आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिढा धार्मिक स्थळे हटवण्याचा; मोहीम लांबण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रस्ते रुंदीकरणासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याच्या मोहिमेला कालच्या बैठकीत झालेला विरोध आणि कायदेशीर बाबी पाहता या मोहिमेला मुदतवाढ मिळवण्याच्या हालचाली मनपाने सुरू केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. तसे झाल्यास 27 तारखेपासून मोहीम सुरू होणार नाही. पण मुदतवाढीचा विषय न्यायालयात टिकू शकतो का, यावर मते आजमावली जात आहेत. जर नाही टिकला तर या मोहिमेचा कार्यक्रम तयार असावा यासाठी उद्या मनपाच्या अधिकार्‍यांची बैठक होत आहे. शिवाय दुपारी पोलिस आयुक्त व मनपा आयुक्तांची बैठक होणार असून त्यात अंतिम निर्णय होणे अपेक्षित आहे.

महाराष्र्ट् महापालिका अधिनियमानुसार महापालिकेला अनधिकृत बांधकामे निष्काषित करण्याचे अधिकार आहेत. या अधिकारांचा वापर करून कायद्याचे संरक्षण नसलेली आणि रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणारी अनधिकृत धार्मिक स्थळे टप्प्याटप्याने 31 मेपर्यंत काढून घ्यावीत, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. शहरातील 14 रस्त्यांवरील 41 अनधिकृत धार्मिक स्थळांचा रस्ता रुंदीकरणात अडथळा होत आहे.
न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मनपाच्या हातात आता अवघे सहाच दिवस उरले आहेत. पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी शनिवारी बोलावलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी विविध मुद्दे उपस्थित केले. राजकीय नेत्यांनी या धार्मिक स्थळांच्या कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घ्यावा अशी भूमिका घेतली. त्यामुळे या बाबींची तपासणी करण्यासाठी मनपाला वेळ लागेल. हिंदू व मुस्लिम अशा दोन्ही बाजूंकडून या मोहिमेला विरोध होत असला तरी न्यायालयाचा आदेश न पाळल्यास अवमान होऊ शकतो असाही धोका आहे. अशा स्थितीत उच्च न्यायालयात अर्ज करून कारवाईसाठी आणखी मुदत मागून घेण्याचा मनपाचा विचार आहे.