आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा बँक अध्यक्षपदी पुन्हा सुरेश पाटीलच?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुन्हा एका निर्णायक बहुमताने ताब्यात घेतल्यानंतर अध्यक्षपदी मावळते अध्यक्ष सुरेश पाटील यांचीच वर्णी लागणार हे स्पष्ट झाले आहे. बहुतांश संचालकांनी त्यांच्याच नावाची शिफारस केली आहे. मात्र, संचालकांच्या बैठकीत अध्यक्ष कोण हे ठरेल, मला या पदाची ओढ नाही, असे सुरेश पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

२० संचालकांपैकी १८ संचालक सुरेश पाटील यांच्या गटाचे विजयी झाले आहेत. फुलंब्रीचे संचालक पुंडलिक जंगले हे पूर्वी पाटील यांच्यासमवेतच होते. ते पुन्हा परतणार असल्याने २० पैकी १९ सदस्य त्यांच्याकडे आहेत. पाटील यांनी जिल्हा बँक चांगली चालवली नाही तर चक्क नफ्यात आणून ठेवल्याने अध्यक्षपद पुन्हा एकदा त्यांच्याकडेच द्यावे, असे संचालकांचे म्हणणे आहे. अधिकृतपणे कोणी यावर भाष्य करत नसले तरी पाटील यांच्याकडेच पुन्हा बँकेची धुरा जाईल, असे संकेत आहेत.

उपाध्यक्षपदासाठी माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. अर्थात संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल. या पदासाठी हरिभाऊ बागडे यांनी त्यांच्या कार्यकर्त्याचे नाव पुढे केल्याचे समजते.,तर राष्ट्रवादीच्या गोटातून अभिजित देशमुख यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. महिला सदस्यांना उपाध्यक्षपद द्यावे, असा एक आग्रह आहे. तसे झाल्यास वर्षा जगन्नाथ काळे माजी आमदार अण्णासाहेब माने यांच्या पत्नी मंदा माने यांच्यातून एकीची उपाध्यक्षपदावर वर्णी लागू शकते.

तिसऱ्या आठवड्यात निवड
जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष रंगनाथ काळे प्रभाकर पालोदकर यांचेही या पदासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते. बँकेचा उपाध्यक्ष हा सुरेश पाटील यांच्याच मर्जीतील असेल, हेही स्पष्ट आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बँकेच्या अध्यक्ष उपाध्यपदासाठी निवडणूक होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर केली जाईल.
बातम्या आणखी आहेत...