आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Corporation Election Issue And Opposition Issue

17 अपक्षांची वेगळी चूल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - युतीला पाठिंबा देताना दिलेले आश्वासन पाळले नाही, येथे फक्त पदाधिकार्‍यांच्याच वॉर्डात विकासकामे होतात, असे आरोप करत 17 अपक्षांनी वेगळी मोट बांधली आहे. आगामी महापौर निवडणुकीत युतीसोबत न राहण्याचे जाहीर करताना अपक्षांतूनच पुढील महापौर होईल, असा दावा केला. कृष्णा बनकर यांच्या अध्यक्षतेखाली या अपक्षांची एक बैठक सेव्हन हिल्स येथील एका हॉटेलात झाली. दुसरी बैठक लवकरच होणार असून त्यात महापौरपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल, असे बनकर यांनी सांगितले.
अपक्षांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीला 17 नगरसेवक उपस्थित असले तरी सर्मथक अपक्षांचा आकडा हा 20 पेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. अपक्ष म्हणून गणना करण्यात येत असली तरी त्यामध्ये रिपाइंच्या सदस्यांचा समावेश आहे. अपक्षांच्या या वेगळ्या चुलीचा फायदा युतीला होणार असून काँग्रेस आघाडीचेच नुकसान होईल, असा दावा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे.

अपक्षांचे आरोप : युतीला पाठिंबा देताना सर्व अपक्षांच्या वॉर्डांत मिळून पाच कोटी रुपयांची कामे दिली जातील, असे आश्वासन युतीच्या वतीने देण्यात आले होते. मात्र, अपक्षांच्या वॉर्डांत कामे दिली नाहीत. महापौर, उपमहापौरांसह पाच पदाधिकार्‍यांच्याच वॉर्डात भरमसाट विकासकामे झाली.

अपक्ष काय करणार? : युतीला मतदान करणार नाही. स्वत:चा उमेदवार देणार. काँग्रेसची मदत घेऊन सत्ता काबीज करण्याचा दावा. अपक्षांची संख्या 20 च्या पुढे जात असल्याने युतीला येथील सत्तेतून बाहेर फेकण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचे सर्मथन मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

बैठकीस उपस्थित नगरसेवक : कृष्णा बनकर, राजू शिंदे, मिलिंद दाभाडे, विजयेंद्र जाधव, कीर्ती शिंदे, ज्योती वाघमारे, संगीता अहिरे, कैलास गायकवाड, पुष्पा निरपगारे, जावेद कुरैशी, तरुन्नम बेगम, मधुकर सावंत, ज्योती खिल्लारे, मेहरुन्निसा बेगम, सुरेश इंगळे, रामदास बोराडे, बब्बुभाई.

शिंदेचा इन्कार : दरम्यान अपक्षांच्या या बैठकीला आपण उपस्थित नव्हतो, असे सांगून राजू शिंदे यांनी लगेच माघार घेतली. मला भाजपमधून निलंबित करण्यात आले असल्याने मी सध्या अपक्ष असलो तरी एकटाच आहे. महापौराच्या निवडणुकीत कोणाला मतदान करायचे हे ऐनवेळी निश्चित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रगती आघाडी अलिप्त : या बैठकीला शहर प्रगती आघाडीच्या तीनही सदस्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, त्यांनी याकडे पाठ फिरविली. मनसेचे राज वानखेडे हेदेखील अलिप्त होते. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे समीर राजूरकर व मनसेचे राज वानखेडे यांनी सांगितले.