आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Co Missioner Talking Rudely With People In Office

धुळ्याहून माणसे आणून हातपाय तोडीन, मनपा आयुक्त महाजनांची भाजप गटनेत्याला धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘तू स्वत:ला काय समजतोस? काही समज आहे की नाही... माझ्यामागे कुणी नाही, असे समजू नका. मी पण धुळ्याहून माणसे आणून हातपाय तोडीन,' अशा शब्दांत मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांनी भाजपचे गटनेते संजय केणेकर यांना सुनावले.
मनपा कर्मचारी निवेदन देत असल्याची छायाचित्रे काढणाऱ्या दैनिकांच्या छायाचित्रकारांना पाहून संतापलेल्या आयुक्तांनी ‘हाकला रे यांना आधी’ असे सुनावत बाहेर काढल्याने संतापलेल्या केणेकरांनी जाब विचारताच जोरदार खडाजंगी उडाली. केणेकरांनी नंतर पोलिस ठाण्यात तक्रार करीत संरक्षणाची मागणी केली, तर आयुक्तांनी पोलिस बंदोबस्तात मनपा सोडली. दरम्यान, पत्रकार व छायाचित्रकारांनी अपमानास्पद वागणूक देणाऱ्या आयुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
औरंगाबादेत आल्यापासून वादावर वाद उभे करणाऱ्या मनपा आयुक्त महाजनांनी आज थेट धमकीच दिल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. डीएची मागणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांसोबत निवेदन देतानाचे छायाचित्र काढण्यासाठी आलेल्या दैनिकांच्या छायाचित्रकारांना तुच्छतेने हिणवत बाहेर हाकलण्याचे आदेश आयुक्तांनी दिल्यावर या वादाला प्रारंभ झाला. या प्रकारामुळे आयुक्तांच्या विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पत्रकारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
छायाचित्रकारांना असभ्य भाषेत बोलून सुरक्षा रक्षकांकडून हाकलून देण्याच्या प्रकारासंदर्भात पत्रकार व छायाचित्रकारांनीही आक्रमक रूप घेतले. आयुक्तांच्या गैरवर्तणुकीची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन त्यांनी प्रभारी विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांना दिले. त्यांनी पत्रकारांच्या तीव्र भावनांची दखल घेत विभागीय आयुक्तांच्या कानी हा प्रकार घालण्याची हमी दिली.
पोलिस ठाण्यात तक्रार
आयुक्त महाजन यांनी तंगडे तोडण्याची धमकी दिल्यानंतर संतापलेल्या संजय केणेकर यांनी दुपारी सिटी चौक पोलिस ठाण्यात आयुक्तांच्या विरोधात तक्रार करून संरक्षण देण्याची मागणी केली. या प्रकरणी मनपा आयुक्त महाजन यांनी कसलीही बाजू मांडली नाही.

पानझडेंमुळे वाद भडकला
महाजन, केणेकर यांच्यात वाद सुरू असताना छायाचित्रकारांच्या उपस्थितीचा मुद्दा निघाला. आयुक्तांनी छायाचित्रकारांना जाण्यास सांगितले. शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी त्यांची री ओढत छायाचित्रकारांना बाहेर जाण्यास फर्मावले. छायाचित्रकारांनी त्यांना आयुक्तांनी सांगितले तर जाऊ, असे सांगताच पानझडे यांनी आवाज चढवत ‘ही आयुक्तांची केबिन आहे, ’ असे सांगताच महाजनांनी तोच धागा पकडत आवाज चढवला व सगळा प्रकार घडला.

मुख्यमंत्र्यांनाही फॅक्स
संजय केणेकर यांनी आयुक्तांसोबत झालेल्या प्रकाराची व पत्रकारांनी त्यांना देण्यात आलेल्या वागणुकीबाबतच्या अशा दोन्ही तक्रारींचा फॅक्स सायंकाळी मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आला. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास खाते आहे.
असे घडले नाट्य
स्थळ : आयुक्तांचे दालन
वेळ : सकाळी ११.३० वा.

प्रमुख पात्रे : प्रकाश महाजन (आयुक्त), संजय केणेकर (भाजप गटनेते), सखाराम पानझडे (शहर अभियंता), मनपाचे कर्मचारी, छायाचित्रकार व पत्रकार.
- आयुक्त (वैतागून) : एवढे सगळे का आलात? काम सोडून कशाला आलात तुम्ही? ही काय पद्धत आहे अशी येण्याची?
- केणेकर : अहो, ते आपलेच कर्मचारी आहेत साहेब.
- आयुक्त : मग काय झाले? आणि का हो येताना पत्रकारांनाही का घेऊन आले? आपली चर्चा होण्याआधीच पत्रकारांना का आणता? बाहेर काढा पत्रकारांना. चला जा जा हो तुम्ही..
- केणेकर : साहेब, असे बोलू नका. ते पत्रकार आहेत. निवेदन देतानाचे फोटो काढायचे आहेत. हाकलू नका.
- छायाचित्रकार : तुमचे बोलणे चुकीचे आहे. तुम्ही आयुक्त आहात.
- आयुक्त : मला सांगू नका, चला, निघा आधी.
- पानझडे (पत्रकारांना उद्देशून) : तुम्ही नेहमीच परवानगी न घेता येता. ही आयुक्तांची केबिन आहे.
- छायाचित्रकार : तुम्ही कशाला बोलता? आयुक्त बोलतील.
- आयुक्त : सेक्युरिटी, काढा फोटोग्राफरांना बाहेर. ऐकू येत नाही?
- केणेकर : पत्रकारांना हात लावू नका, असे वागू नका त्यांच्यासोबत.
- आयुक्त : तुम्ही त्यांचे वकील आहात का? मला कळतं काय करायचं ते. काही समज नाही का तुम्हाला?
- याच काळात छायाचित्रकारांना सुरक्षा रक्षकांनी धक्के देत बाहेर काढले.
दोघेही वादग्रस्तच : प्रकाश महाजन
१. ठेकेदारांनी पैशाचा तगादा सुरू केल्याबाबत बोलताना त्यांनी तीनच महिन्यांपूर्वी ‘मी काय आता दात पाडून पैसे देऊ काय?' असा सवाल करीत वादाला तोंड फोडले होते.
२. १४ नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड यांच्यासोबत आयुक्तांचा भर रस्त्यावर वाद झाला. ‘तुम्ही काय संजय पवारच्या मागे लागलात? दुसरे विषय खूप आहेत. विकासाच्या विषयावर का बोलत नाहीत? फालतू विषयावर सर्वसाधारण सभेचे तीन-तीन तास वाया घालवता' असे उद््गार काढले. यानंतर आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.
३. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आपल्या वाॅर्डातील कामांना गती देण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या नगरसेवकांना त्यांनी ‘मी तुमच्या घरचा सालदार नाही' असे सुनावून रोष ओढवून घेतला होता.
४. २० डिसेंबरच्या सर्वसाधारण सभेत बोलताना महाजन यांनी विकासकामांना फाटा दिल्याचे समर्थन करताना ‘महिला जशा घरातील खर्चाला कात्री लावतात तसे करा' असे विधान केले व त्यानंतर भडकलेल्या नगरसेविकांनी त्यांच्यावर बांगड्या फेकल्या.

संजय केणेकर
१. भाजपचे गटनेते असणारे संजय केणेकर हेही कायम वादात अडकत असतात. गतवर्षी ३१ डिसेंबर रोजी नववर्ष स्वागताच्या पार्टीदरम्यान त्यांच्यात व खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात धक्काबुक्की झाली होती.
२. मनपात शिवसेनेची दादागिरी सहन न होऊन ते वेळोवेळी तुटून पडत असतात. आम्हाला गृहीत धरू नका, नसता युती तोडू, अशी वक्तव्ये करण्यापर्यंत त्यांच्या शिवसेनेसोबत चकमकी झडल्या आहेत.
३. सभागृहातही महापौर कला ओझा यांना टार्गेट करणाऱ्या नगरसेवकांत ते कायम आघाडीवर असतात.
४. महाजन यांच्यासोबत केणेकर यांचे वारंवार संघर्ष होतात. कामगार संघटनेचे नेते म्हणूनही ते आयुक्तांवर टीका करीत असतात. त्यांच्या या आक्रमकपणामुळेच दोन आठवड्यांपूर्वी महापौरांच्या बंगल्यावर पदाधिकाऱ्यांची पॅचअप बैठक सुरू असताना केणेकर येणार असल्याचे कळल्यावर आयुक्तांनी चक्क दंगाकाबू पथकच बोलावून घेतले होते. त्यामुळेही केणेकर संतापले होते.
महाजन धुळ्यातही वादाचे धनी
१. औरंगाबाद मनपात आयुक्त म्हणून रुजू होण्यापूर्वी महाजन धुळ्यात जिल्हाधिकारी होते. तेथेही त्यांची कारकीर्द वादग्रस्तच राहिली आहे.
२. धुळ्यात लोकन्यायालयात बोलताना त्यांनी वकिलांबाबत अनुदार उद््गार काढल्याने वकिलांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. अखेर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागितल्यावर ते प्रकरण कसेबसे शांत झाले होते.
३. धुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी बोलताना त्यांनी अहिराणी भाषेतील इरसाल विधाने करून कायमच वाद ओढवून घेतले आहेत.
४. प्रा. शरद पाटील व जयकुमार रावळ या धुळे जिल्ह्यातील दोन आमदारांसोबत त्यांचे कधीही पटले नाही. या दोघांनीही त्यांची सरकारदरबारी जोरदार तक्रार केली होती. काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांचे ऐकून महाजन वागतात, असा अनुभव या नेत्यांना आला होता.
केणेकर (तावातावाने) : कुणाशी बोलताय समजतंय का तुम्हाला? आदराने बोला.
आयुक्त : मला शिकवू नका, अरे, याला पण बाहेर काढा रे.
केणेकर : तुमची भाषा चुकीची आहे..
आयुक्त : आवाज चढवू नका. तुम्हाला फार मस्ती आली आहे. माझ्या मागे कुणी नाही असे समजू नका. मी धुळ्यातून माणसे मागवून हातपाय तोडीन. मग बघतो.
केणेकर : xxxxx फार शहाणपणा करू नका. महागात जाईल. आम्हाला पण दादागिरी करता येते. लक्षात ठेवा.

आयुक्त (फोन उचलून) : पोलिस स्टेशनला फोन करा...
यानंतर जागेवरून उठलेले आयुक्त व त्यांच्या अंगावर धावून गेलेले केणेकर यांच्यात मोठ्या आवाजात भांडणे सुरू होती. अखेर काहींनी मध्यस्थी करीत त्यांना शांत केले.
तोपर्यंत पोलिस पथकही आले होते. आयुक्त तरातरा गाडीत बसले व पोलिस बंदोबस्तात घराकडे रवाना झाले.