औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण ९ मतदारसंघांतून १५६ उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य बुधवार, १५ रोजी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांत बंद होणार आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व मतदान केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अपंग, वृद्ध मतदारांसाठी विशेष सोय आहे.सिल्लोड तालुक्यात १६ उमेदवार रिंगणात आहेत.
विद्यमान आमदार अब्दुल सत्तार व भाजपचे सुरेश बनकर यांच्यात थेट लढत होणार आहे. कन्नड तालुक्यातून १२ उमेदवार रिंगणात असून येथे पंचरंगी लढत रंगणार आहे. फुलंब्री तालुक्यात तिरंगी लढत आहे. एकूण १३ उमेदवारांपैकी भाजपचे हरिभाऊ बागडे, कॉँग्रेसचे कल्याण काळे तसेच राष्ट्रवादीच्या अनुराधा चव्हाण यांच्यात चढाओढ आहे. पैठण तालुक्यात १९ उमेदवार एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. प्रमुख चार उमेदवारांमध्ये लढत होईल, यात कोण किती मते खेचतो, यावर विजयाचे गणित अवलंबून राहील. गंगापूर तालुक्यात विचित्र परिस्थिती आहे. विद्यमान आमदार प्रशांत बंब यांच्यासमोर शिवसेना, राष्ट्रवादी, कॉँग्रेस उमेदवारांचे तगडे आव्हान आहे. वैजापूर तालुक्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेत तिरंगी लढत होत आहे. मतदानाच्या एकूण टक्केवारीवर निकालाचा कौल राहणार आहे.
मतदानाच्या पूर्वसंध्येला पैजांचे फड रंगले
मतदानाच्या पूर्वसंध्येला कोण निवडून येणार, यावर पैजा लागल्या आहेत. हॉटेल-ढाबे व चौकाचौकांत अमुक उमेदवार निवडून येणार तमुक पडणार, कोणामुळे कोण पडणार, कोण कुणाची मते खाणार, अशा चर्चा सर्वत्र रंगल्याने दिसून आले. मतदानासाठी लासूर स्टेशन केंद्र क्रमांक ११६ ग्रामपंचायत कार्यालय हे संवेदनशील केंद्र जाहीर केल्याने परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.