आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व जड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी, वाहतूक शाखेला पोलिस आयुक्तांचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जड वाहनांमुळे वाढलेले अपघातांचे प्रमाण लक्षात घेऊन शहरात जड वाहतुकीला प्रवेश बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नेमक्या कोणत्या वेळात ही वाहने शहरात घुसतात, त्यांचे प्रमाण काय आहे, त्यांच्यावर कारवाई का होत नाही आणि त्यांना पर्यायी मार्ग कोणते आहेत, याबाबत आठ दिवसांत सर्वेक्षण करून अहवाल द्यावा, असे आदेश पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त चंपालाल शेवगण यांना दिले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी बेदरकार वाहनांमुळे एकाचा मृत्यू झाला. सहा जण जखमी झाले. त्यामुळे किती बळी घेतल्यावर पोलिस कारवाई करणार, असा सवाल उपस्थित करत ‘दिव्य मराठी’ने बेदरकार वाहनांविरुद्ध अभियान हाती घेतले. त्याची दखल घेत हा निर्णय घेत असल्याचे यादव यांनी सांगितले.

 

गेल्या सहा दिवसांत राज्य राखीव दलाच्या एका जवानासह सहा जणांचा अपघातात मृत्यू झाला. गेल्या वर्षभरात जड वाहने, बेदरकार वाहनचालकांमुळे किमान २० जण मरण पावले, जखमी झाले. सध्या रात्री १२ ते सकाळी सहा या वेळेत जड वाहनांना शहरात प्रवेश आहे. तरीही अनेक वाहने पोलिसांची नजर चुकवून किंवा पोलिसांच्या मदतीने शहरात घुसतात. यात दोषी पोलिस कर्मचाऱ्यांवरही कडक कारवाई करू, असे यादव म्हणाले. बेदरकार वाहनचालकांना आळा घालण्यासाठी काही ठिकाणी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा अत्यावश्यक आहे. त्यात मनपाने पुढाकार घेण्यासाठी यादव यांनी मनपाचे कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांच्याशीही चर्चा केली.

 

१०० कोटी मिळणार : आयपीएमएस म्हणजे इंटेलिजन्स प्रोग्राम ऑफ ट्राफिक सिस्टिमसाठी स्मार्ट सिटीच्या निधीतून १०० कोटी मिळणार असल्याचे यादव म्हणाले. येत्या आठ दिवसांत निविदा प्रक्रिया होऊन चार महिन्यांत कामाला सुरुवात झालेली असेल, असा दावाही त्यांनी केला. यातील ७६ कोटी सीसीटीव्ही तर २४ कोटी आयपीएमएससाठी असतील. एकूण २४ चौकांत अद्ययावत यंत्रणा बसवण्यात येईल. चौकातील ज्या रस्त्यावर वाहनांची संख्या अधिक होईल त्यांच्यासाठी हिरवा सिग्नल लागेल. शिवाय वाहनचालकाचा चेहरा आणि नंबर प्लेट टिपणारे कॅमेरेही लागतील.

बातम्या आणखी आहेत...