आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बड्यां’ची कामे झाली, आम्ही फक्त गोट्या खेळायच्या का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बड्या नगरसेवक, पदाधिका-यांची कोट्यवधींची कामे होतात, आम्हाला किरकोळ कामे देऊन फिरवले जाते. स्पिल ओव्हरच्या कामांतही प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डातील 25 ते 35 लाख रुपयांच्या कामांना कात्री लावण्यात आली. आम्ही काय फक्त गोट्या खेळायच्या का, असा सवाल करीत भडकलेल्या युतीच्या नगरसेवकांनी बजेटवरून पदाधिका-यांवर राग व्यक्त केला.
उद्या महापौर, उपमहापौर, पदाधिकारी व आयुक्त यांच्यात होणा-या बैठकीत तोडगा निघाला नाही तर थेट ‘मातोश्री’पर्यंत गाºहाणे मांडण्याची तयारी काही नगरसेवकांनी सुरू केली आहे.
580 कोटींचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेने म्हणजेच महापौर कला ओझा यांनी वाढवून 790 कोटींपर्यंत नेला. तो अमलात आणणे अशक्यप्राय असल्याचे लक्षात आल्यावर कामांना कात्री लावण्यात आली. ती लावताना भेदभाव झाल्याचा नगरसेवकांनी आरोप केला. आधीच बजेट पुस्तिका तयार करायला दोन महिने उशीर झाल्याने ते हतबल झाले आहेत. विधानसभेतील कामावर आमचे तिकीट ठरणार असल्याने नागरिकांसमोर कोणत्या तोंडाने जायचे, असा यक्षप्रश्न आमच्यासमोर आहे. त्यांनी सभागृह नेते किशोर नागरे यांच्याशीही चर्चा केली. त्यावर उद्या दुपारी 3 वाजता महापौर, उपमहापौर, पदाधिकारी व आयुक्त यांच्या बैठकीत निर्णय घेऊ, असे नागरे यांनी सांगितले.

नाराजी, संताप आणि धुम्मस
आज शिवसेना, भाजपच्या काही नगरसेवकांनी स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे यांच्यासमोर गाºहाणे मांडले. सभापतींनी प्रयत्न करून कामांच्या प्रश्नी तोडगा काढावा, अशी त्यांनी मागणी केली. भाजप नगरसेविका ऊर्मिला चित्ते यांचे पती नितीन चित्ते यांनी बड्या नगरसेवकांनी पहिल्या दोन वर्षांतच दीड ते दोन कोटींची कामे घेतली व ती टप्प्याने मार्गी लावली. आम्हाला मात्र चिल्लर कामे दिली गेली, असे सांगत आम्ही काय करायचे, असा सवाल केला. बालाजी मुंडे यांनी बजेट पुस्तिका यायला दोन महिने उशीर झाल्याने कामे कशी काय मार्गी लागणार, असा सवाल केला. प्रीती तोतला यांनी कामे कमी झाल्यामुळे आम्ही काय करायचे, असा सवाल करीत पदाधिका-यांनी आता हा प्रश्न तातडीने सोडवा, अशी मागणी
या वेळी केली.

प्रत्येकाला फटका
आयुक्तांनी 261 कोटींची स्पिल ओव्हरची कामे वाढून 350 कोटींची झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत एवढी कामे होऊच शकत नसल्याचे सांगत पदाधिका-यांना तुम्हीच काय करता येईल ते पाहा, असे सांगितले होते. नगरसेवकांची 25 ते 35 लाखांच्या कामांना कात्री लागली. प्रीती तोतला यांच्या वॉर्डातील 50 लाखांची, प्राजक्ता भाले यांच्या वॉर्डात 17 लाख, वीरभद्र गादगे यांच्या वॉर्डात 30 लाख, मोहन मेघावाले यांच्या वॉर्डात 30 लाख, संजय चौधरी यांच्या वॉर्डात 30 लाख रुपयांची कामे कपात झाली.

कामे कापल्याचा सर्व नगरसेवकांना राग
मनपाच्या इमारतीत कामांसाठी फिरणा-या नगरसेवकांनीही कामे कापल्याचा राग व्यक्त केला. उद्याच्या बैठकीतून मार्ग निघाला नाही तर ‘मातोश्री’पर्यंत आपले गाºहाणे मांडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे त्यांनी सांगितले. यामुळे येत्या दोन दिवसांत मनपात बजेटवरून मोठी धुम्मस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
स्फोट होऊ शकतो
आम्ही पदाधिका-यांनीच कामांच्या कपातीबाबत सहमती दिली हेही सत्य आहे. नगरसेवक नाराज आहेत. त्यांच्या संतापाचा स्फोट होण्याची भीती आहे. प्रशासनाने जास्तीत जास्त कामे हाती घेतली पाहिजेत. संजय केणेकर, भाजप गटनेते