आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Dr.babasaheb Ambedkar Law College Hostel Issue

कायद्याच्या विद्यार्थ्यांचे ‘शिक्षा’गृह; विधी महाविद्यालयाचे वसतिगृह झाले बकाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गोरगरीब आणि तळागाळातल्या विद्यार्थ्यांना चांगले व उच्च शिक्षण मिळावे, चांगल्या वातावरणात शिक्षण घेण्याची संधी मिळावी हे डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते. त्यांनी स्वत: जातीने लक्ष घालून मुलांच्या होस्टेलची उभारणी केली. सगळी व्यवस्था चांगली व्हावी यासाठी त्यांचे अनेक दिवस या लॉ कॉलेजच्या होस्टेलवर वास्तव्य होते. मात्र, महाविद्यालय प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे वसतिगृहाची स्थिती राहण्यायोग्य नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजच्या राऊंड होस्टेलमध्ये देशाचे भावी वकील सुविधांअभावी नरकयातना भोगत आहेत. कचरा, अंधार, साप-विंचवांचा वावर, दुर्गंधी आणि खराब पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. संस्थेच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य या इमारतीमध्ये होते. बाबासाहेबांनी समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा यासाठी आयुष्य वेचले. त्याच वास्तूकडे आणि तेथील विद्यार्थ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे गोरगरीब, ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.

संसद भवनासारखी इमारत
देशाच्या संसद भवनासारखीच या होस्टेलची रचना आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला येथे राहत असताना आपण देशाच्या सर्वोच्च सभागृहात राहून शिकत असल्याचा आनंद मिळावा हाच त्यामागचा हेतू होता; परंतु आज ही जागा सर्वात खराब जागा असल्याचे विद्यार्थी सांगतात.

सर्वत्र अंधाराचे साम्राज्य
होस्टेलच्या परिसरात रात्रीच्या वेळी बहुतेक वेळा एकही दिवा सुरू नसतो. हॅलोजन बसवला, मात्र तोही बंदच असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी हे होस्टेल अंधारात गुडूप होते. त्यामुळे विद्यार्थी बाहेर पडण्यास धजावत नाहीत.

साप, विंचू-काट्यांची भीती
चहुबाजूने मोकळी जागा, स्वच्छतेची वानवा, तुटलेले दरवाजे, अशा सगळ्या वातावरणात होस्टेलच्या आवारात सापांचा वावर असतो. 15 दिवसांपूर्वी खोली क्रमांक सातमध्ये सापाची जोडी रात्रीच्या वेळी निघाली. सकाळी झाडू मारताना गणेश नावाच्या विद्यार्थ्याला ती दिसली. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे.

कचराकुंडी परवडली
होस्टेलच्या आवारात साफसफाई करण्यासाठी एक कर्मचारी अधूनमधून येतो. तो झाडू मारण्याचा सोपस्कार पूर्ण करतो. होस्टेलचा परिसर मोठा आहे. नियमित सफाई होत नसल्याने कचर्‍याचे ढीग सर्वत्र पडलेले असतात. कचर्‍यामुळे परिसरात डासांचा कायम प्रादुर्भाव असतो. त्यामुळे मुले साथीच्या आजारांना बळी पडतात. परिणामी त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होतो. या ठिकाणी औषध फवारणी कधी होतच नाही.

कायद्याच्या विद्यार्थ्यांचे ‘शिक्षा’गृह
विद्यार्थ्यांसाठी असलेली शौचालयेही मोडकळीस आलेली आहेत. त्यातच सफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरते.

पाण्याची टाकी उघडी-पाणी साठवण्यासाठी बांधलेली टाकी उघडी असल्याने त्यात कायम घाण पडते. ते कित्येक दिवस तसेच राहत असल्याने अशुद्ध पाण्याचा वापर विद्यार्थ्यांना करावा लागतो. टाकीची साफसफाई कधीही होत नाही.

रॉकेलवर डल्ला-होस्टेलमध्ये मेसची व्यवस्था नाही आणि त्यात ग्रामीण भागातून विद्यार्थी आलेले असल्याने त्यांना हॉटेलमध्ये जाणे परवडत नाही. त्यामुळे ते स्वयंपाक होस्टेलमध्येच करतात, मात्र विद्यार्थ्यांसाठी राखीव कोट्यातील रॉकेल कधीही मिळत नाही. परिणामी आठवड्यातून काही विद्यार्थ्यांना उपाशीपोटी झोपावे लागते.

तक्रार केल्यास धमक्या-येथील होस्टेलच्या वॉर्डनने याबाबत आतापर्यंत किमान 200 हून अधिक तक्रारी कॉलेज प्रशासनाकडे केल्या, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. तक्रारी केल्यास मार्क कापण्याची धमकी दिली जात असल्याचे विद्यार्थी सांगतात.

शिक्षण होईपर्यंत पर्याय नाही
शिक्षण घेण्यासाठी गाव सोडून येथे आलो आहे. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आम्हाला शिक्षण पूर्ण होईपर्यंत येथेच राहावे लागणार. दुसरा पर्यायच नाही.
- मीनेश खिल्लारे, विद्यार्थी

पैसे भरून यातना सोसतो
आमच्या खिशातून वर्षाला कॉलेजमध्ये पैसे भरतो. यात सुविधा तर मिळत नाहीत, वर येथे राहून प्रचंड मनस्ताप होतोय.
- चेतन गोपनारायण, विद्यार्थी

स्वप्न पूर्ण करायचे आहे
शिकून मोठा होण्याचे माझे स्वप्न आहे. माझ्या आई-वडिलांनी खूप कष्ट केले. आता त्यांच्या सेवेसाठी मला खूप शिकायचे आहे. म्हणून आहे त्या परिस्थितीत शिकत आहे.
-यशवंत शेजवळ, विद्यार्थी

जंगलात राहिल्यासारखे वाटते
होस्टेलवर राहणे म्हणजे एखाद्या जंगलात राहिल्यासारखेच आहे. कधी साप, तर कधी विंचू दिसतात. येथे राहताना खूप भीती वाटते.
- मिलिंद मगरे, विद्यार्थी

प्रशासन गैरफायदा घेते
आमचे मार्क प्रशासनाच्या हातात आहेत. आवाज उठवाल तर बघून घेऊ, असे बोलतात. आम्हा विद्यार्थ्यांच्या मजबुरीचा गैरफायदा घेतला जात आहे.
-अभिजित वानखेडे, विद्यार्थी

किती दिवस गप्प बसणार ?
माझे शेवटचे वर्ष सुरू आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून होस्टेलची अवस्था अशीच आहे. अनेकदा तक्रारी करूनही काही फायदा झाला नाही. किती दिवस गप्प बसायचे हेच समजत नाही. यावर उपाययोजना झालीच पाहिजे.

-मिलिंद उबाळे, विद्यार्थी

राऊंड होस्टेलला दुर्दशेचा विळखा

परिस्थिती बदलावी
पाच वर्षांपूर्वी आम्ही होस्टेलमध्ये राहत होतो. तेव्हा जी अवस्था होती ती आजतागायत कायम आहे. परिस्थिती बदलली नाही तर न्यायालयात जावे लागेल.
अँड. सचिन थोरात, माजी विद्यार्थी

लवकर सुधारणा करावी
मिलिंद कॉलेज तयार होत असताना डॉ. बाबासाहेब राऊंड होस्टेलच्या दोन रूमचा वापर करीत असत. त्याच होस्टेलची अवस्था दयनीय झाली आहे. आज या होस्टेलमधील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. संस्थेने वसतिगृहाची सुधारणा करायलाच हवी.
-प्रा. ऋषीकेश कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक

..तर ताकद दाखवू
होस्टेलमध्ये सर्व विद्यार्थी गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले आहेत. विद्यार्थ्यांची येथे थट्टा होत आहे. कॉलेज प्रशासनाने लवकरच सुविधा न दिल्यास विद्यार्थ्यांची ताकद दाखवावी लागेल.
- विपिन वाकेकर, संविधान बचाव समिती