आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐतिहासिक वास्तूंच्या देखरेखीची उद्योजकांची तयारी, पण प्रशासन सुस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद हे ऐतिहासिक शहर आहे; पण त्याचे कौतुक जिल्हा प्रशासनाला नाही, असेच दिसते. अनेक पुरातन वास्तूंची देखभाल करण्यात ते अपयशी ठरले आहे. दौलताबाद गावात किल्ल्याच्या मागे शंभर फूट अंतरावर असलेल्या महालाची माहिती कोणाकडेही नाही. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. दुलारी कुरेशी यांनी सर्वप्रथम या जागेचे शास्त्रीय संशोधन केले. येथे मुसाफीरखाना व हाथीखाना होता. एवढेच नव्हे तर या ठिकाणी पाण्याची अद्ययावत वितरण यंत्रणा अजूनही शाबूत असल्याचे स्पष्ट झाले.

टाऊन प्लॅनिंगकडे आहे नकाशा

चमूने रंगमहालाबाबत खोलात जाऊन माहिती घेतली असता अनेक बाबी समोर आल्या. या ऐतिहासिक ठेव्याची जपणूक करायला कुणीही तयार नाही. भारतीय पुरातत्त्व विभाग, राज्य पुरातत्त्व विभाग व जिल्हा प्रशासन यांच्याकडे या महालाची माहितीच नसल्याचे संवर्धन करू इच्छिणार्‍या उद्योजकांना सांगण्यात आले. मात्र, डीबी स्टारच्या हाती महालाचा टाऊन प्लॅनिंग विभागाने तयार केलेला नकाशाच हाती आला.

सीटीआरने केले होते प्रयत्न

औरंगाबादेत चिकलठाणा वसाहतीत सीटीआर नावाची कंपनी आहे. कंपनीचे मालक अनिलकुमार यांना पर्यटनाची खूप आवड आहे. दौलताबाद परिसर त्यांना खूप आवडल्याने त्यांनी तेथे फार्म हाऊससाठी जागा घेतली. किल्ल्याच्या मागे असलेल्या त्यांच्या फार्म हाऊससमोरच टेकडीवर त्यांना हा पडका रंगमहाल दिसला. ते पायी चालत तेथे गेले. रंगमहालाची माहिती घेतली, परंतु या वास्तूकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे त्यांना आढळले. दरम्यान या ठिकाणाहून माती व मुरूम चोरी होते. याची माहिती काही लोकांनी तत्कालीन विभागीय आयुक्त भास्कर मुंडे, तत्कालीन जिल्हाधिकारी कुणालकुमार यांना दिली; पण त्यांच्या या तक्रारीची दखल कुणीही घेतली नाही. एका मोठय़ा ऐतिहासिक वास्तूची अशी अवहेलना होताना पाहून त्यांना वाईट वाटले म्हणून त्यांनी जिल्हा प्रशासनासह दिल्लीतील भारतीय पुरातत्त्व विभाग, राज्य पुरातत्त्व विभागाला त्याच्या संवर्धनाची परवानगी मागितली. सर्वांनी हे संवर्धन तत्काळ करू, असे आश्वासन दिले; पण रंगमहालाकडे कोणी ढुंकूनही बघितले नाही. शेवटी अनिलकुमार यांनी हताश होऊन या रंगमहालाच्या संवर्धनाचा नाद सोडून दिला.

पुरातत्त्व विभाग उदासीन

अनिलकुमार यांनी सतत तीन वर्षे औरंगाबादचे जिल्हा प्रशासन यात दौलताबादचे तहसीलदार, जिल्हाधिकारी, विभागीय तसेच केंद्र व राज्य पुरातत्त्व विभाग यांना हा महाल नेमका कोणाच्या अखत्यारीत येतो याची माहिती घेतली; पण सर्वांनी आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलली. कागदोपत्री ही जागा कोणाच्याच मालकीची नाही असेच सर्वांनी सांगितले. पण प्रत्यक्षात ही जागा जिल्हा प्रशासनाच्या त्याब्यात आहे. तसा नकाशाही डीबी स्टारने मिळवला आहे. सर्व जागेला जुन्या दगडी तटबंदीचे मार्किंग आहे. हे मार्किंग सॅटेलाइट इमेजवरही दिसते अन् नगररचना विभागाच्या नकाशातही दिसते.

आम्हाला मदत करायची होती
औरंगाबादला आमची कंपनी असल्याने मला या गावाविषयी आत्मीयता आहे. मी जगभर अनेक पर्यटनस्थळे पाहतो, पण एवढी अनास्था मी कुठेही पाहिली नाही. रंगमहालासाठी काहीतरी करावे या भावनेने मदत करायची इच्छा होती, पण कोणालाच त्याचे काही वाटत नाही. मी प्रयत्न करून शेवटी प्रशासनाचा पिच्छा पुरवणे सोडून दिले. हा महाल 14 व्या शतकात बांधला असल्याने त्याचे महत्त्व मोठे आहे, तो जतन केला पाहिजे.

अनिलकुमार, व्यवस्थापकीय संचालक, सीटीआर

राज्य शासनाला पत्र लिहितो
आमच्या अखत्यारीत शहरातील पुरातन वास्तू येतात. मी दौलताबाद किल्ल्याला शंभरपेक्षा जास्त वेळा भेट दिली आहे. रंगमहालही अनेक वेळा पाहिला आहे. त्याचे संवर्धन योग्य पद्धतीने झाले पाहिजे. हा महाल दुरुस्त करण्यासाठी लागणारे इंजिनिअर्स इन्टॅककडे आहेत. तेच या महालाची डागडुजी करू शकतात. याबाबत मी शासनाला पत्र पाठवतो व पुन्हा रंगमहालाची पाहणी करतो.

जयंत देशपांडे, अध्यक्ष, हेरिटेज कमिटी, औरंगाबाद

उजाड जागेचे नंदनवन होऊ शकते
आम्ही इन्टॅकच्या माध्यमातून या जागेचा बराच शोध लावण्याचा प्रयत्न केला, पण ही जागा आज कोणाच्याही ताब्यात नाही हे पाहून वाईट वाटले. केंद्र व राज्य पुरातत्त्व विभागाकडे या वास्तूची नोंदच नाही. दौलताबादचा किल्ला जरी जागतिक वारसा यादीत असला तरी ही वास्तू मात्र अशा कुठल्याही यादीत नाही. शासनाने पुढाकार घेतला तर हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते.

मुकुंद भोगले, अध्यक्ष, इन्टॅक