आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील केवळ आठ सायबर कॅफे अधिकृत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - आसाममधील हिंसाचाराची बनावट व्हिडिओ क्लिप अनेक संकेतस्थळांसह फेसबुक आणि यू ट्यूबवर अपलोड करण्यात आली असल्याने धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात समाजविघातक कारवाईचा कट आखला जाऊ नये, यासाठी पोलिसांनी शहरातील संवेदनशील भागांसह इंटरनेट कॅफेंवरही बारीक नजर ठेवली आहे. यादरम्यान एक धक्कादायक बाब उजेडात आली असून ती म्हणजे शहरातील शेकडो इंटरनेट किंवा सायबर कॅफेंपैकी केवळ आठच सायबर कॅफेंकडे परवाना आहे. अनधिकृत सायबर कॅफेंना पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली.
शहरात एकूण 120 इंटरनेट कॅफे आहेत. त्यापैकी 20 कॅफेचालकांना परवाना देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, तर आठ कॅफेचालकांना पोलिस आयुक्त कार्यालयातून रीतसर परवाने देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त 40 कॅफेचालकांनी परवाना मिळण्यासाठी आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवले आहेत, तर उर्वरित कॅफेचालकांना परवाना घेतल्याशिवाय कॅफे सुरू ठेवू नयेत, अशा नोटिसा पोलिस आयुक्तालयाने बजावल्या आहेत.
नोव्हेंबर 2011 मध्ये फेसबुकवर हिंदू देवतांचे विडंबनात्मक चित्र प्रदर्शित केल्याने शहरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळप्रसंगी बळाचा वापर करीत वातावरण शांत केले होते. या घटनेनंतर पोलिसांनी सतर्कतेचा इशारा देत शहरातील सर्व सायबर कॅफेचालकांची बैठक बोलावून त्यांना परवाने घेण्याची सूचना केली होती. कॅफेंमध्ये येणार्‍या व्यक्तींची नोंद ठेवण्यासाठी रजिस्टर ठेवले जावे. तसेच पोलिसांनीदेखील दररोज कॅफेंची तपासणी करावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या होत्या. मात्र, नऊ महिन्यांच्या कालावधीत केवळ आठ कॅफेचालकांनी पोलिस आयुक्त कार्यालयाकडून परवाने घेतले आहेत.
आसाममधील हिंसाचाराचे पडसाद शहरात उमटू नये याची पोलिस यंत्रणा खबरदारी घेत असली तरी दुसरीकडे काही अनधिकृत सायबर कॅफेंच्या माध्यमातून या दंगलीची बनावट क्लिपचे आदानप्रदान केले जात असल्याचा संशय आहे.
शहरातील सर्वच सायबर कॅफेंची तपासणी करण्यात येत आहे. तसेच सर्व कॅफेचालकांशी पोलिस संपर्क साधत असून संशयितांबाबत माहिती द्यावी, असे आवाहन त्यांना केले जात आहे. अनधिकृत कॅफेचालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त