आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादात मध्यस्थी करणार्‍या तरुणावर गोळ्या झाडल्या; एका संशयितास अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज / औरंगाबाद - दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून पेटलेल्या भांडणात मध्यस्थी करणार्‍या शेख निसार शेख शब्बीर (27) याच्या पोटावर हल्लेखोराने गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. ही घटना गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास गजबजलेल्या पंढरपूर येथील भाजी मंडईजवळ घडली. या घटनेनंतर हल्लेखोर दोन तरुण दुचाकीवरून पसार झाले. जखमी शेख निसार याला आधी खासगी आणि नंतर औरंगाबादच्या घाटी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत असून एका संशयितास अटक करण्यात आली आहे.

नगर-औरंगाबाद महामार्गावरील तिरंगा चौकाला लागूनच भाजी मंडई आहे. सायंकाळी चारच्या सुमारास भाजी मंडईजवळ दुचाकी उभी करताना शेख तालिफ शेख अजीज (20, रा. पंढरपूर) याच्या दुचाकीचा धक्का एका युवकाच्या दुचाकीला लागला. या कारणावरून तो युवक आणि त्याच्या मित्राने शेख तालिफसोबत वाद घालून त्यास मारहाण केली. त्यामुळे तालिफने शेख निसार शेख शब्बीर या मित्राला फोन करून बोलावून घेतले. शेख निसार काही वेळातच भाजी मंडईजवळ पोहोचला. त्याने तालिफला मारहाण करणार्‍या युवकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी त्यास दाद दिली नाही.

पळून जाण्यासाठी हवेत गोळीबार : शेख निसारवर गोळ्या झाडल्यानंतर भाजी मंडईतील ग्राहक व व्यावसायिक पिस्तुलाच्या आवाजाने भयभीत झाले. मात्र, आपल्याला कोणी पकडू नये यासाठी आरोपींनी हवेत गोळी झाडून दहशत पसरवत दुचाकीवरून पोबारा केला. त्यानंतर काहींनी जखमी निसारला उपचारासाठी प्रथम बजाजनगरातील खासगी रुग्णालयात आणि नंतर घाटी रुग्णालयात हलवले.

गोळीबाराची माहिती मिळताच छावणी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त एस. बी. चौगुले, वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळावरून गोळीचे रिकामे काडतूस जप्त केले. शिवाय, घटनास्थळावरील रक्तमिश्रित माती व इतर पुरावे जमा केले. युवकावर गोळ्या झाडल्याची माहिती वार्‍यासारखी पसरल्याने घटनास्थळी मोठा जमाव जमला.

पिस्तूल चालवण्यास दम आहे का?
वाद सुरू असतानाच तालिफला मारहाण करणार्‍या युवकांनी मोबाइलवरून आणखी दोन युवकांना घटनास्थळी बोलावून घेतले. तेव्हा काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनीही शेख निसार व शेख तालिफशी यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील वाद विकोपाला गेला असता दोन युवकांपैकी एकाने अचानक पिस्तूल काढून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते खेळण्यातले पिस्तूल समजून शेख निसार याने ‘तुमच्यात पिस्तूल चालवायचा दम आहे का,’ असे म्हणताच त्या युवकाने शेख निसार याच्या पोटावर जवळून दोन गोळ्या झाडल्या.

छायाचित्र - पंढरपूर येथे गुरुवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेख निसार शेख शब्बीर यास घाटीत दाखल करण्यात आले.

पुढील स्लाइडमध्ये, पंढरपूर बंदचा प्रयत्न उधळला