आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद क्रिकेट संघटनेचे ‘कार्याध्यक्ष’पद घटनाबाह्य!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे (एडीसीए) अध्यक्ष राम भोगले यांनी नरेंद्र पाटील यांची संघटनेच्या ‘कार्याध्यक्ष’पदी केलेली नियुक्ती चुकीची आणि घटनाबाह्य असल्याचे पुरावे ‘दिव्य मराठी’च्या हाती लागले आहेत. २७ ऑगस्ट १९७४ रोजी स्थापन झालेल्या औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या घटनेनुसार कार्यकारिणीत कार्याध्यक्ष हे पदच नाही. संघटनेच्या घटनेनुसार कार्यकारिणीत अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोशाध्यक्ष, निवडून आलेले सदस्य आणि कोऑब्टेड सदस्य असायला हवे. एडीसीएमध्ये घटनाबाह्य कार्याध्यक्षपदाची नियुक्ती केल्यामुळे अध्यक्ष राम भोगले यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी संघटनेच्या काही आजीव सदस्यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद जिल्हा क्रिकेटपटूंच्या संघटनेने जिल्हा क्रिकेट संघटनेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करताना आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आता संघटनेच्या आजीव सदस्यांनीच संघटनेच्या कामकाजावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताना अध्यक्ष राम भोगलेंसह कार्यकारिणीवर टीकास्त्र सोडले आहे. या आजीव सदस्यांमध्ये डॉ. शांतीलाल संचेती, माजी कोशाध्यक्ष किरण जोशी, मोहन बोंबले आदींचा समावेश आहे.

आजीवसदस्यांनी केलेलेे आरोप असे
{२००८ पासून निवडून आलेली आताची कार्यकारिणी घटनेनुसार काम करत नाही. घटनेनुसार दरवर्षी निवडणुका व्हायला पाहिजेत. सात वर्षांत एकही निवडणूक नाही.
{ घटनेनुसार दर तीन महिन्यांत ईसी (कार्यकारिणी सभा) व्हायला हवी. एका वर्षात चार यानुसार सात वर्षांत २८ जीबी आतापर्यंत व्हायला हव्या होत्या.
{ संघटनेने घटनेत नसलेले ‘कार्याध्यक्ष’ हे पद निर्माण केले आहे. यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावून आजीव सदस्यांना सन्मान देऊन, चर्चा करून निर्णय घेता आला असता. तसे झाले नाही.
{ सात वर्षांत औरंगाबादेत एकही रणजी सामना झाला नाही. एकही राज्यस्तरीय पंचांचे शिबिर, खेळाडूंचे शिबिर झालेले नाही.
{ संघटनेतील अंतर्गत भांडणाचे परिणाम खेळावर होत आहेत. राम भोगलेंसारखे सन्माननीय अध्यक्ष असताना संघटनेचे अंतर्गत भांडण अद्याप संपलेले नाही.
{ आता कार्यरत असलेल्या कार्यकारिणीची धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे अद्याप नोंद नाही.
कार्याध्यक्षपद नसल्याचा संघटनेच्या घटनेतील हा पुरावा.
(बजाज रुग्णालयातआयसीयूत दाखल असताना डॉ. संचेती यांनी दूरध्वनीवर आपली प्रतिक्रिया कळवली.)

ताबडतोब निवडणूक घ्या
^जिल्हा क्रिकेट संघटनेचे आताचे अध्यक्ष, सचिव घटनाबाह्य काम करत आहेत. घटनेनुसार दरवर्षी निवडणुका व्हायला पाहिजेत. मात्र, सात वर्षांत एकही निवडणूक नाही. सर्वप्रथम संघटनेची निवडणूक घ्या. घटनाबाह्य काम करणाऱ्यांना संघटनेतून दूर करा. कार्याध्यक्ष हे पद घटनाबाह्य आहे. संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आपसात भांडता क्रिकेटसाठी एकत्र यावे. -डॉ. शांतीलाल संचेती, आजीव सदस्य.

मी एडीसीएचा कार्याध्यक्ष
^होय, मी जिल्हा क्रिकेट संघटनेचा कार्याध्यक्ष आहे. संघटनेच्या कार्यकारिणीने माझी कार्याध्यक्षपदी निवड केली आहे. यासंबंधी अधिक माहिती हवी असेल तर आमच्या क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षांना तुम्ही विचारा. -नरेंद्र पाटील.

..तर अध्यक्षांनी राजीनामा द्यावा
^अध्यक्ष राम भोगले हे सर्व सन्माननीय आहेत. मात्र संघटनेतील अंतर्गद वाद संपवण्यात ते यशस्वी ठरू शकले नाही. यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी अध्यक्षपद सोडून त्या ठिकाणी दुसऱ्याला संधी द्यावी. कोणत्याही परिस्थितीत क्रिकेटचे नुकसान होता कामा नये. संघटनेत दोन उपाध्यक्ष असताना कार्याध्यक्ष पद निर्माण करण्याची गरजच काय? सर्व आजीव सदस्यांनी एकत्र यावे. -किरण जोशी, अाजीव सदस्य.
...तोपर्यंत क्रिकेटचा विकास होणार नाही : राम भोगले
मी अध्यक्ष झाल्यानंतर संघटनेतील दोन्ही गटांना एकत्र आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, कोणीही वाद संपवायला तयार नाही. प्रत्येक जण अडून असतो. कोणीच माघार घ्यायला तयार नाही. अंतर्गत तसेच न्यायालयातील भांडण जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत नीट काम करता येणार नाही, असे संघटनेचे अध्यक्ष राम भोगले यांनी सांगितले. धर्मादाय आयुक्त कार्यालयात जोपर्यंत अंतिम सुनावणी होऊन आताच्या कार्यकारिणीची नोंद होत नाही, तोपर्यंत काम पुढे सरकरणार नाही. तोपर्यंत घटनेनुसार कोणतेच मजबूत काम करता येणार नाही. मला सर्व जण राजीनामा मागत आहेत. मी राजीनामा दिला तर तो स्वीकारणार कोण? गव्हर्निंग कौन्सिल स्वीकारणार नाही. मिटकरांनी आम्हाला अजून सर्व खातेपुस्तक दिलेले नाही. आम्ही त्यांच्याविरुद्ध सात वर्षांआधी अनधिकृत सदस्य नोंदणी केल्यामुळे पोलिसांत तक्रारही केली होती. मात्र, अद्याप त्यांच्याकडून आम्हाला कसलीच मदत झालेली नाही, असेही भोगले म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...