आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साम, दाम, दंडाचा वापर!, बंडखोरी थाेपवण्यासाठी अिधकृत उमेदवारांची होतेय धावपळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या अपक्षांनी माघार घ्यावी यासाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विविध पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी प्रयत्न केले. तरीही अनेक अपक्ष मैदानात राहिलेच. आता या अपक्षांनी दुसऱ्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करावा यासाठी काही उमेदवार प्रयत्नशील आहेत. त्यासाठी साम दाम या नीतीचा वापर करण्यात येत असल्याचे चर्चा आहे.


काही वाॅर्डांत अपक्षांनी आपला पाठिंबा अमुक उमेदवाराला जाहीर केला असून त्या उमेदवारासोबत प्रचार करत ही मंडळी फिरताना दिसतात.


अमुक अपक्षाचा तमुक उमेदवाराला पाठिंबा, अशा आशयाच्या बातम्या काही वृत्तपत्रांतून प्रसिद्धही झाल्या आहेत. बेगमपुरा वाॅर्डात तर तीन अपक्षांनी अधिकृत पक्षाच्या उमेदवाराला जाहीररीत्या पाठिंबा दिल्याचे समोर आले. मतदानाला अजून १० दिवस शिल्लक असून या काळात अपक्षांचा जाहीर पाठिंबा मिळवण्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न होणार हे नक्की आहे. गतवेळी काही वाॅर्डांत तर मतदानाच्या दिवशी सकाळी काही अपक्षांनी अधिकृत उमेदवाराला पाठिंबा दिला होता. तशी पत्रके भल्या पहाटे दारोदार वाटण्यात आली होती.


आपल्याला किती मते मिळू शकतात, याचा अंदाज काही अपक्षांना येतो. तसा तो पक्षाच्या उमेदवारालाही असतो. त्यामुळे वॉर्डातील परिस्थितीचा अंदाज घेऊन त्या अपक्षाची मते कोणाकडे वळू शकतात, याचा अंदाज घेऊनच पाठिंबा घेतला जातो. असाच अंदाज घेण्याचे काम काही वाॅर्डांत सुरू, तर काही वाॅर्डांत ते पूर्णही झाले आहे. पाठिंबा दिलेला अपक्ष हा उमेदवारासोबत प्रचारासाठी फिरताना दिसतो. त्यामुळे पुढील ९-१० दिवसांत अनेक अपक्ष अधिकृत पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.


नातेवाईक, मित्रांची मदत
अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी नातेगोते, मित्र अशा मध्यस्थांची मदत घेतली जाते. शेवटच्या क्षणी प्रचाराचा खर्च वाढवण्यापेक्षा अपक्षाचा पाठिंबा घेतलेले चांगले, अशी उमेदवारांची अटकळ असल्याने साम, दाम नीती वापरून ही मंडळी स्वत:ची मते दुसऱ्याला द्या, असे सांगण्यास अपक्षांना भाग पाडत आहेत.