औरंगाबाद- औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात आज शेवटच्या रविवारच्या प्रचाराने वातावरण दुमदुमून गेले होते. सर्वच प्रमुख उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याची शर्थ केली. सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असून त्यानंतर सर्वांना मतदानाची प्रतीक्षा असणार आहे. येत्या 15 तारखेला मतदान होत असून प्रचाराचे शेवटचे दोन दिवस सर्वच राजकीय पक्षांनी गाजवण्याची तयारी केली. त्यापैकी आजचा रविवार जोरदारच ठरला.
औरंगाबाद पश्चिममधील संजय शिरसाट (शिवसेना), मधुकर सावंत (भाजप), डॉ. जितेंद्र देहाडे (काँग्रेस), गंगाधर गाडे (पँथर्स रिपब्लिकन पार्टी-एमआयएम), मिलिंद दाभाडे (राष्ट्रवादी काँग्रेस), गौतम आमराव (मनसे) या प्रमुख उमेदवारांच्या यंत्रणा आज कामाला लागल्या होत्या. बहुतेक उमेदवारांनी मतदारसंघाचा भाग पिंजून काढला. रविवार असल्याने घरी असणाऱ्या नोकरदार मतदारांना गाठण्याची शर्थ त्यांनी केली. सकाळी सात वाजेपासूनच प्रचाराला प्रारंभ झाला. अनेक उमेदवारांनी मॉर्निंग वॉकची ठिकाणे गाठत मतदारांना सकाळीच गाठले. त्यानंतर विविध भागांत उमेदवारांच्या प्रचारकांचे जथे कॉलन्या-कॉलन्यांत जात मतदारांना भेटत होते. याशिवाय प्रचाराचे भोंगे लावलेली वाहनेही मतदारसंघात दिवसभर फिरत होती. प्रचाराच्या घोषणा व खास बसवून घेतलेली गाणी यांनी बहुतेक वसाहतींचा परिसर दणाणून टाकला.
कॉर्नर बैठकांवर जोर
शहरी भागात विविध वसाहतींत कॉर्नर बैठका घेत नागरिकांच्या गटासमोर
आपला प्रचार करण्यावर या वेळी अधिक भर दिला गेला. यंदा प्रचाराला उणेपुरे 10 दिवसच मिळाल्याने या बैठकांचे प्रमाण वाढले आहे. सर्व प्रमुख उमेदवारांच्या मिळून आज या मतदारसंघात किमान 50 कॉर्नर बैठका झाल्या.