्रास व धोका पत्करत दोन जिने उतरावे-चढावे लागतात.
दीड महिना वेटिंग : घाटीतील पाचपैकी तीन सोनोग्राफी मशीन्स अनेक दिवसांपासून बंद आहेत, तर एक मशीन मंगळवारी बंद पडल्यामुळे एकमेव मशीनवर सगळा ताण आला आहे. एक-दोन मशीनवरच सगळा ताण असल्याने गर्भवतींसह इतर रुग्णांना सोनोग्राफी करण्यासाठी एक ते दीड महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागते. तातडीच्या सोनोग्राफीसाठीही आठ-आठ दिवस प्रतीक्षा करावी लागते, अशा रुग्णांच्या तक्रारी आहेत. रुग्णाची प्रकृती गंभीर झाली तर प्रत्यक्ष डॉक्टर आल्याशिवाय सोनोग्राफी होऊ शकत नाही.