आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Crime News In Marathi, Girl Steal Money, Divya Marathi

लग्नात 3.5 लाखांची हातसफाई; मुलीने 10 सेकंदांत पळवली वधूमातेची पर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - हॉटेल अजंता अँम्बेसेडरमधील एका विवाह सोहळ्यातून नवदांपत्याच्या स्वागतात मग्न असलेल्या वधूच्या आईची पर्स 14 ते 15 वर्षांच्या मुलीने अलगदपणे पळवली. यात साडेतीन लाखांची रोख रक्कम होती. या मुलीचा चेहरा सोहळ्यातील व्हिडिओ शूटिंगमध्ये स्पष्ट दिसला आहे. वर्‍हाड्यांच्या गर्दीतून फक्त दहा सेकंदांत शिताफीने चोरी करणार्‍या या मुलीचा शोध पोलिस घेत आहेत. ही मुलगी चोरट्यांच्या टोळीची सदस्य असल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

जालन्यातील यशवंतनगरमधील रहिवासी अशोक तारडे यांची कन्या स्नेहाचे औरंगाबादेतील स्मित माने याच्याशी सोमवारी सायंकाळी 6.50 वाजता लग्न झाले. त्यानंतर वधू-वरांसोबत फोटो काढण्यासाठी वधूची आई नातेवाइकांसह स्टेजवर आली. नवदांपत्याला शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी होती. शुभेच्छुक मंडळी रांगा लावून येत होती. त्यांचा परिचय करून देण्याचे काम करण्यापूर्वी वधूच्या मातेने हातातील पर्स दांपत्याच्या मागे असलेल्या राजा-राणी खुर्चीवर ठेवली.

खात्री करून घेतली आणि..
हा परिचय सोहळा सुरू असताना साडेसातच्या सुमारास काळ्या रंगाचे ज्ॉकेट आणि गुलाबी रंगाची जीन्स पँट परिधान केलेली, घट्ट वेणी बांधलेली एक मुलगी वधूमाता, नातेवाईक आणि दांपत्यासमोरून गेली. दोन ते तीन सेकंद त्यांच्याजवळ थांबून तिने पर्स नेमकी कुठे ठेवली आहे, ते पाहिले. आपल्याकडे कुणाचेही लक्ष नाही, याचीही खात्री करून घेतली. मग ती थेट दांपत्याच्या मागे जाऊन उभी राहिली. तरीही आपल्याकडे कुणीही पाहत नाही हे पक्के ठाऊक झाल्यावर तिने पर्स उचलली आणि मागे वळून पाहत मंचावरून खाली उतरली.

सार्‍यांचे धाबे दणाणले
ही मुलगी निघून गेल्यावर साधारणत: पंधरा मिनिटांनी स्नेहा-स्मित यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेली गर्दी काहीशी कमी झाली. त्यानंतर वधूमाता पर्स घेण्यासाठी गेल्या, तेव्हा तेथे ती गायब झाल्याचे वधूमातेच्या लक्षात आले. त्यांनी लगेच नातेवाइकांच्या कानावर हा प्रकार घातला, तेव्हा सार्‍यांचेच धाबे दणाणून गेले. पर्समध्ये साडेतीन लाख रुपये कशासाठी ठेवले, यापासून ते पर्स नेमकी तेथेच ठेवली होती का, दुसर्‍या कुणाच्या हातात दिली होती, असे प्रश्न विचारले गेले. काही जणांनी हॉटेल परिसरात शोधमोहीम हाती घेतली. मात्र, कुणालाही थांगपत्ता लागेना. त्यामुळे वधूचा भाऊ संग्रामने सिडको पोलिस ठाण्यात तक्रार केली.

व्हिडिओ फुटेज कामी आले
रात्री 8.15च्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्या सूचनेवरून पोलिस उपनिरीक्षक हरीश खटावकर त्यांच्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. वधूमातेने दिलेल्या माहितीवरून व्हिडिओ शूटिंगच्या कॅमेर्‍यात चोरटा टिपला गेला असावा, अशी शंका त्यांना आली. फुटेज तपासणीत मुलीने पर्स पळवल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी पहाटे 2 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

‘ती’ आमच्याकडील नाही
खटावकर यांनी माने, तारडे परिवाराला चोरीच्या घटनेचे फुटेज दाखवले. तेव्हा त्यांनी ही मुलगी आमच्या परिवारातील नाही. आम्ही तिला यापूर्वी पाहिलेच नाही, असे सांगितले. त्यामुळे चोरट्यांच्या टोळीने संपूर्ण माहिती घेऊनच तिला आत पाठवले असावे. ही टोळी जालन्यापासूनच तोरडे कुटुंबाच्या मागावर असावी. त्यांना या परिवाराविषयी सखोल माहिती असावी, असा पोलिसांचा कयास आहे.

म्हणून मुलांचा वापर
पंचतारांकित हॉटेल, उच्चभ्रू वसाहतीतील लग्नात चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय असतातच. त्यात लहान मुलांचा वापर सर्रास होतो. अशी मुले चोरी करताना पकडली गेली, तरी त्यांच्याविरुद्ध पोलिस कडक कारवाई करत नसल्याने अशा चोर्‍यांमध्ये त्यांचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येतो, असे ठाकरे यांनी सांगितले.

शूटिंगमध्ये कैद
साधारणत: चार फूट दहा इंच उंची असलेल्या या चोरट्या मुलीच्या सार्‍या हालचाली परिचय सोहळ्याचे क्षण टिपणार्‍या व्हिडिओ कॅमेर्‍यामध्ये कैद झाल्या आहेत. त्यात तिच्या चेहर्‍यावरील सर्व भाव, सराईतपणाही स्पष्ट दिसतो. तिने पर्स उचलून पोबारा करण्यापर्यंत सर्वकाही टिपले गेले आहे.

चमकदार पोशाख
पर्स उचलण्यासाठी जाण्यापासून ते मंचावरून बाहेर पडेपर्यंतचा त्या मुलीचा आविर्भाव वर्‍हाडातील सदस्यासारखाच होता. त्यासाठी तिने लग्नाला साजेसा चमकदार पोशाखही परिधान केला होता.