आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मकई गेट ते टाऊन हॉल दरम्यान 55 वर्षांच्या 100 मालमत्ता पाडल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मकई गेट ते टाऊन हॉल येथील 55 वष्रे जुन्या कष्टकर्‍यांच्या वसाहतीवर मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुलडोझर चालवला. शनिवारी सायंकाळी दोन इमारती पाडल्यानंतर सोमवारी (4 फेब्रुवारी) सात तास पाडापाडीची मोहीम सुरू होती. यात शंभर मालमत्ता भुईसपाट करण्यात आल्या. दिवसभरात 24 मीटरचा रस्ता मोकळा करण्यात आला.

सकाळी 11 वाजता दोन बुलडोझरने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. लहान मुले ओक्साबोक्शी रडत होती. अनेक वर्षांपासून राहत असलेले घर पडताना पाहून अनेकांनी अर्शूंना वाट मोकळी करून दिली. लहान मुले त्यांच्या पालकांना संसारोपयोगी वस्तू उचलण्यासाठी मदत करत होती. काम करता करता ‘बाबा, आता मी कोणत्या शाळेत जाणार?’ असा प्रश्न एका मुलाने त्याच्या पालकांना विचारल्याने त्यांचे डोळेही पाणावले. अनेक विस्थापितांना प्लॉट किंवा आर्थिक मदत मिळाली नसल्याने मनपा उपायुक्त शिवाजी झनझन यांच्याकडे अनेक जण मदतीसाठी विनवणी करत होते. मकई गेट ते टाऊन हॉल रस्ता रुंदीकरणातील 96 विस्थापितांना हसरूल येथील 216 गट नंबरमध्ये 20 बाय 30 चे प्लॉट देण्यात आले आहेत. 80 नवबौद्धांना प्रत्येकी 25 हजारांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. संसारोपयोगी साहित्य सुरक्षित स्थळी नेण्यासाठी येथील नागरिकांनी मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे एक दिवसाचा अवधी मागून घेतला होता. त्यामुळे अनेक जण स्वत: पुढाकार घेऊन वस्तू घेऊन जात होते. येथील अतिक्रमणांवर हातोडा चालवण्यासाठी मनपा प्रशासन एक वर्षापासून कारवाईच्या तयारीत होते, परंतु प्रत्यक्षात 2 फेब्रुवारीला या मोहिमेला सुरुवात झाली. हा रस्ता 80 फूट रुंद होणार आहे. मंगळवारी गुलशन महल ते जालना रोडपर्यंत मार्किंग केले जाईल. कारवाईच्या वेळी उपायुक्त शिवाजी झनझन, प्रशासकीय अधिकारी विठ्ठल डाके, प्रियंका केसरकर उपस्थित होते.