आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांततेत व्यक्त झाला संताप; कडकडीत बंद, स्फोटाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय एकवटले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बुद्धगया येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या निषेधार्थ सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने दिलेल्या बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरवासीयांनी अतिरेकी कारवायांविरुद्ध शांततेत संताप व्यक्त केला. दुपारपर्यंत शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, महाविद्यालये, शाळा, रिक्षा बंद होत्या. सकाळी 11 वाजता पैठण गेट येथून विभागीय आयुक्तालयावर दणदणीत मोर्चा काढण्यात आला. त्यात हजारो नागरिक सहभागी झाले. दरम्यान, काही मोर्चेकर्‍यांनी निराला बाजारात सुरू असलेल्या केएफसी हॉटेल, पालिका मुख्यालयाजवळील काही गॅरेजवर दगडफेक केली.

व्यापारी महासंघाच्या आवाहनानुसार व्यापार्‍यांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली. शिवाय, स्थानिक कार्यकर्तेही सकाळपासून बंदसाठी सक्रिय झाले होते. त्यामुळे सकाळी 10 वाजताच गजबजणार्‍या गुलमंडीवर दुपारी तीन वाजेपर्यंत फक्त वाहने धावत होती. पैठणगेट, क्रांती चौक अशा दोन ठिकाणांहून मूक मोर्चा निघाला. काही युवकांनी केंद्र सरकार, अतिरेक्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मोर्चात एका ट्रकमध्ये भगवान गौतम बुद्धांची भव्य मूर्ती होती. तिच्यासमोर भिक्खू प्रार्थना करत होते.

दोन वर्षांतील उत्स्फूर्त बंद
दोन वर्षांत शहरात जे बंद पाळण्यात आले त्यात आज झालेल्या बंदला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. महागाईच्या विरोधात डाव्या पक्षांनी 20 सप्टेंबर 2012 रोजी औद्योगिक बंद पुकारला होता. 25 सप्टेंबर 2013 रोजी महागाई व खासगीकरणाच्या धोरणाविरुद्ध बंद पाळण्यात आला. भाजप-शिवसेनेने दोन वेळा, तर बँका व इतर संघटनांनी एक वेळा, तसेच अयोध्येचा निकाल लागल्यानंतर भीतीपोटी बंद पाळला होता. बुधवारच्या बंदला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. बंददरम्यान शहरातील 80 टक्के बाजारपेठ बंद होती. मोर्चात सहा ते साडेसहा हजार लोक सहभागी झाल्याची नोंद पोलिसांनी घेतली.

यांना झाली अटक
अभिजीत सीताराम खरात, किरण भास्कर मोरे, कुणाल गौतम खरात, विजय काशीनाथ जाधव, आशिष अशोक कांबळे, सचिन रतन शिंदे, संदीप भाऊसिंग लष्करे, नारायण जनार्दन बनसोडे आणि संदीप हरिदास ससाणे यांना दगडफेक प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याविरुध्द दंगा करुन बेकायदेशीर जमाव जमून मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग
मोर्चात शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल, काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, शहराध्यक्ष मुश्ताक अहेमद, प्रदेश सरचिटणीस कदीर मौलाना, माजी महापौर मनमोहनसिंह ओबेरॉय, रशीद मामू, डॉ. भागवत कराड, माजी मंत्री गंगाधर गाडे, बसवराज मंगरुळे, विजय साळवे, मनोज भारस्कर, मनसेचे शहराध्यक्ष सुमीत खांबेकर, राज वानखेडे, ज्ञानेश्वर डांगे, गौतम आमराव, प्रा. ऋषीकेश कांबळे, मुकुंद सोनवणे, प्रशांत शेगावकर, मिलिंद दाभाडे, रतनकुमार पंडागळे, गौतम खरात, गौतम लांडगे, बाबूराव कदम, अमित भुईगळ, गोपाळ कुलकर्णी, बंडू ओक, मिलिंद पाटील, सुभाष जाधव, संजय उबाळे, प्रकाश जावळे, कृष्णा बनकर, दिनकर ओंकार, दौलत खरात, बाबूराव कदम, मिलिंद शेळके, सुरेश इंगळे, शब्बू लखपती, प्रशांत शेगावकर, संजय ठोकळ, पंडित नवगिरे, उत्तम अंभोरे, सिध्दार्थ दाभाडे, विजय मगरे, पंकज बोडे, सर्जेराव मनोरे, मंगल खिंवसरा, प्राचार्या वैशाली प्रधान, अँड. मनोहर टाकसाळ, कॉ. उद्धव भवलकर, बुद्धीनाथ बराळ, आदींचा सहभाग होता.

आपण सर्व एक आहोत
सर्वच पक्ष, संघटनांनी मोर्चात सक्रिय सहभाग नोंदवल्याने हा मोर्चा यशस्वी झाला. आम्ही सर्वांचे ऋणी आहोत. बुद्धगयेवरील हल्ला हा भारताच्या संस्कृतीवरील हल्ला आहे. त्यासाठी सर्वधर्मीय, पंथीयांनी एकत्र येण्याची गरज होती. आपण सर्व एक आहोत, हे या निमित्ताने अधोरेखित झाले.
-गौतम खरात, संयोजन समिती सदस्य.

विभागीय आयुक्तही निषेधाच्या घेर्‍यात
विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल दोन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पुण्याला गेले आहेत. त्यामुळे मोर्चाच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारण्यासाठी उपायुक्त विजयकुमार फड सामोरे आले. मात्र, जयस्वाल मुद्दाम आले नाहीत, असा समज झाल्याने काही युवकांनी त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. भन्ते विशुद्धानंद बोधी, गौतम लांडगे आदींनी मध्यस्थी केल्यानंतर शांत झाले.

महिलांचा लक्षणीय सहभाग
मोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग होता. घोषणाबाजीमध्ये त्या मागे नव्हत्या. तरुणांची अधिक गर्दी असलेल्या या मोर्चात युद्ध नको, बुद्ध हवा तसेच स्फोट घडवणार्‍यांना फाशी द्या, असे फलक झळकत होते. महिलांनीही हाती पंचशील झेंडे आणि फलक घेतलेले दिसत होते.