आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्निशमन बंबासाठी दिले होते महानगरपालिकेला पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सकाळी११.४० वाजता फटाक्यांच्या दुकानाला आग लागल्याची माहिती नागेश्वरवाडीतील नागरिकांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. ज्ञानेश्वर कुलकर्णी, अमोल जोशी, राजू स्नेही यांनी सांगितले की, अचानक फटाक्यांचे मोठे आवाज झाल्याने आम्ही घराबाहेर पडलाे. फटाक्यांच्या दुकानांना आग लागलेली दिसली. आम्ही सर्वांनी घरातील सिलिंडर बाहेर हलवले आणि घराला कुलूप लावून दूर रस्त्यावर निघून गेलो. धुराने आमचा श्वास कोंडला होता. घरांच्या खिडक्या-तावदाने फुटली. स्वयंपाकघरात काचांचा खच पडला होता.
फटाक्यांची दुकाने स्वातंत्र्यसैनिक कॉलनीला खेटून आहेत. येथील नागरिक दिवाळीच्या तयारीत होते. अचानक स्फोट होऊ लागले. रॉकेट, फुलबाज्या, सुतळी बॉम्ब खिडक्यांच्या काचा फोडून आता आले. जि. प. मैदानाच्या दिशेने पन्नास ते साठ घरे आहेत. ती घरे आगीच्या ज्वाळांनी तापू लागल्याने नागरिकांनी गॅस सिलिंडर बाहेर काढले. कॉलनीत सर्वत्र धूर पसरला. त्यामुळे अडीचशे घरांतील नागरिकांचा श्वास कोंडू लागला होता. त्यांनी नागेश्वरवाडीकडे धाव घेतली. अनेकांना या धुरामुळे उलटी मळमळ झाली.
फटाका असोसिएशनने सर्व नियमांचे पालन करूनच फटाक्यांची दुकाने सुरू केली होती. कुठल्याही नियमाचे उल्लंघन केलेले नसल्याचा दावा औरंगाबाद फटाका असोसिएशनचे कोशाध्यक्ष दत्ता खांबगावकर यांनी केला आहे. अस्थायी दुकानांचा विमा होतच नाही, तरीही आम्हाला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

औरंगाबादमध्ये १९८८ पर्यंत आमखास मैदानावर फटाक्यांचे मार्केट भरत होते. मात्र १९८९ पासून औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर दुकाने सुरू झाली. येथे दोन असोसिएशनचे प्राबल्य आहे. औरंगाबाद फायर वर्कर असोसिएशनचे अध्यक्ष माणिकचंद महतोले असून औरंगाबाद फटाका असोसिएशनचे अध्यक्ष किशनचंद तनवाणी आहेत. औरंगाबाद असोसिएशनच्यामार्फत प्रत्येकी दुकानदारांकडून २० हजार रुपये घेतले जातात. त्यानंतरच त्यांना दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली जाते. जिल्हा परिषदेची मालमत्ता असल्यामुळे त्यांच्याकडून परवानगी घेत असतो. तत्पूर्वी मनपाच्या अग्निशमन विभाग आणि पोलिस आयुक्तांकडूनही मान्यता घेतली जाते.

सर्व निकषांची पूर्तता केल्यानंतरच आम्हाला परवानगी दिली जाते. दोन दुकानांमध्ये पाच फुटांचे अंतर ठेवणे, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करणे, फायर इंस्टिग्युशरची व्यवस्था ठेवणे, एवढेच नव्हे तर अग्निशमनचे बंब दुकानांच्या जवळच उभे करण्यासाठी आम्ही मनपाकडे वारंवार पत्र दिलेले आहेत. तरीही त्यांनी अग्निशमन बंब उभे केलेले नव्हते. त्यामुळे आग वेळेत अाटोक्यात येऊ शकलेली नसल्याचे खांबगावकर यांनी म्हटले आहे. अस्थायी दुकानांचा विमा निघत नसल्याने आम्ही काढला नाही. तरीही आमचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. सरकारने आम्हाला आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वाहतूक रखडली
लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतल्याने सावकर चौक, निराला बाजार, औरंगपुरा चौकात वाहतूक ठप्प झाली. पोलिसांसह नागरिकांनी हाताचे कडे करत लोकांना अडवले. नागेश्वरवाडी, समर्थनगरातील युवकांनी वाहतूक सुरळीत केली. समर्थनगरातील रस्ते वाहनांनी फुलून गेले होते.

काय झाले कळले नाही
स्टॉल नंबर ४६ ४७ ला प्रथम आग लागल्याचे नागरिक सांगत होते. दुकान मालक रमेश जैस्वाल बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. तरीही धीर एकवटून सांगितले की, नेमकी आग कुणाच्या दुकानाला अाणि कशी लागली हे आम्हालाही माहीत नाही.

नागरिकांनी सांगितले की, सकाळी ११.४० ला आग लागली. सुरुवातीला ४६ ४७ नंबरच्या स्टाॅलने पेट घेतला. अवघ्या वीस मिनिटांत सर्व दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. आगीचे लोळ स्वातंत्र्यसैनिक कॉलनीतील घरापर्यंत पोहोचत होते.

बातम्या आणखी आहेत...