आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Corporation School Children Dress Issue

दहा वर्षांत प्रथमच वेळेवर गणवेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गेल्या दहा वर्षांत शक्य झाले नाही, ते यंदा पालिका प्रशासनाने शक्य करून दाखवले. दहा वर्षांत प्रथमच पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पंधरा ऑगस्टपूर्वी गणवेश मिळाले.
महापालिकेच्या 77 पैकी 76 शाळांतील 17 हजार विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गणवेश मिळाल्याने त्यांच्या चेहर्‍यांवर आनंद ओसंडत होता. सर्व विद्यार्थी नव्या कोर्‍या गणवेशातच ध्वजारोहणाला उपस्थित होते.
या विद्यार्थ्यांना गेल्या दहा वर्षांत शाळा सुरू झाल्यापासून स्वातंत्र्यदिनापूर्वी कधीच गणवेश मिळाले नव्हते. बहुतांश वेळा गणवेश दिवाळीनंतरच मिळायचे. 2007 मध्ये तर शैक्षणिक वर्षाच्या शेवटी गणवेश आणि परीक्षा संपता संपता बूट आणि पायमोजे देण्यात आले होते.
गतवर्षापासून कापड खरेदी करून ते मुख्याध्यापकाच्या ताब्यात देण्यात येत होते. मुख्याध्यापक आणि शालेय समितीने त्यांच्या स्तरावर शिंपी शोधून विद्यार्थ्यांच्या मापांवर गणवेश शिवून घेणे अपेक्षित होते. एका जोडीसाठी 40 रुपये शिलाई देण्यात येत होती. इतक्या कमी रकमेत शिलाई करून देण्यास शिंपी राजी न झाल्याने गतवर्षी विद्यार्थ्यांना गणवेशासाठी विलंब झाला होता.
यंदाही तीच पद्धत असल्यामुळे 15 ऑगस्टपर्यंत गणवेश शिवून मिळणे अवघड होते. कापडासाठी पैसे दिल्यानंतर गणवेश मिळवण्यासाठी शालेय समितीला प्रशासनाने 5 ऑगस्टची अंतिम मुदत दिली होती. मात्र, ते शक्य झाले नाही. आता कारवाईला सामोरे जावे लागणार, असे संकेत मिळाल्यानंतर मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्तरावरून जोरदार हालचाली करून गणवेश शिवून घेतले. 14 ऑगस्टला 76 शाळांमध्ये वाटप करण्यात आले.
कपडे टेलरकडे अडकले - कैलासनगर शाळेतील विद्यार्थ्यांचे कपडे शिवण्यासाठी शिंप्याकडे देण्यात आले असून त्याच्याकडून ते वेळेत शिवणे न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गणवेश मिळू शकले नसल्याचे उपायुक्त रवींद्र निकम यांनी सांगितले. येत्या सोमवारपर्यंत या शाळेतील मुलांना गणवेश मिळतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.