आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेची आरोग्य सेवा वांझोटी; घाटी जेरीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरवासीयांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेवर असताना पालिकेची 22 आरोग्य केंद्रे आणि 5 रुग्णालयांत मिळणार्‍या सुमार आरोग्य सेवा व डॉक्टरांच्या अपुर्‍या संख्येमुळे येथील रुग्णांचे लोंढे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) येत असल्याने घाटी रुग्णालयाचे प्रशासन जेरीस आले आहे. डॉक्टरांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांवर प्रचंड ताण पडत आहे. परिणामी शिक्षण, संशोधन व सुपरस्पेशालिटी या मूळ उद्दिष्टांना हरताळ फासला जात आहे.

शहरात पालिकेची 22 आरोग्य केंद्रे व पाच रुग्णालये आहेत. यापैकी केवळ पाचच ठिकाणी नैसर्गिक प्रसूतीची सुविधा आहे तर काही ठिकाणी अल्प प्रमाणात उपचार होतात. मात्र कोणत्याही ठिकाणी सिझेरियन प्रसूती होत नाही. एन-11 मधील रुग्णालयातील एकमेव सोनोग्राफी मशीनही वर्षभरापासून बंद आहे. गरोदर महिलांना सोनोग्राफीसाठी घाटीतच पाठवले जाते; पण घाटीतील एकमेव सुरू असलेल्या मशीनवर 15 ते 25 दिवस ‘वेटिंग’ आहे. त्यामुळे शहरवासीयांचे हाल होत आहेत. शहरातील आरोग्य केंद्रांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. रोशनगेटसारख्या दोन-दोन मजली आरोग्य केंद्रात पेव्हिंग ब्लॉक्सपासून भव्य इमारतीपर्यंत सर्व काही तयार आहे. मात्र अनेक केंद्रांतील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तास-दोन तासानंतर गायब होतात. सकाळी नऊ ते दुपारी एक अशी वैद्यकीय सेवा देण्याची वेळ असली तरी बरेच अधिकारी-कर्मचारी साडेदहा-अकरानंतर येतात. बारा-साडेबारापर्यंत सर्व काही आटोपून सामसूम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे एकाही केंद्रात तसेच रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रिया होत नसल्याने प्रसूतीसाठी महिलांना नाइलाजास्तव घाटीतच न्यावे लागते.

घाटीतील 40 टक्के रुग्ण शहरातील : पालिकेच्या 27 केंद्रांत पुरेसे उपचार मिळत नसल्यानेच रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते.ही संख्या सुमारे 40 टक्के आहे. त्यात गॅस्ट्रो, मलेरिया, टायफॉइडच्या रुग्णांचा समावेश आहे. मनपा रुग्णालयातील कर्मचारी रुग्णांना परस्पर घाटीत जाण्यास सांगतात. घाटीत प्रसूतीच्या रुग्णांची संख्याही अधिक असून दररोज सुमारे 50 ते 60 महिला प्रसूत होतात. यातील 8 ते 10 केसेस सिझेरियन प्रसूतीच्या असतात. विशेष म्हणजे दोन - अडीच वर्षांपूर्वी घाटीतील प्रसूतीचे प्रमाण हे 30 ते 40 असे होते. पालिकेची केंद्रे-रुग्णालये पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्यानेच घाटीतील प्रसूतीचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घाटीमध्ये दररोज 15 ते 20 केसेस या ‘डॉगबाईट’च्या असतात. यातील 50 ते 70 टक्के रुग्ण शहरातीलच असतात. महापालिकेच्या केंद्रांमध्ये डॉगबाईटचेही पूर्ण उपचार होत नाहीत. या पार्श्वभूमीवर घाटीमध्ये साध्या केसेस हाताळायच्या की गंभीर, गुंतागुंतीच्या केसेस हाताळायच्या की विद्यार्थ्यांना शिकवायचे, असा प्रश्न घाटीच्या प्राध्यापकांनी उपस्थित केला आहे.
गरोदर महिलांची दैना - पालिकेच्या मोजक्या रुग्णालयांमध्येच गर्भपात केला जातो. शिवाय या रुग्णालयांमध्ये केवळ पहिल्या तीन महिन्यांतील गर्भपात होतात. त्यापुढील गर्भपातासाठीचे रुग्ण पुन्हा घाटीकडे पाठवले जातात. बहुतांश केंद्रांमध्ये गर्भपात होत नसल्याने व स्त्री भ्रूणहत्या विरोधी मोहीम कठोरपणे राबवली जात असल्याने खासगी रुग्णालयांमध्येही गर्भपातासाठी टाळाटाळ केली जात आहे. मुळात घाटीमध्ये रुग्णांची संख्या खूप जास्त असल्याने व त्यातच गर्भपातासाठी अधिक ताण वाढल्याने महिलांची कुचंबणा होत आहे. घाटीमध्ये एकच सोनोग्राफी मशीन सुरू असल्याने महिना-पंधरा दिवस वेटिंग असते. त्यातच स्त्री भ्रूणहत्याविरोधी मोहीम राबवताना पालिकेने पर्यायी व्यवस्था न केल्याने सोनोग्राफीसाठी घाटीत जणू जत्रा भरते.
अधिकारी खासगी व्यवसायात मग्न - पालिकेचे बहुतांश वैद्यकीय अधिकारी खासगी वैद्यकीय व्यवसायात मग्न आहेत. त्यामुळेच सकाळी तास-दोन तास येऊन बाकी सगळा वेळ खासगी व्यवसायाला देतात. पालिकेच्या केंद्र किंवा रुग्णालयात दुपारनंतर कोणीही वैद्यकीय अधिकारी व तातडीची सेवाही मिळत नाही.
‘ओव्हरलोड’मुळे दज्रेदार सेवा अशक्य - शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय नाही. शिवाय पालिकेची आरोग्य केंद्रे व रुग्णालयांमध्ये पुरेशी आरोग्यसेवा मिळत नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम घाटीवर होतो. दररोज 1500 पेक्षा अधिक रुग्ण येतात. या 500 रुग्णांच्या अतिरिक्त ताणामुळे दज्रेदार आरोग्य सेवाही देता येत नाही. गंभीर-गुंतागुंतीच्या केसेस हाताळल्या तरच विद्यार्थ्यांना शिकता येते. मात्र सामान्य केसेसमध्येच वेळ जात असेल तर संशोधनाला वेळ मिळणार कसा?’’ डॉ. के. एस. भोपळे, अधिष्ठाता, घाटी
सुधारणांसाठी आमचे प्रयत्न सुरू - पाच रुग्णालयांमध्ये नैसर्गिक प्रसूती होतात. 22 केंद्रांमध्ये होत नाहीत. एन-11 मधील सोनोग्राफी मशीन बंद पडली आहे. रेडिओलॉजिस्टही नाही. निधी कमी पडतो. त्यामुळे डॉक्टर टिकत नाहीत. तरीही राष्ट्रीय आरोग्याचे सर्व कार्यक्रम, लहान मुलांचे लसीकरण, जननी सुरक्षा योजना व इतर उपचार, शालेय आरोग्य तपासणी, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, असे उपक्रम राबविले जातात. अनेक सुधारणांसाठी प्रयत्न सुरू आहेत.’’ डॉ. संध्या टाकळीकर, आरोग्य अधिकारी, महापालिका.
पालिकेचे 250 खाटांचे रुग्णालय कागदावरच - शासकीय रुग्णालयावरील ताण कमी व्हावा यासाठी 2007 मध्ये मध्यवर्ती जकात नाक्याला लागून 250 खाटांचे रुग्णालय उभारण्याची घोषणा तत्कालीन महापौर डॉ. भागवत कराड यांनी केली होती. तेथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होणार असा गाजावाजा केला गेला. या रुग्णालयात घाटी रुग्णालयाच्या तोडीचे उपचार होणार, असा दावाही करण्यात आला होता. जागाही उपलब्ध होती. मात्र यास काहींचा विरोध झाला. दरम्यानच्या काळात डॉ. कराड यांचा कालावधी संपल्यानंतर याकडे कोणीही लक्ष दिले नाही.