आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवलाईचे गाव : औरंगाबादच्या कुशीत वसले नयनरम्य कोकण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उंचच उंच नारळाची झाडे, बाजूने वाहणारे निळेशार पाणी, पोफळीच्या आणि विविध फळांनी बहरलेल्या बागा... हे प्रसन्न चित्र खरे चित्र कोकणातच पाहावयास मिळते. म्हणून पर्यटकांचा ओढा कोकणाकडे अधिक असतो. मात्र, असाच एक कोकण औरंगाबाद शहरालगतच्या पाटोदा या एका छोट्या गावात वसला आहे. या आदर्श गावाने तब्बल एक कोटी रुपयांची बक्षिसे शासनाकडून पटकावली आहेत. या रकमेचा उपयोग गावकर्‍यांनी स्वच्छ, सुंदर आिण सुजलाम सुफलाम गाव उभारण्यासाठी केला आहे. एटीएम मशीनद्वारे गावकर्‍यांना पाणी देणारे हे देशातील पहिलेच गाव.

औरंगाबाद शहरातून वाळूजच्या दिशेने निघाले की, कंपन्यांच्या धुराड्यांतून, मोठमोठ्या खड्ड्यांच्या रस्त्यातून वाट काढत बजाजनगरच्या पुढे डाव्या बाजूला दूरवर नारळाची उंचच उंच झाडे लक्ष वेधून घेतात. चाळीस फूट रुंद रस्त्यावरून आत गेले की, दोन्ही बाजूंनी उभी असलेली नारळाची झाडे तुमचे स्वागत करतात. बाजूलाच गर्द झाडीत चिकू, आंबा, पपईची झाडे दाटीवाटीने लगडलेली दिसतात. मध्येच डाळिंबाची लाल रसरसीत फळांनी बहरलेली बाग दिसते. मध्येच शेतात थुईथुई नाचणारी ड्रीपच्या पाण्याची मनमोहक कारंजी पाहून अगदी प्रसन्न वाटते.

नारळाची झाडे हे खास वैशिष्ट्य : गावच्याप्रवेशव्दारापासून अगदी मंदिराच्या पारापर्यंत चहुबाजूंनी नारळाची झाडेच झाडे दिसतात. खाम नदीच्या किनारी असलेल्या या गावाने ‘पाणी अडवा पाणी जिरवा’चा वापर करत अवघा गाव हिरवागार केला आहे. सिमेंटचे चकचकीत रस्ते आणि गर्द झाडीतून वाट काढत आपण ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पहोचतो अन् तेथे आगळ्यावेगळ्या गावाची साक्ष पटते.

वॉटर रिसायकलिंगमुळे बनले कोकण... : पाटोदागावची लोकसंख्या अवघी अडीच हजार असून भरपूर पाण्यामुळे सर्वत्र बागायती शेती आहे. ऊस, कापूस, डाळिंब ही नगदी पिके घेतली जातात. घराघरातून बाहेर पडणारे सांडपाणी एका टँकमध्ये एकत्र करून आठवड्याला एक ते दीड लाख लीटर पाणी रिसायकल करून ते गावातील झाडांना सोडले जाते. त्यासाठी ग्रामपंचायतीने वेगळी पाइपलाइन करून प्रत्येक चौकात सांडपाण्याचे नळ दिले आहेत. नारळासह इतर झाडांना चुकता पाणी दिले जाते. त्यामुळे संपूर्ण गाव हा कोकणासारखा सुजलाम सुफलाम झाला आहे.

आम्हाला गावाचा अभिमान
आमच्यागावात सुरुवातीला पाणीटंचाई होती. मात्र, गेल्या वीस वर्षात सुनियोजित कारभारामुळे आम्ही पाणीटंचाईवर मात केली याचा आम्हाला अभिमान आहे. - कल्याण पेरे, शेतकरी

उत्पन्न मिळवण्याच्या उद्देशाने प्रयोग : समृद्धगावामुळे शासनाचे अनेक पुरस्कार मिळवून आम्ही विकास साधला आहे. गावास कायमचे उत्पन्न मिळावे म्हणून नारळाची झाडे लावण्याचा प्रयोग केला. झाडे मोठी झाल्यावर ग्रामपंचायतीला वर्षाकाठी २० लाखांचे उत्पन्न मिळू शकेल. - आर. डी. चौधरी, ग्रामविकास अधिकारी

पुरस्काराच्या रकमेतून विकास कामे : राष्ट्रसंतश्री तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेतून ग्रामस्वच्छता अभियान राबवल्याने आमच्या गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. यातून प्रेरणा घेत सलग पंचवीस वर्षे आमच्या गावावर पुरस्कारांचा वर्षाव झाला. पुरस्काराची ही रक्कम एक कोटीच्या आसपास मिळाली. त्यातून आम्ही गावाचा विकास केला.
- दत्तात्रयशहाणे, सरपंच

एटीएमने पाणी
आधुनिक शहरालाही लाजवेल असे हे गाव आहे. २० लिटर स्वच्छ पाण्याचा जार येथे २० रुपयांना मिळतो. ग्रामपंचायतीच्या कार्यालयामागेच आरओ सिस्टिम बसवून शुद्ध पाण्याचा एक प्रकल्पच यासाठी उभा आहे. तेथे प्लास्टिकच्या जारमध्ये पाण्याचे पॅकंग होते. गावकर्‍याला जार हवा असल्यास एटीएम मशीनवर ग्रामपंचायतने दिलेले पोस्टपेड कार्ड स्वॅप केले की, अवघ्या २० रुपयांत एक जार मिळतो. एवढेच नव्हे, गावात जागोजाग पाण्याचा नळ पोहोचलेला आहे.