औरंगाबाद: इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरसाठी डीएमआयसीमध्ये ५० एकर जागा निश्चित करण्यात आली आहे. ही जागा कमी होऊ देणार नाही, अशी ग्वाही विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली. रविवारी कलाग्राम येथे आयोजित अॅडव्हांटेज महाराष्ट्र २०१७ या उद्योग प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी बागडे म्हणाले की, हे प्रदर्शन उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. उद्योजकांना त्याचे उत्पादन प्रदर्शित करण्याची संधी मिळत असल्याने हे प्रदर्शन दर दोन वर्षांनी भरवण्याची गरज आहे.
आज सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळत नाही. त्यांना काम देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. समृद्धी महामार्गाला काही शेतकरी विरोध करत आहेत. मात्र समृद्धी महामार्गामुळे सर्वांचाच फायदा होणार असून विकासाला गती मिळणार आहे. तसेच सरकारनेदेखील शेतकऱ्यांपुढे सर्व पर्याय ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.
बागडे यांच्यापूर्वी बोलताना माजी उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले की, डीएमआयसीमध्ये ५० एकरात इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर करण्याचे ठरले होते. मात्र आता हे दहा एकरवर करण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. त्याबाबत सरकारचे लक्ष वेधण्याची गरज आहे. हाच धागा पकडून बागडे यांनी सेंटरची जागा कमी होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली.
विकास कुणाच्या मेहेरबानीवर नाही : यावेळी मानसिंग पवार म्हणाले की, औरंगाबाद उद्योग नगरीचा विकास कुणाच्याही मेहेरबानीवर नाही. तसेच कुणाच्या आशीर्वादामुळे झाला नाही. तो केवळ उद्योजकांच्या मेहनतीमुळे झाला आहे. दिल्लीच्या प्रगती मैदानावर होणाऱ्या प्रदर्शनासारखेच हे प्रदर्शन झाल्याचे त्यांनी सांगितले.