आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धगयेतील बॉम्बस्फोटांच्या निषेधार्थ औरंगाबादेत आज ‘बंद’; आरोग्यसेवा वगळली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बुद्धगया येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या निषेधार्थ सर्वपक्षीय संघटनांतर्फे बुधवारी ‘औरंगाबाद बंद’ची हाक देण्यात आली आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासह सर्व राजकीय पक्ष यात सहभागी होणार असल्याने हा बंद यशस्वी होईल, असा दावा संयोजकांनी केला. बंदचा परिणाम शाळा, बाजारपेठांवर होणार असून एमफिलची परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. औषधी दुकाने आणि रुग्णालयांना बंदमधून वगळण्यात आले आहे.

बंदमध्ये सर्वच राजकीय पक्षांसह व्यापारी महासंघ, पेट्रोल डीलर्स असोसिएशन, रिक्षा संघटना, खासगी प्रवासी बसचे चालक, सिनेमाचालकही सहभागी झाल्याने शहरातील बस, रिक्षा, सिनेमागृहे बंद राहणार आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत बाजारपेठ बंद राहणार आहे. महाविद्यालयेही बंद राहणार असून शहरातील शाळा बंद ठेवण्यात याव्यात, असे पत्र शाळांना देण्यात आले असल्याचे संयोजक आमदार प्रदीप जैस्वाल, भाजपचे शहराध्यक्ष भगवान घडामोडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अँड. सय्यद अक्रम, राष्ट्रवादीचे मुश्ताक अहेमद, गंगाधर गाडे, गौतम खरात, मनमोहनसिंग ओबेराय यांनी कळवले आहे. बस तसेच रिक्षाही बंद राहणार असल्याने शाळेतच कोणी जाणार नाही, असा दावाही करण्यात आला आहे. सकाळच्या सत्रातील साफसफाई सुरू राहील.

आयुक्तालयावर मोर्चा
सकाळी 11 वाजता पैठण गेट येथून मोर्चाला सुरुवात होईल. काळ्या फिती लावून नागरिक यात सहभागी होतील. टिळक पथ, गुलमंडी, सुपारी हनुमान, सिटी चौक, शहागंज उद्यान आणि तेथून जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे हा मोर्चा विभागीय आयुक्तालयावर पोहोचेल. सभेनंतर विभागीय आयुक्तांना निवेदन दिले जाईल.

भिक्खू संघाचे आवाहन
पक्षविरहित मोर्चा काढण्यात येणार असून त्यात आंबेडकरी जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन भदंत सरणाकर महाथेरो, अध्यक्ष भदंत बोधिपालो महाथेरो, भदंत विशुद्धानंद महाथेरो, भदंत कश्यपथेरो यांनी केले.

एम.फिल.परीक्षा 15 जुलैला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध शाखांची एम.फिलची प्रवेश परीक्षा बंदमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी विद्यापीठ बंद राहणार असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला असून ही परीक्षा 15 जुलैला (सोमवार) होईल.