आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व पक्षांची एकजूट; बंद संमिश्र, वाळूजगावात कोणताही परिणाम नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळूज- बुद्धगया येथील बॉम्बस्फोटप्रकरणाचा निषेध करण्यासाठी बुधवारी आयोजित सर्वपक्षीय बंदला वाळूज महानगरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बजाजनगर आणि पंढरपूर मुख्य मार्गावरील बाजारपेठ बंद होती. रांजणगाव शेणपुंजीत शंभर टक्के बंद पाळण्यात आला.

वाळूज गावातील सर्व व्यवहार मात्र सुरळीत सुरू होते. तेथे बंदचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. बंद शांततेत पार पडला. यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. महाराणा प्रताप चौकात घेण्यात आलेल्या निषेध सभेत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त क रून बॉम्बस्फोट घडवणार्‍या अतिरेक्यांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

बिहारमधील बुद्धगया येथे 7 जुलै रोजी बॉम्बस्फोट करण्यात आले. अतिरेक्यांच्या या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध म्हणून कॉँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष व इतर संघटनांच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला होता. व्यापार्‍यांनीही बाजारपेठ बंद ठेवून घटनेचा निषेध केला. बजाजनगरातील मोहटादेवी चौक, महाराणा प्रताप चौक, मोरे चौक, इंद्रप्रस्थ कॉलनी, क ोलगेट चौक परिसरातील क ाही दुकाने बंद होती, तर जागृत हनुमान परिसरातील बहुतेक दुकाने उघडी होती.

पंढरपुरात बंदचा परिणाम : नगर-औरंगाबाद महामार्ग सकाळपासूनच बंद होता. मुख्य मार्गासह रांजणगाव शेणपुंजीच्या जुन्या मार्गावरील काही दुकाने वगळता बहुतांश दुकाने बंद होती. अनेक भागांत स्वयंस्फूर्तीने आपापले व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर परिसरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती.

गावातील व्यवहार सुरळीत : वाळूज गाव व परिसरातील व्यवहार पूर्णपणे सुरळीत सुरू होते. येथील कापड बाजार, सराफ बाजार, झेंडा मैदान परिसर, कमलापूर मार्ग, कै. जीवनलाल पाटणी मार्ग, मुख्य महामार्गावरील सर्व प्रतिष्ठाने नेहमीप्रमाणे गजबजलेली होती.


रांजणगावात कडकडीत बंद
रांजणगाव शेणपुंजी येथे सर्वपक्षीय बंदला 100 टक्के प्रतिसाद मिळाला. तेथील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बंदच्या पूर्वसंध्येला व्यावसायिकांची बैठक घेऊन त्यांना बंदबाबत कल्पना दिली होती. त्यामुळे येथील दुकानदारांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवले. सायंकाळी साडेपाचपर्यंत सर्व व्यवहार ठप्प होते.

महाराणा प्रताप चौकात निषेध सभा
महाराणा प्रताप चौकात बुद्धगयेतील स्फोटप्रकरणी सकाळी 9 वाजेच्या सुमारास निषेध सभा घेण्यात आली. या सभेत बॉम्बस्फोटाच्या घटनेचा वक्त्यांनी तीव्र निषेध केला. संजय मिसाळ, विलास पठारे, अर्जुनराव गालफाडे, सुखदेव सोनवणे, अनिल जाभाडे, जनार्दन निकम पाटील, शशिकांत ढमढेरे, अनिल चोरडिया, संजय सांभाळकर, भीमा साबळे यांची उपस्थिती होती.