आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वॉर्डांतून कटला एमआयएमचा पतंग, आंबेडकर नॅशनल काँग्रेसने कापले पतंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पालिका निवडणुकीत एमआयएमने ६० उमेदवार उभे केले. या सर्वांना पतंग हे निवडणूक चिन्ह द्यावे, असा अर्जही करण्यात आला. मात्र, तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी औरंगाबाद- निवडणूक आयोगाकडे उशिरा पाठवल्याने दोन वॉर्डांत एमआयएमच्या उमेदवारांना अन्य चिन्हे मिळाली. त्यांच्या जागी आंबेडकर नॅशनल काँग्रेसच्या उमेदवारांनी पतंग मिळवला आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या दिरंगाईबद्दल एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आयोगाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले.
एमआयएमने मनपाकडे २७ मार्चला पत्र दिले. त्यात ६० वॉर्डांतील उमेदवारांची यादी होती. या सर्वांना पतंग हीच निशाणी द्यावी, असेही नमूद होते. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांनी हे पत्र ६ एप्रिलला आयोगाकडे पाठवले. दरम्यान, आंबेडकर नॅशनल काँग्रेसच्या (एएनसी) वतीने चार एप्रिल रोजी थेट निवडणूक आयोगाला पतंग निशाणीसाठी पत्र पाठवण्यात आले.
शनिवारी चिन्हवाटपाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आयोगाचे सूचना पत्र मनपा निवडणूक अधिकाऱ्यांना आले. ज्या वॉर्डात एमआयएम आणि एएनसीचे उमेदवार आहेत तेथे सोडतीद्वारे पतंगाविषयी निर्णय घ्यावा, असे त्यात आदेश होते. भगतसिंगनगरमधून एएनसीचे वसंत बनसोडे यांना पतंग, तर एमआयएमचे पद््माकर कांबळे यांना कपाट चिन्ह दिले. भडकल गेट येथे एएनसीचा उमेदवार नसला तरी तेथे एमआयएमचे उमेदवार गंगाधर ढगे यांना मेणबत्ती चिन्ह मिळाले. कैसर कॉलनीतून एमआयएमच्या गजाला शाहनवाज यांना पतंग तर एएनसीच्या जहाँआरा बेगम यांना बॅट चिन्ह देण्यात आले. रोशन गेट वॉर्डातही एमआयएमच्या साजेदा फारुकींना पतंग तर एएनसीच्या साबेरा बेगम यांना शिलाई मशीन चिन्ह देण्यात आले. सोडत पद्धतीचे कैसर कॉलनी, रोशन गेट वॉर्डात पालन झाले नाही. याबद्दल उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे एएनसीचे राष्ट्रीय अध्यक्ष मोईन इनामदार यांनी सांगितले.
मनसेचे इंजिन बंद
मनसेचा एकही उमेदवार नसल्याने रेल्वे इंजिन हे चिन्ह इतर कुणालाच वाटप करण्यात आले नाही. पतंगासाठी एमआयएम आणि आंबेडकर नॅशनल काँग्रेसमध्ये रस्सीखेच असल्याने अपक्ष औरंगाबाद- उमेदवार त्याकडे वळले नाही. सायकल, डोक्यावर भारा घेतलेली महिला, झाडाची पाने, कंदील, बाण, चावी कुलूप, हत्ती आदी चिन्हे ज. द., स. प., लोकजनशक्ती, बसप, राष्ट्रीय जनता दलाला मिळाली. अपक्षांनी शिट्टी, बैलगाडी, कणीस आदी चिन्हे मिळवली.
अधिका-यांची चूक
पतंग चिन्हासाठी वेळेत कागदपत्रे सादर केली होती. मात्र ती स्थानिक अधिकाऱ्यांनी पुढे पाठवली नाहीत. मुंबईत निवडणूक आयोगाकडून यासंदर्भात विचारणा करण्यात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी सारवासारव केली. ही बाब आम्ही मनपा आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी चूक मान्य केली. याविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. इम्तियाज जलील, आमदार