आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगभूमी - कलाकार होण्याची तिसरी घंटा वाजली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - झगमगाट, टाळ्यांचा कडकडाट आणि प्रेक्षकांची वाहवा मिळावी, या ग्लॅमरस आणि चंदेरी दुनियेचा आपणही एक तारा व्हावे, यासाठी शहरातील तरुण आटोकाट प्रयत्न करतात. त्यांना त्या दुनियेत पाऊल ठेवण्यासाठी मदत करणारे नाट्यशास्त्र विभागाचे अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी तिसरी आणि अखेरची घंटा वाजली आहे.
शहरात तीन महाविद्यालयांत नाट्यशास्त्र विषय आहे. तर दोन स्वतंत्र नाट्यशास्त्र विभाग आहेत. या विभागांमार्फत अभिनय, नृत्य, दिग्दर्शन, लोककला, रंगतंत्र, फिल्म मेकिंग आदी विषयांचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या शिवाय पीसीसीसारख्या अर्धवेळ आणि शॉर्ट टर्म कोर्सेसही उपलब्ध आहेत. 16 जुलै ही प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख आहे. रंगभूमीवर आणि पडद्यावरच्या कामासोबत बॅकस्टेज आणि प्रॉडक्शनमध्येही मोठय़ा प्रमाणावर रोजगाराच्या संधी आहेत. स्क्रीप्ट रायटिंग, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, ब्रॅडिंग, फिल्म एडिटिंग या बाबींचे प्रशिक्षण घेतल्यास हौसेसोबत रोजगाराचा प्रश्नही सुटतो.
दरवर्षी विविध महाविद्यालयांतून सुमारे 150 विद्यार्थी पास होतात. अनेकांना आपले स्वप्न साकारण्याची संधी मिळते, तर अनेकांना सामान्यांसारखी पठडीतली वाट जगावी लागते. अनेकांना पुढील वाटचाल करण्यासाठी मुंबई पुण्याला जाणे शक्य नाही. म्हणून औरंगाबादेतच व्यावसायिक रंगभूमीची निर्मिती करावी आणि नाटकांचे राज्यभर दौरे करावेत, यासाठी शहरातील विविध नाट्यशास्त्राचे माजी विद्यार्थी आणि विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग व्यावसायिक नाटकाची निर्मिती करणार आहे. ‘काय बाय सांगे’ या सचिन मोटे लिखित आणि प्रा. योगेश शिरसाट दिग्दर्शित नाटकाने या उपक्रमाची सुरुवात होणार असून राज्यभर या नाटकाचे किमान पन्नास प्रयोग होणार आहेत, अशी माहिती शिरसाट यांनी दिली.
या कलावंतांनी गाजवली चित्रपटसृष्टी-रंगभूमी - मकरंद अनासपुरे, चंद्रकांत कुलकर्णी, नंदू माधव, सचिन गोस्वामी, किरण पोत्रेकर, संदीप पाठक, अरविंद जगताप, मंगेश देसाई, प्रतीक्षा लोणकर, वर्षा उसगावकर, प्रकाश भागवत, योगेश शिरसाट, शाम राजपूत, नारायण नरवडे, पद्मनाभ पाठक, प्रा. दासू वैद्य, शैलेश देशमुख, शादरुल सराफ, केतकी सराफ, नंदू काळे, धनंजय सरदेशपांडे, प्रेषित रुद्रवार, शीतल रुद्रवार, शोभा दांडगे, कमलेश महाजन, मुस्तजीब खान, शिव कदम, सुजाता देशमुख, योगिता तळेकर, रुपलक्ष्मी चौगुले, शरद कुलकर्णी, मिताली जगताप, विनीत भोंडे, रोहित देशमुख, माधुरी भारती, तेजस तुंगार, निशांत अंजनकर, रमाकांत भालेराव, विष्णू बोलवाणी, प्रवीण डाळींबकर, प्रकाश सुदर्शन, सुशांत जोशी.
गुणवत्तेला वाव मिळणे आवश्यक - नाटक, चित्रपट या क्षेत्राशी संबंधित असलेली अभिनयाव्यतिरिक्तची कामेही रोजगाराची साधने आहेत. आयटीनंतर रोजगार निर्मितीत मनोरंजन क्षेत्राचे नाव घेतले जाते. या साठी लागणार्‍या विविध बाबींचे शास्त्रोक्त प्रशिक्षण शहरातील नाट्यशास्त्र विभागात दिले जाते. यासाठीचे पदवी, पदव्युत्तर आणि विविध अभ्यासक्रम विभागात उपलब्ध आहेत. देशातील मोठय़ा नाट्यशास्त्र विभागांपैकी विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग आहे.’’ प्रा. डॉ. शशिकांत बर्‍हाणपूरकर, विभागप्रमुख नाट्यशास्त्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म. विद्यापीठ
औरंगाबादच्या विद्यार्थ्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर गुणवत्ता आहे. या गुणवत्तेला वाव मिळणे आवश्यक आहे. औरंगाबादेत प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वत:ला सिध्द करण्यासाठी मुंबईशिवाय पर्याय नाही. मराठवाड्यातील प्रेक्षकांनी प्रतिसाद दिल्यास स्थानिक कलावंतांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. विद्यार्थी परिपूर्ण होण्यासाठी ‘पेज टू स्टेज’, पथनाट्य विविध महोत्सव या माध्यमातून आम्ही प्रयत्न करीत आहोत.’’ प्रा. डॉ. किशोर शिरसाट, विभागप्रमुख, सरस्वती भुवन नाट्यशास्त्र विभाग
विद्यार्थ्यांसाठी शॉर्ट टर्म कोर्सेस - सध्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाकडे जाण्याचा विद्यार्थ्यांचा कल कमी आहे. त्यामुळे आम्ही शॉर्ट टर्म कोर्सेसवर भर दिला आहे. त्यात फिल्म मेकिंग, स्क्रीप्ट रायटिंग, डबिंग अशा अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. यामुळे मुंबई-पुण्याच्या नाट्य-चित्रपटसृष्टीत संघर्ष करणार्‍या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकते.’’ प्रा. डॉ. दिलीप घारे, विभागप्रमुख नाट्यशास्त्र विभाग, एमजीएम
कुठे मिळते नाट्यशास्त्राचे शिक्षण - देवगिरी महाविद्यालय, शिव छत्रपती महाविद्यालय, सरस्वती भुवन आणि देवगिरी महाविद्यालयात 12 वीच्या पुढील विद्यार्थ्यांसाठी पीसीसी हा अर्धवेळचा नाट्यशास्त्र अभ्यासक्रम शिकवला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग, एमजीएममध्ये नाट्यशास्त्र अभ्यासक्रम आहे.