आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हैसमाळ-वेरूळ-खुलताबाद स्थळांचा होणार कायापालट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - खुलताबादचे अपक्ष आमदार प्रशांत बंब यांनी औरंगाबाद जिल्हा पर्यटन प्राधिकरणाचे दोन तुकडे पाडले. स्वत:च्या मतदारसंघासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची निर्मिती केली. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला जास्तीत जास्त 150 कोटी मिळणार, असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात बंब यांनी त्यांच्या मतदारसंघातील म्हैसमाळसाठीच 170 कोटी मंजूर केले असून खुलताबाद आणि वेरूळ तसेच शूलिभंजनचे नाव पुढे करून 400 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हैसमाळच्या विकासासाठी 170 कोटी रुपये देण्याच्या प्रस्तावाची मंजुरी अंतिम टप्प्यात असतानाच बुधवारी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्या उपस्थितीत झालेल्या पर्यटन समितीच्या बैठकीत खुलताबाद-वेरूळ-शूलिभंजनच्या विकासासाठी 400 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय झाला. येत्या आठवड्यात हा प्रस्ताव पाठवला जाणार आहे.

ग्रीन पार्क कोठे असावे, रोप वे कोठे असावा, कन्नडहून म्हैसमाळला येण्यासाठीचा रस्ता कोठून असावा याच्या सर्वेक्षणासाठी 10 लाख रुपये दिले जातील. 15 ते 20 दिवसांत याचे सर्वेक्षण पूर्ण होईल. त्यानंतर कोणत्या कामासाठी किती निधी लागेल, याचा आराखडा तयार केला जाईल. त्यात प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचा समावेश केला जाईल. सर्व कामे एकाच आराखड्यात घेतली जातील. यामध्ये पाणपोई, शौचालये यांचाही समावेश असेल. त्यासाठी 400 कोटींची आवश्यकता असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. आराखडा 15 दिवसांत शासनाकडे जाईल. त्यावर शासनाची शिखर समिती निर्णय घेईल व त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होईल.

स्वतंत्र प्राधिकरणासाठी हट्ट
- जिल्ह्यात सर्वाधिक पर्यटन संधी खुलताबाद तालुक्यात आहे. त्यामुळे यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाचा मी हट्ट केला होता. त्याला मान्यता मिळाली.लवकरच 400 कोटी रुपयांचा निधी मिळेल. प्रशांत बंब, आमदार.