आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद पलिका निवडणूक : बंडोबांच्या टेकूवर युती सत्तेकडे ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एमआयएममुळे धार्मिक ध्रुवीकरण आणि ऐेनवेळी हातमिळवणी केल्याने शिवसेना-भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा कालपर्यंत सूर होता. मात्र, मतदारांची संख्या वाढूनही मतदानाची टक्केवारी गेल्या वेळच्या तुलनेत वाढली नाही. गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्यांनी स्वपक्षीय बंडखोरांना मित्रपक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध उघडपणे पाठबळ दिले. हे लक्षात घेता अपक्ष, बंडखोरांच्या मदतीने युती सत्तेच्या दिशेने जाईल, अशी शक्यता आहे.
यंदाच्या निवडणुकीत युती होण्याची शक्यता तशी धूसरच होती. मात्र ऐनवेळी युती झाली अन् समोर काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होऊ शकली नाही. त्यातच या आघाडीच्या मतांवर एमआयएम या नव्या पक्षानेही डोळा ठेवला होता. त्यामुळे युतीसमोर एक सुवर्णसंधी चालून आली होती. अशा परिस्थितीत युतीला बहुमताचा आकडा लीलया गाठणे शक्य होते. किमान ७० जागांवर (काठावरच्या बहुमतासाठी ५७ जागा आवश्यक. त्यातील वेदांतनगर, ज्योतीनगरात युतीने आधीच विजय मिळवला आहे. त्यांना विजय मिळू शकेल, असे चित्र होते; परंतु प्रत्यक्षात वेगळे घडल्याचे राजकीय क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. कोणत्याही टेक्याशिवाय निर्भेळ सत्ता युतीसाठी अवघड जाणार आहे.
अपेक्षित वर्ग आला नाही : मतदानाची टक्केवारी वाढली की ती सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असते असे मानले जाते. मात्र, औरंगाबादेत तसा अनुभव नाही. २०१० च्या तुलनेत यंदा सुमारे सव्वा लाख मतदार वाढले. त्यामुळे किमान ७२ टक्के मतदान होईल आणि त्याचा फायदा युतीला होईल, असे आडाखे बांधले जात होते.
आज लागलेल्या रांगा पाहता काही ठिकाणीच युवावर्ग मतदानाला आला होता. त्याचाही युतीला फटका बसणार, असे म्हटले जाते. काँग्रेस,राष्ट्रवादीला आनंदच : एमआयएमच्या लाटेमुळे काँग्रेसचे चार, दोन निवडून येतील का, राष्ट्रवादी खाते उघडेल का, असे प्रश्न याच पक्षांचे स्थानिक नेते खासगीत विचारत होते; परंतु युतीची बंडखोरी त्यांच्या पथ्यावर पडली अन् ही मंडळी दोन आकडी संख्या गाठू शकते, असा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला. या लाटेत काँग्रेस, राष्ट्रवादीचे मिळून २० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले तर ते एकार्थाने दोन्ही काँग्रेसचे यशच असणार आहे. कारण बंडखोरी झाली नसती दुसरीकडे एमआयएमची लाट आहे तशीच राहिली असती तर या पक्षांची खाते उघडताना दमछाक झाली असती.
एमआयएमचे आकर्षण कायम; पण नाराजी वाढली

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य मतदारसंघात युतीला धक्का देणाऱ्या एमआयएम पक्षाबाबत आकर्षण कायम दिसले; परंतु या पक्षाविषयी नाराजी तसेच तक्रारी असल्याचे समोर आले. त्यामुळे आम्ही सन्मानजनक जागा जिंकू, असा दावा काँग्रेस तसेच राष्ट्रवादीचे स्थानिक नेते करू शकले.
बंडखोरीमुळे अडचण

युतीत भाजपला सुटलेल्या ४३ पैकी २१ जागांवर शिवसेना बंडखोरांनी शड्डू ठोकले, तर सेनेला सुटलेल्या ५६ जागांपैकी १५ ठिकाणी भाजपचे उमेदवार मैदानात राहिले. म्हणजे युतीचा प्रभाव असलेल्या ७० पैकी ३६ वॉर्डांत बंडखोरी झाली. यातील निम्म्या बंडखोरांना युतीच्या नेत्यांनी रसद पुरवली. त्यामुळे या वॉर्डांत युतीचा अधिकृत विरुद्ध बंडखोर अशा लढती झाल्या. त्याचा फायदा काँग्रेस व राष्ट्रवादीलाही होऊ शकतो. आता ३६ बंडखोरांतून विजयी झालेल्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देऊन त्यांच्या जिवावर महापौरपद मिळवावे लागेल, असे दिसते.
मुद्दाम लढवले बंडखोर

प्रत्येक वेळी बंडखोरी होते. नंतर त्यांना शमवण्यासाठी प्रयत्न होतात. मात्र या वेळी घडले ते उलटेच. भाजपच्या वॉर्डात सेना बंडखोराला पक्ष नेतृत्वाने पाठीशी घातले. तू लढ, पुढचे आम्ही बघू, असा दिलासा दिला. तर सेनेच्या वॉर्डात अपक्षाला भाजपच्या नेतृत्वाने रसद पुरवतानाच काहीही कारवाई होणार नाही, असा विश्वास दिला. यंदाची बंडखोरी झाली कमी अन् नेत्यांनी घडवून आणली जास्त असे चित्र दिसले. दोन-तीन दिवसांत अपक्ष म्हणून निवडून आलेले बंडखोर मूळ पक्षात दाखल झालेले दिसतील.
नेत्यांचे दावे
शिवसेना (अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख) : ३५- ४०, भाजप (शिरीष बोराळकर, प्रदेश प्रवक्ते) : २२-२६, काँग्रेस (सचिन सावंत, प्रदेश प्रवक्ते) : १५-१७, राष्ट्रवादी काँग्रेस (विनोद पाटील, शहर कार्याध्यक्ष) : १५-२०, एमआयएम (इम्तियाज जलील, आमदार)- २०-२५.
गोंधळ करणाऱ्यांना लाठ्यांचा प्रसाद; आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल
शहरातील ६५७ मतदान केंद्रांपैकी काही मतदान केंद्रांवर वादावादी, बाचाबाची आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. वातावरण बिघडवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी तत्काळ लाठ्यांचा प्रसाद देऊन ताब्यात घेत त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला.

भारतनगरात दगडफेक :
शिवाजीनगर-भारतनगर वॉर्डातील मतदान केंद्रावर बोगस मतदानावरून कार्यकर्त्यांत एकमेकांवर दगडफेक व हाणामारी झाली. यात दोघांची डोकी फुटली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या घटनेमुळे या भागात काही काळ तणाव होता.
शिवसेनेचे दिग्विजय शेरखाने, रिपाइं डेमाक्रॅटिकचे कैलास गायकवाड व अपक्ष उमेदवार जालिंदर शेंडगे यांच्या कार्यकर्त्यांत सकाळपासूनच बाचाबाची सुरू होती. बोगस मतदान करण्यासाठी बाहेरून मतदार आणल्यावरून नेहरू कॉलेज या मतदान केंद्रासमोरच दुपारी १२ वाजता ही घटना घडली. पीएसआय सुनील कसबे, कल्याण शेळके यांच्या टीमने जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. तरीही कार्यकर्त्यांत हाणामारी सुरूच होती. शेवटी पोलिसांनी हाणामारी करणाऱ्यांना घेरून लाठ्यांचा प्रसाद देताच वातावरण निवळले.
राधाकृष्ण गायकवाड यांचे कार्यालय पोलिसांनी फोडले : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राधाकृष्ण गायकवाड यांच्या विष्णूनगर भागातील कार्यालय फोडण्यात आले. पोलिसांनीच अरेरावी करत तोडफोड केल्याची तक्रार गायकवाड यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात केली आहे. दुपारी चारच्या सुमारास गायकवाड यांच्या कार्यालयासमोर काही तरुण बसले होते. हे कार्यालय विष्णूनगर-मित्रनगर भागातील मतदान केंद्राजवळ आहे. या ठिकाणी पोलिस परिमंडळ दोनच्या विशेष पथकातील उपनिरीक्षक गणेश धोकरट पथकासह आले. या तरुणांचा आणि त्यांचा वाद झाला. त्यांनी थेट या तरुणांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
हा प्रकार पाहून गायकवाड आणि त्यांचा मुलगा धनंजय बाहेर आला. त्यांनादेखील पोलिसांनी ढकलून दिले. कार्यालयातील बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटोदेखील या गोंधळात फुटले, असा आरोप राधाकृष्ण गायकवाड यांनी केला. या घटनेनंतर जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोर १०० ते १५० कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. या वेळी खासदार चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, अतुल सावे आदी नेतेमंडळीही आली होती. याबाबत पोलिस आयुक्तांना विचारले असता त्यांनी याबाबत पारदर्शक चौकशी केली जाईल, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल, असे सांगितले.
एमआयएम,काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा : गणेश कॉलनी वॉर्ड क्रमांक २५ मध्ये एमआयएम आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास नॅशनल इंटिग्रेट स्कूल या मतदान केंद्रासमोरच हा प्रकार घडला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून एमआयएमचे उमेदवार नसिरोद्दीन सिद्दिकी, काँग्रेसचे उमेदवार नदीम मस्तान यांच्यासह नऊ जणांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी फौजदार शेषराव उसर यांच्या तक्रारीवरून अकरा जणांविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयएमचे उमेदवार नसिरोद्दीन सिद्दिकी, काँग्रेसचे उमेदवार नदीम मस्तान, शेख मुजीब, मोहंमद मस्तान, शेख रज्जाक, शेख जफरोद्दीन, अलीम मस्तान, शेख इस्माईल, अब्दुल हकीम, म. शमी इलियास, काझी मुबीन यांना अटक करण्यात आली. त्यानंतर जामीन देण्यात आला.
कीर्ती शिंदेंच्या घरावर दगडफेक

नागेश्वरवाडी येथील अपक्ष उमेदवार कीर्ती शिंदे यांच्या घरावर बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दगडफेक झाली. क्रांती चौक पोलिस ठाण्यात त्यांनी अज्ञात लोकांविरुद्ध तक्रार दिली आहे.
मतदान शांततेत पार पडले

मतदान शांततेत पार पडावे यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांसह स्वयंसेवकांनी खूप मेहनत घेतली. नागरिकांनीही उत्तम सहकार्य केले. काही मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांनी धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्काळ त्यांचा बंदोबस्त करण्यात आला. उद्याच्या मतमोजणीसाठीही चोख आणि नियोजनपूर्वक बंदोबस्त लावण्यात आला आहे. राजेंद्र सिंह, पोलिस आयुक्त