आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad District Ncp Body Dismiss For Bad Election Result

राष्ट्रवादीची औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत अपयश पदरात पडल्यामुळे अस्वस्थ झालेल्या जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांनी शनिवारी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. पक्षविरोधी कारवायांचा रोग बळावल्याने ही शस्त्रक्रिया करावी लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

2007 मध्ये तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा. किशोर पाटील यांनी कार्यकारिणी स्थापन केली होती. त्यात जिल्हा व तालुकास्तराचे 150 पेक्षा अधिक पदाधिकारी होते. आठ महिन्यांपूर्वी सोनवणे यांनी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, परंतु जुनी कार्यकारिणी कायम ठेवली. सोनवणे म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा जुन्या पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊनच तिकिटांचे वाटप केले. त्यांच्या सल्ल्यानेच प्रचार यंत्रणा राबवली, पण पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्याची अनेक कारणे पुढे आली. त्यापैकी एक पक्षविरोधी नेते-कार्यकर्ते हे होते. नेतेच अधिकृत उमेदवारांविरुद्ध कारवाया करत होते.

त्यामुळे त्यांचे ऑपरेशन करणे आवश्यक होते. म्हणून संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्तीचा निर्णय घेतला. जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीनंतर आढावा घेऊन नवी कार्यकारिणी जाहीर केली जाईल. पक्षाशी एकनिष्ठ एवढय़ा एका निकषावरच नव्यांना संधी दिली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.