आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad District Harsul And Satara Village Water Problem Solved

सहा महिन्यांनंतर हर्सूल, सातार्‍याची टँकरमुक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नळ योजना नसल्याने बोअर, विहिरींच्याच पाण्यावर विसंबून असलेल्या सातारा व हर्सूल परिसरातील पाणी फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभीच संपले होते. त्यामुळे गेले सहा महिने येथील सुमारे 1 लाख नागरिक टँकरवर अवलंबून होते. जून महिन्यासोबतच पाऊस सुरू झाला आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच विहिरी व बोअरला पाणी आले. जुलैच्या मध्यात या वसाहतींची टँकरमुक्ती झाली आहे. पावसाळा सुरू होताच रेन वॉटर हार्वेस्टिंग केले जाईल, असा दावा येथील रहिवासी करत होते. मात्र मुबलक पाऊस होताच याकडे दुर्लक्ष झाले असून भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाली तर काय, याकडे नागरिकांनी हेतुपुरस्सर कानाडोळा केल्याचे स्पष्ट झाले आहे. अजूनही उशीर झाला नसून नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग करून घ्यावे, असे आवाहन जलतज्ज्ञांनी केले आहे.

सातारा परिसरात मे महिन्यात 17 शासकीय टँकर सुरू होते. खासगी टँकरची संख्या शंभराच्याही वर गेली होती. हर्सूल आणि जटवाडा रस्त्यावर पालिकेचे 7 टँकर सुरू होते आणि येथेही खासगी टँकरची संख्या शंभरावर होती. सातारा परिसरातील तलाव तसेच हर्सूल तलावात गतवर्षी पाणीच आले नव्हते. त्यामुळे या परिसरातील पातळी खालावली. हर्सूलमध्ये तर 350 फुटांवर पाणी नव्हते. सातार्‍याची परिस्थितीही तशीच होती.

100 फुटांवर आले पाणी : साडेतीनशे फूट खोल असलेले बोअर आटले होते. त्याच हर्सूल परिसरात आता 100 मीटर खोल असलेल्या बोअरला पाणी आले आहे. त्यामुळे पाणीपातळी तब्बल अडीचशे फुटांनी वाढल्याचे स्पष्ट होते. बोअरला पाणी आल्यानंतर या भागातील नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे दुर्लक्ष केले. उर्वरित पान.8

हा भाग गुंठेवारीचा असल्याने जागा नाही, असे कारण येथील रहिवासी केशव तांदळे यांनी पुढे केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सप्टेंबर महिन्यात अधिकृतपणे पाणीपातळी तपासली जाणार आहे.

बांधकामे सुरू

हर्सूल व सातारा परिसरातील स्थगित बांधकामे पुन्हा सुरू झाली आहेत. मोठे प्रकल्प अजून सुरू झाले नसले तरी वैयक्तिक बांधकामे सुरू झाल्याचे दिसते. जिल्हा प्रशासनाने सातारा परिसरातील बांधकामे सुरू करण्याबाबत अद्याप सूचित केलेले नसले तरी पाणी मुबलक असल्याने बांधकामांना वेग आला आहे.

मी गतवर्षीच रेन वॉटर हार्वेस्टिंग केले होते. त्यामुळे आमच्या बोअरला शेवटपर्यंत पाणी होते. नागरिकांनीही या पद्धतीचा वापर करावा यासाठी मी प्रयत्न केले. उल्कानगरीतील 8 अपार्टमेंट, 12 घरांवर जलपुनर्भरण करून घेतले.

साधना सुरडकर, नगरसेविका, विश्वभारती कॉलनी.

आमच्या पूर्ण वसाहतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग केले असल्याने पहिल्या दोनच पावसांनंतर आमच्या बोअरला पाणी आले. सर्वत्र असे झाले तर कोठेही पाणीटंचाई जाणवणार नाही.

एस. पी. कुलकर्णी, सातारा परिसर.

असा झाला औरंगाबाद शहर व परिसरात पाऊस

औरंगाबाद तालुक्याची सरासरी 281 मिलिमीटर इतकी आहे. प्रत्यक्षात दीडशे टक्के पाऊस झाला आहे. मंडळनिहाय

पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये

औरंगपुरा 434
उस्मानपुरा 402
भावसिंगपुरा 396
कांचनवाडी 482
हर्सूल 440
चिकलठाणा 306

पुनर्भरणाची गरज
पाण्याच्या बाबतीत नागरिकांमध्ये गांभीर्य नाही. पुढील वर्षी पाऊस पडेल की नाही, याची शाश्वती नाही. तरीही जलपुनर्भरण केले जात नाही. 365 दिवसांपैकी फक्त 240 तास पाऊस पडतो. तेवढे पाणी साठवणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी रेन हार्वेस्टिंग तातडीने करून घ्यावे. खबरदारी घेण्याची गरज आहे. डॉ. दत्ता देशकर, जलतज्ज्ञ.