आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- न्यायदानास किती विलंब लागू शकतो याचा प्रत्यय आज आला. आरोपीला शिक्षा होण्यास 30 वर्षे लागली. नरेंद्रसिंग ऊर्फ पप्पी प्रीतमसिंग छटवाल यास (52, उस्मानपुरा) मुख्य हवालदार गोकुळ बुंदेले (52, हल्ली मुक्काम जालना) यांना शिवीगाळ, मारहाणीच्या प्रकरणात दोन वर्षे सक्तमजुरी ठोठावली. मुख्य न्यायदंडाधिकारी डी. जी. राजे यांनी हे आदेश दिले.
पप्पी (त्या वेळी वय 22 वर्षे) याने 14 मार्च 1983 रोजी क्रांती चौक ठाण्यातील मुख्य हवालदार गोकुळ बाबुलाल बुंदेले यांना मारहाण केली होती. पप्पी त्या वेळी हद्दपारीचे उल्लंघन करून शहरात खुलेआम फिरत होता. रॉक्सी चित्रपटगृहाजवळ गस्तीवरील क्रांती चौक पोलिसांच्या पथकास तो शारदार्शम कॉलनीकडे जाताना दिसला. बुंदेले यांनी त्यास रोखले असता त्याने शिवीगाळ आणि मारहाण केली. त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम 353 नुसार क्रांती चौक ठाण्यात गु्न्हा दाखल झाला. हे प्रकरण जून 2013 मध्ये सुनावणीस आले. आरोपीच्या वकिलांनी मारहाणीची घटना 30 वर्षे जुनी असल्याने दया दाखवावी, असा युक्तिवाद केला. मात्र, सरकारी वकील अँड. बी. एम. राठोड यांनी शिक्षेत माफी दिल्यास चुकीचा संदेश जाईल, असा मुद्दा ठामपणे मांडला. तो न्यायालयाने मान्य केला.
विविध कलमांखाली दंड
पप्पीला कलम 353 अन्वये (दोन वर्षे) आणि 2000 रुपये दंड, कलम 323 नुसार (एक वर्ष) सक्तमजुरी, 1000 रुपये दंड, कलम 294 नुसार तीन महिने सक्तमजुरी, 300 रुपये दंड, मुंपोकाच्या कलम 142 नुसार दोन वर्षे सक्तमजुरी सुनावली. गेल्या आठवड्यातही पाणी भरण्यासाठी झालेल्या मारहाणीतून 30 वर्षांपूर्वी दगड मारणार्या आरोपीला वयाच्या 60 व्या वर्षी एका महिन्याच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
पप्पीची दहशत होती
पप्पी आणि त्याच्या एका साथीदाराची 1980-90 काळात शहरात दहशत होती. विशेषत: उस्मानपुरा, पदमपुरा, रेल्वेस्टेशन, क्रांती चौक, पैठण गेट, सिल्लेखाना, औरंगपुर्यात त्यांचा वावर होता. अनेक वेळा पप्पी तलवार घेऊनच लूटमार आणि चित्रपटांच्या तिकिटांचा काळाबाजार करत असे. उस्मानपुरा भागात त्या वेळी फारशी वस्ती नव्हती. त्यामुळे पप्पी समोरून येताना दिसला तर लोक रस्ता बदलत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.