आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चेबांधणी : अपक्ष असल्याचा होतोय असाही फायदा !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिकेच्या वॉर्ड आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गजांना फटका बसला तरी तीन आजी-माजी नगरसेवकांना आहे त्या वॉर्डातच लढण्याची संधी मिळाली अाहे. सातारा देवळाई महापालिका हद्दीत आल्याने पुन्हा आरक्षण सोडत होण्याची शक्यता असली तरी या तीन जणांनी सोडत होणारच नाही, असे गृहीत धरून प्रचारालाही सुरुवातही केली आहे. हे तिघेही अपक्ष असल्याचा फायदा त्यांना होत आहे.

आरक्षण सोडतीत उपमहापौर संजय जोशी, स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे यांच्यासह अनेकांचे पत्ते कटले. नंतर सातारा, देवळाईचा महापालिकेत समावेश झाल्याने अनेकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. साताऱ्यातील दोन वॉर्डांत आपल्याला संधी मिळेल किंवा आमदार संजय शिरसाट, अतुल सावे यांचे प्रयत्न यशस्वी झाले तर आरक्षणाची सोडतच नव्याने होईल, असेही त्यांना वाटत आहे.

वॉर्डात लावले डिजिटल बॅनर

तीन वॉर्डांत यापूर्वी स्वत: किंवा पत्नीला निवडून आणण्यात यशस्वी झालेल्यांनी तातडीने प्रचारही सुरू केला आहे. त्यापैकी एक वॉर्ड आंबेडकरनगर आहे. सोडतीत तो सर्वसाधारण प्रवर्गाच्या महिलांसाठी खुला झाला आहे. ही संधी साधून महेंद्र सोनवणे यांनी पत्नीची उमेदवारी जाहीर करून टाकली असून तसे डिजिटल बोर्डच वॉर्डाच्या दर्शनी भागात लावले आहेत. हर्सूलनजीकच्या एकतानगर वॉर्डातून गेल्या वेळी रूपचंद वाघमारे यांच्या पत्नी ज्योती निवडून आल्या आहेत.
आता हा वॉर्ड सर्वसाधारण झाल्याने रूपचंद यांनीच मैदानात उडी मारण्याचे ठरवले आहे. प्रचाराचा भाग म्हणून त्यांनी मोफत पाण्याची योजना हाती घेतली आहे. पाणीपुरवठ्याच्या टँकरवर नगरसेवकपदाचे उमेदवार असल्याचे पोस्टर त्यांनी लावले आहे.
राजू शिंदेंचाही प्रचार

भाजप, अपक्ष, भाजप आणि पुन्हा अपक्ष असा प्रवास केलेले माजी स्थायी समिती सभापती राजू शिंदे यांचा वॉर्ड मागासवर्गीयांसाठी आरक्षित झाल्याने त्यांनी तातडीने संपर्क मोहिमा हाती घेतल्या आहेत. या सर्वांची आरक्षण सोडतीत लॉटरी लागल्याचे त्यांचे समर्थक म्हणत असले तरी विरोधकांनीही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून कधी पती, तर कधी पत्नी नगरसेवक असे या वेळी चालणार नाही, या मुद्द्यावर त्यांचाही प्रचार सुरू झाला आहे.
सेनेकडून लढणार

पूर्वीच्या रोजाबाग वॉर्ड नंबर १४ मधून संगीता राजू अहिरे या अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून निवडून आल्या होत्या. त्या वेळी त्या शहर प्रगती आघाडीत होत्या. नंतर आघाडीचे प्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्यासोबत त्या शिवसेनेत गेल्या. आता हा वॉर्ड सर्वसाधारण झाला असून त्यांचे पती राजू आहिरे यांनी शिवसेेनेकडून लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने त्यांनीही प्रचार सुरू केला आहे.