आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Dr.babasaheb Ambedkar University VC Speech Issue

मानधनाची रक्कम कुलगुरु डॉ. पांढरीपांडे यांनी केली परत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी भाषणाच्या मोबदल्यात घेतलेले तीन हजार रुपये मंगळवारी (5 फेब्रुवारी) परत केले. विद्या प्रबोधिनीतील लेखाकोशात ही रक्कम जमा करण्यात आली असून कुलगुरूंना रीतसर पावती देण्यात आली आहे.

‘काटकसर घोषित करणार्‍या कुलगुरूंनी घेतले विद्या प्रबोधिनीतील भाषणांचे मानधन’ या मथळ्याखाली दै. ‘दिव्य मराठी’मध्ये 4 फेब्रुवारीला वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. कुलगुरूंनी स्वत:च्याच विद्यापीठात भाषणाचे मानधन घेणे गैर असल्याचे माजी कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे, डॉ. जनार्दन वाघमारे आणि डॉ. शिवराज नाकाडे यांनी म्हटले होते, तर डॉ. पांढरीपांडे यांनी मात्र नकळत घेतले, पण नियमानुसार मानधन दिले म्हणून घेतले, असे सांगत सर्मथन केले होते. एवढय़ा मोठय़ा हुद्दय़ावरील व्यक्तीने भाषणाच्या बदल्यात मानधन घेण्याच्या मानसिकतेवर शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी टीका केली होती. भीमशक्ती विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल दांडगे यांनी तर ‘मानधन परत करा, अन्यथा राजीनामा द्या’ अशी मागणी केली होती. भीमशक्तीचे शहराध्यक्ष संतोष भिंगारे यांनी कुलपतींकडे तक्रार करण्याची तयारी दर्शवली होती. अधिसभा सदस्य प्रा. गजानन सानप यांनी अर्थसंकल्पावरील अधिसभेत हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचा इशाराही दिला होता. धक्कादायक प्रकार उघडकीस आणल्यानंतर कुलगुरू सकाळी दालनात येऊन बसले. त्यांनी विद्या प्रबोधिनीचे संचालक डॉ. महेंद्र शिरसाट यांना दूरध्वनीवर तीन हजार रुपये जमा करण्यात येत असल्याचे कळवले. तत्पूर्वी कुलगुरूंनी सोमवारी दुपारी डॉ. शिरसाट आणि विद्यापीठातील अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा केली होती. मानधन परत करण्यासंदर्भात सोमवारीच निर्णय झाला, असे डॉ. शिरसाट यांनी सांगितले आहे.