आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्पिल’ची कामे झालीच पाहिजेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बडे नगरसेवक व पदाधिका-यांची कामे होतात, आम्हाला काहीच कामे मिळत नाहीत. आधीच तुटपुंजी कामे, बजेट पुस्तक उशिरा दिले, कामे कापली आता आचारसंहितेआधी काय कामे मार्गी लागणार आणि काय होणार, असा हताश सवाल करीत नगरसेवकांनी बुधवारी महापौर कला ओझा यांना धारेवर धरले.
काहीही करा स्पिलची सगळी कामे झालीच पाहिजे, असे त्यांनी महापौरांना इतर पदाधिका-यांसमोरच ठणकावले. यावर उद्या आयुक्तांशी बोलून नगरसेवकांची बैठक घेऊ, असे महापौरांना नाइलाजाने जाहीर करावे लागले.

बजेट पुस्तिकेला उशीर, प्रशासनाने वाढीव कामास नकार दिल्याने करावी लागलेली कामांतील कपात आणि तोंडावर आलेली आचारसंहिता यामुळे युतीच्या नगरसेवकांचा भडका उडाला आहे. त्याचा कोणत्याही क्षणी स्फोट होऊ शकतो. काल स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे यांच्याकडे नगरसेवकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्यावर महापौरांनी आज आपल्या दालनात बैठक बोलवली होती. आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांना तातडीच्या कामासाठी मुंबईला जावे लागल्याने महापौरांनीच बैठक घेतली. त्यात सर्व पदाधिकारी व मोजके नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवक बालाजी मुंडे, ऊर्मिला चित्ते यांचे पती नितीन चित्ते, अनिल जैस्वाल आणि इतरांनी महापौरांवर सरबत्तीच केली.
स्पील ओव्हरचे एकही काम रोखू नका. सगळी कामे झालीच पाहिजेत. ज्या नगरसेवकांची स्पीलची कामे उरलेली नाहीत त्यांच्या वॉर्डात नवीन कामे करा, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय अनेक कामांच्या फायली टेंडरपर्यंत आल्या आहेत, पण ही कामे बजेटमध्ये नसल्याने नगरसेवकांची भयानक कोंडी झाली आहे. अनेक कामांच्या निविदा निघून ठेकेदार निवडला नाही. आचारसंहिता तोंडावर आली असताना कामे होणे अशक्य आहे. ही कामे मार्गी लागली नाहीत तर उद्र्रेक होऊ शकतो, असे उपमहापौर संजय जोशी म्हणाले.
आयुक्तच नसल्याने नगरसेवकांची सरबत्ती ऐकण्यावाचून महापौरांना पर्याय नव्हता. सभागृह नेते किशोर नागरे, सभापती विजय वाघचौरे, मीर हिदायत अली, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड यांनीही कामे झाली पाहिजेत, अशी भूमिका घेतली. त्यावर महापौरांनी उद्या आयुक्त परतल्यावर त्यांच्याशी बोलून नगरसेवकांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

वड्याचे तेल वांग्यावर
महापौरांकडून चांगली वागणूक मिळत नाही, प्रश्न सुटत नाहीत, असे अनेक नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाबाबतच्या या बैठकीला आयुक्त नाहीत, असे समजताच अनेक नगरसेवकांनी बैठकीला जाणे टाळत कामांसाठी अधिका-यांची दालने गाठली. इकडे बैठकीत काही नगरसेवकांनी पदाधिका-यांच्या वॉर्डात करोडोची कामे होतात, असा आरोप केला. तो जिव्हारी लागलेल्या महापौर बैठकीनंतर पत्रकारांवरच चिडल्या. तुम्ही माझ्या वॉर्डात पाच कोटींची कामे सांगता, आम्ही सत्ताधारी असलो तरी स्वार्थी नाही, आम्हाला सगळ्या शहराकडे बघावे लागते असे त्या म्हणाल्या.

फोटो - वॉर्डातील कामे मार्गी लागत नसल्याने संतप्त नगरसेवकांनी बुधवारी महापौर कला ओझा यांचे दालन गाठून कामे झालीच पाहिजेत असा आग्रह धरला. छाया : मनोज पराती