आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूखंड रिकामा करून सदुपयोग करा;खासदार खैरेंने केली अतिक्रमित जागेची पाहाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाटीतील डॉ. राजन महिंद्रा यांनी सिडकोतील मोकळ्या जागेवर केलेले अतिक्रमण तत्काळ काढा, असे मत खासदार चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केले. या जागेवर बाकडे टाका, खेळण्या बसवा आणि गणपती मंदिराची प्रतिष्ठापना करा, असा सल्ला त्यांनी सिडकोला दिला. दुसरीकडे सिडकोने लोकभावनेचा आदर करत ती ओपन स्पेस म्हणून जाहीर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. डीबी स्टारमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच खैरे यांनी रविवारी या जागेची पाहणी केली.

सिडको एन-5 मधील र्शीनगर कॉलनीतल्या मोकळ्या जागेवर घाटीतील डेंटल कॉलेजचे विभागप्रमुख डॉ. महिंद्रा यांनी तब्बल 30 वर्षांपासून अतिक्रमण केले आहे. यावर डीबी स्टारने 7 फेब्रुवारीच्या अंकात ‘डॉक्टरांचे अतिक्रमण, सिडकोची मलमपट्टी’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत खासदार खैरे यांनी रविवारी कॉलनीला भेट देऊन जागेची पाहणी केली. त्यांच्यासोबत सिडकोचे प्रशासक सुधाकर तेलंग, सूर्यवंशी, वॉर्डाच्या नगरसेविका रेखा जैस्वाल, नगरसेवक हुशारसिंग चव्हाण, बंडू ओक, नगरसेविका प्राजक्ता भाले, मुख्य प्रशासकीय अधिकारी शिवाजी झनझन, विठ्ठल डहाके यांची उपथिती होती.

जागा मोकळी करावीच लागेल : अतिक्रमण करून जागेवर कब्जा करणार्‍या डॉक्टर महिंद्रा यांनी चूक करून वेगळा राग आळवला. आपण या जागेवर 6-7 लाख रुपये खर्च केले असल्यामुळे ती आपल्यालाच मिळावी, असे ते म्हणाले; पण जागा ओपन स्पेस ठेवण्याचा कॉलनीच्या नागरिकांचा आग्रह आहे. सिडकोने प्रथमदर्शनी ही जागा सेलेबल असल्याचे सांगितले. त्यावर खैरे यांनी जागेचे आरक्षण कशाचे आहे? याचा विचार न करता लोकभावनेचा आदर करण्याची सूचना तेलंग यांना केली. 30 वर्षे सिडकोने प्लॉट विकला नाही. मग आताच हा घाट कशाला घालत आहात ? असा सवाल करत ही जागा ओपन स्पेस म्हणूनच जाहीर करा, असे निर्देश त्यांनी दिले. डॉक्टरांनी या जागेवर केलेला कब्जा अनधिकृत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत ही जागा त्यांना मोकळी करावीच लागेल, असेही त्यांनी ठासून सांगितले. तर मी माझ्या निधीतून या जागेवर खेळणी बसवून देईन, असे नगरसेविका रेखा जैस्वाल म्हणाल्या. डीबी स्टारमुळे आम्हाला बळ मिळाल्याचे येथील रहिवासी शिवाजी दांडगे यांनी सांगितले. याप्रसंगी कॉलनीतील सर्व नागरिक उपस्थित होते.

सिडकोची संशयास्पद भूमिका : सिडकोच्या जागेवर 30 वर्षे अतिक्रमण झालेले असताना विभागाने सोयीस्कर डोळेझाक केली. त्यानंतर डीबी स्टारने तपास सुरू केला असताना डॉ. महिंद्रा यांनी सात दिवसांत जागा आपल्या नावावर होणार असल्याचा दावा केला. आता सिडको ही सेलेबल लँड असल्याचे सांगत आहे. त्यामुळे ही जागा डॉक्टरच्या घशात घालण्याचा अधिकार्‍यांचा डाव दिसतो. जर ही जागा विक्रीयोग्य आहे तर तिचा लिलाव व्हायला हवा. अतिक्रमण केलेली जागा आपल्या मालकीची होणार असल्याचे महिंद्रा कशाच्या आधारावर सांगत आहेत, हा मोठा प्रश्न आहे.