आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका निवडणूल : आज "राजा' निवडणार १११ "सेवक'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रचारातील आश्वासनांचा धुरळा आता बसला असून मतदार राजा आज त्याची मर्जी चालवणार आहे. शहराचा कारभार सांभाळण्यासाठी १११ नगरसेवक निवडण्यासाठी ८ लाख १५ हजार मतदार आपला हक्क बजावणार असून अनेक वैशिष्ट्यांनी गाजलेल्या या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारतो याकडे लक्ष लागले आहे.

११३ वाॅर्डांच्या मनपातील ज्योतीनगर व वेदांतनगर या दोन वाॅर्डांत बिनविरोध निवडणूक झाल्याने बुधवारी १११ वाॅर्डांसाठी मतदान होत आहे. ६५७ मतदान केंद्रांवर मतदानाची सारी तयारी पूर्ण झाली आहे. ही सारी मतदान प्रक्रिया हाताळण्यासाठी ३६५५ अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले असून ३१०० पोलिस व राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सकाळी साडेसात वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून साडेपाच वाजता मतदान संपेल. मतदानानंतर मतपेट्या नेण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस, इतर शासकीय व खासगी अशी एकूण १२५ वाहने ताफ्यात सज्ज आहेत. १० केंद्रांवर आरोग्यपथक सज्ज राहणार आहे. १०८ क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिकेची सेवा घेता येईल.
११ बूथ संवेदनशील
निवडणूक विभाग व पोलिसांनी शहरातील ११ मतदान केंद्रे अति संवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत. त्यात हर्सूल, शहागंज, खाराकुवा, संजयनगर बायजीपुरा, राजनगर, जाफरगेट, चिकलठाणा, नारेगाव येथील केंद्रांचा समावेश आहे. तेथे अधिकचा बंदोबस्त तैनात आहे. याशिवाय एकूण ३८ केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. तेथेही पोलिस नजर ठेवून असतील.
राजकीय तापमान वाढले
उन्हाचा पारा ४० अंशांवर टेकला असताना राजकीय तापमानानेही उसळी घेतली. युती आपले वर्चस्व टिकवण्यासाठी झुंजणार आहे, तर एमआयएम आपली ताकद दाखवून देण्यासाठी मैदानात उतरला आहे. सर्वच राजकीय पक्षांचे बंडखोर मैदानात ताकदीने उभे असून त्यांच्याकडेच मनपाच्या राजकीय किल्ल्या राहतील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. प्रचारादरम्यान विकासावर थोडेसे, पण हिंदुत्व, बाहेरचे की स्थानिक, राजकीय वादग्रस्त मुद्देच अधिक उफाळून आले.
यंदा प्रथमच
यंदाची मनपाची निवडणूक तीन बाबतीत प्रथमच अशी राहणार आहे. शहराचा वाढता पसारा पाहून वाॅर्डांची संख्या प्रथमच शंभरी ओलांडून ११३ वर पोहोचली. याशिवाय महिलांना ५० टक्के आरक्षणाची ही पहिलीच वेळ असून यंदा तब्बल ५७ महिला वाॅर्ड असणार आहेत. नोटा अर्थात यापैकी कुणीही नाही या पर्यायाचा वापर प्रथमच मनपा निवडणुकीत होणार आहे.
तापमान ३९0
बुधवारी कमाल ३९, तर
किमान तापमान २६ अंश सेल्सियसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. दुपारी १२ ते ५ या वेळेत तापमान ३४ ते ३९ अंश सेल्सियसदरम्यान राहणार असून, ढगाळ वातावरण असेल. त्यामुळे मतदानासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
मतदान कार्ड नसेल तर १७ पुरावे
ज्या उमेदवारांकडे मतदान कार्ड नसेल, पण यादीत नाव असेल, अशांसाठी १७ पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यात पासपोर्ट, वाहन परवाना, पॅन कार्ड, शासकीय कार्यालयाने कर्मचाऱ्यांना िदलेले फोटोसहित ओळखपत्र, राष्ट्रीयीकृत बँकेचे अथवा पोस्टाचे फोटोसह पासबुक, स्वातंत्र्यसैनिकांचे ओळखपत्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी आदी प्रवर्गांना िदलेले फोटोसहित जात प्रमाणपत्र, अपंगत्वाचे ओळखपत्र, नोंदणी रजिस्ट्री दस्त फोटोसह, शस्त्रास्त्र परवाना, रोहयोचे निवडणूक कार्यक्रमापूर्वीचे ओळखपत्र, निवृत्त कर्मचाऱ्यांचे पासबुक, आरोग्य विमा योजनेचे फोटो असलेले कार्ड, रेशन कार्ड, एकच नाव रेशन कार्डवर असल्यास वीज बिल, दूरध्वनी बिल, प्रॉपर्टी कार्ड, घरपट्टी भरल्याची पावती अावश्यक, आधार ओळखपत्र याचा वापर करता येईल.

औरंगाबादमधील चर्चेतील पाच वॉर्ड

१] गुलमंडी (खासदार खैरे यांच्या पुतण्याचे राजकीय भविष्य ठरणार)

२] समर्थनगर (खासदार खैरे यांच्या मुलाचे राजकीय भवितव्य ठरणार)
३] बाळकृष्णनगर (विद्यमान महापौरांचे काय होणार?)
४] मयूरनगर (शिवसेना व भाजपमधील बंडखोरांमुळे अत्यंत चुरस)
५] विद्यानगर (महापौरांच्या विद्यमान वाॅर्डात बाहेरचा की स्थानिकचा, हा मुद्दा)