आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कृत उमेदवार म्हणून बंडखोरांकडून प्रचार, रात्रीतून शिवसेनेने बंडखोरांना पुरस्कृत केल्याचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हडको एन-९, युतीत भाजपला सुटलेला हा वॉर्ड. कालपर्यंत शिवसेना बंडखोर म्हणून रिंगणात असलेली महिला उमेदवार सोमवारी सकाळपासून शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर प्रचार करत होती. अनेकांनी यास आक्षेप घेतला तेव्हा रविवारी सायंकाळी तसा निरोप आल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. असाच प्रकार शिवसेना तसेच भाजपचे बंडखोर असलेल्या वॉर्डांत दिसून आला.

थोडक्यात, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बंडखोरांनी मूळ पक्षाचेच अधिकृत उमेदवार असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी पाचपासून जाहीर प्रचार थांबल्याने अधिकृत उमेदवारांना खुलासा करण्याचीही संधी या मंडळींनी दिली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार बंडखोर उमेदवार नेत्यांच्या पाठबळावरच निवडणूक लढत असल्याने बंडखोरांवर काय कारवाई व्हायची ती होईल; पण तोपर्यंत नेत्यांच्या नावाचा बिनधास्त वापर करावा, अशी मुभा वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचे समजते.

सिडको एन-३, पदमपुरा, श्रीकृष्णनगर, एन-९, उल्कानगरी, गणेशनगर एन-८, नागेश्वरवाडी, सुराणानगर, रामनगर, कामगार कॉलनी, मयूर पार्क, विश्रांतीनगर, ठाकरेनगर एन-२, कोटला कॉलनी, पहाडसिंगपुरा, भगतसिंगनगर, हर्सूल यासह जवळपास ३५ वॉर्डांत बंडखोरी झाली आहे. बंडखोरांची हकालपट्टी केली जाईल, अशी घोषणा पक्षनेतृत्वाने केली असली तरी प्रत्यक्षात असे करता उलट बंडखोरांना रसद पुरवण्याबरोबरच त्यांना नेत्याचे नाव वापरण्याची मुभा या मंडळींनी दिल्याचे समोर आले. प्रचारात हे बंडखोर जाहीरपणे पुरस्कृत असल्याचे सांगत होते. पवननगरातील उमेदवार स्व. बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरे ते थेट चंद्रकांत खैरे जिंदाबाद असा नारा देत होते. त्याला दुसऱ्या अपक्षाने आक्षेप घेतला तेव्हा काल रात्री शिवसेनेने पुरस्कृत उमेदवारांची यादी जाहीर केल्याचा दावा त्याने केला. भाजप उमेदवाराच्या घरासमोरच तो घोषणाबाजी करत होता. यावरून काहीसा वाद होण्याची चिन्हे होती. मात्र, हाती माईक घेतलेला कट्टर शिवसैनिक असल्याने भाजप उमेदवाराच्या कार्यकर्त्याने माघार घेत शिवसेनेचा उमेदवार, असे म्हणत प्रचार करणारा कार्यकर्ता पुढे निघून गेला. असेच चित्र अन्य वॉर्डांतही दिसले. सेनेबरोबरच भाजप बंडखोरांनीही अशीच शक्कल लढवली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये घेतलेले मयूर पार्कचे उमेदवार विजय औताडे यांच्याविरोधातही सेनेच्या बंडखोराने असाच प्रचार चालवल्याचे सांगण्यात येते.

परवानगी दिली नाही
बंडखोरांना पुरस्कृत करण्याचा प्रश्नच नाही. आम्ही बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करणार आहोत. त्यामुळे त्यांना नाव वापरण्यास परवानगी देण्याचा प्रश्नच नाही. शिरीषबोराळकर, प्रदेशप्रवक्ते, भाजप.

कारवाई करू

आम्ही तर बंडखोरांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे त्यांना पुरस्कृत करण्याचा प्रश्नच नाही. जे कोणी असा प्रचार करत असतील तर त्यांच्याविरोधात आम्ही कारवाई करू. अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख,शिवसेना.