आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता नजर भाडेकरूंवर; वाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांचे नवे पाऊल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - शहरातील वाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी आता भाडेकरूंवर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. घर मालकांनी परप्रांतातील तरुण आणि भाडेकरूंची फोटोसह सर्व माहिती संबंधित पोलिस ठाण्याला द्यावी. विशेषत: ज्या भाडेकरूंकडे पल्सर, सीबीझेड आणि यामाहासारख्या जलद गतीने धावणार्‍या दुचाक्या आहेत किंवा ज्यांची वागणूक संशयास्पद आहे, त्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी केले आहे.

मंगळसूत्र चोर्‍या, बॅग हिसकावणे सारखे गुन्हे वाढल्याने पोलिसांना मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिस गुन्ह्यांना आळा घालण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करूनही गुन्हेगार पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी होत आहेत. लोकांनी सांगितलेल्या वर्णनावरून हे चोरटे शहरातच वास्तव्यास असून ते भाड्याने खोली घेऊन राहत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी भाडेकरूंची त्यांच्या फोटोसह संपूर्ण माहिती संबंधित पोलिस ठाण्यात देण्याचे आवाहन केले आहे. शिवाय भाडेकरू अथवा गल्लीतील युवकांवर संशय असल्यास त्यांची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला 100 किंवा 2240500 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. माहिती देणार्‍याचे नाव गुप्त ठेवले जाणार असल्याची हमीही पोलिस आयुक्तांनी दिली आहे.

नागरिकांनी या उपक्रमास प्रतिसाद दिल्यास नागरिकांची फसवणूक टळण्यास मदत होणार आहे. मंगळसूत्र चोर्‍या आणि बॅग लिफ्टिंसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना पाहिजे तसे यश मिळत नसल्याने पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.

सहकार्य करावे
फसगत झालेल्या फिर्यादीनी सांगितलेल्या वर्णनावरून दुचाकी आणि युवकांचे वर्णन हे शहराबाहेरील असल्याचे लक्षात येते. त्यामुळे मालकांनी भाड्याने राहणार्‍या लोकांची माहिती द्यावी. जेणेकरून आरोपी सापडणे शक्य होईल. नागरिकांनी सहकार्य करावे.’’
संजयकुमार, पोलिस आयुक्त

नाव गोपनीय ठेवणार
पोलिसांतर्फे शनिवारपासून शहरातील वेगवेगळ्या परिसरात जागृतीसाठी स्पिकरवर दवंडी दिली जात आहे. नागरिक सहकार्य करतील अशी पोलिसांना आशा आहे. ‘ऐका हो ऐका. तुमच्या घरात भाडेकरू आहे. त्यांच्याकडे वेगाने चालणारी दुचाकी असेल तर त्यांची माहिती आम्हाला द्या. तुमचे नाव गोपनीय ठेवले जाईल. पोलिसांना मदत करा’, अशी दवंडी पोलिस देत आहेत.