आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खास गेटचे ‘खास’पण हरवले; औरंगाबादेत 52 पैकी मोजकेच दरवाजे शिल्लक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ऐतिहासिक औरंगाबाद शहरास मोठा इतिहास आहे. कधी काळी शहराच्या संरक्षणासाठी चहुबाजूने भक्कम तटबंदी आणि प्रवेशासाठी 52 दरवाजे होते. या भक्कम दरवाजांवरूनच शहराची विशेष ओळख होती. आज तटबंदी नामशेष झाली असून काही दरवाजेच शिल्लक आहेत. तेही देखभालीअभावी शेवटची घटका मोजत आहेत. यातील जिन्सी येथील ‘खास गेट’ या दरवाजाची देखरेख न झाल्याने मोठय़ा प्रमाणावर पडझड झाली आहे.
मोगल सम्राट औरंगजेबने पत्नीसाठी बायजीपुर्‍यात सन 1681 ते 1683 या कालावधीत विशेष किल्ला बांधला होता. तेव्हा शहरात असे पाच किल्ले होते, जे आज नामशेष झाले आहेत. या वसाहतीत राजघराण्यातील काही निवडक लोक, सरदार, सेनापती व मंत्र्यांची वसाहत होती. या वसाहतीत प्रवेश करण्यासाठी सध्याच्या जिन्सी भागात असणारा ‘खास’ दरवाजा उभारण्यात आला. तेव्हा या दरवाजातून काही मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जात असे. यामुळे या दरवाजाचे नाव ‘खास दरवाजा’ असे पडले. मोगल शासन काळात शहराभोवती असणारी तटबंदी आणि दरवाजांची देखभाल ठेवली जायची. यामुळेच सुमारे 400 वर्षांनंतरही दिल्ली गेट, रंगीन दरवाजा, भडकल गेट, रोशन गेट, कटकट गेट, पैठण गेट, बारापुल्ला गेट, काला दरवाजा, नौबत दरवाजा असे काही मोजके दरवाजे आजही सुस्थितीत आहेत. मकई गेट, दिल्ली गेट व भडकल गेटच्या संवर्धनाची जबाबदारी पुरातत्त्व विभागाकडे आहे. दरवाजांची देखभाल मनपा करते. काही वर्षांपासून दुर्लक्ष झाल्यामुळे तटबंदी दरवाजांची पडझड झाली आहे.
वारसा जपण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा
ऐतिहासिक वास्तूंमध्ये खास गेटचा समावेश आहे. दरवाजांवरून शहराची वेगळी ओळख आहे. हा वारसा जपण्यासाठी मनपाने पुढाकार घ्यावा. मोडकळीस आलेल्या दरवाजांची तत्काळ दुरुस्ती करावी.
-डॉ. शेख रमजान, इतिहासतज्ज्ञ
दरवर्षी पावसाळ्यात या गेटची पडझड होते. यासंदर्भात आम्ही मनपाकडे तक्रार करून गेटच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. मात्र मनपा याकडे दुर्लक्ष करीत आहे. गेटचे दगड कोसळत असल्यामुळे मुलांच्या जीवितास धोका होऊ शकतो.
-सय्यद मकसूद अली, रहिवासी, जिन्सी
>राज्य पुरातत्त्व विभागाकडे शहरातील तीनच दरवाजांची जबाबदारी आहे. उर्वरित दरवाजांच्या संवर्धनाचे काम मनपाकडे आहे.
-एन.एन. मार्कंडे, तंत्रसहायक, पुरातत्त्व विभाग
>मनपाने लाखो रुपये खर्च करून ऐतिहासिक दरवाजांची दुरुस्ती केली आहे, परंतु निधीअभावी काही दरवाजांचे काम करणे बाकी आहे.
-सिकंदर अली, कार्यकारी अभियंता, मनपा