आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेपरफुटी प्रकरणी कुलगुरूंचे पोलिस आयुक्तांना साकडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अभियांत्रिकीच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी स्ट्राँगरूममधील अस्थायी कर्मचार्‍यासह सात जणांना अटक केली. त्यांच्याकडून विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिकाही पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या त्रुटी सांगा, अशी विनंती कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांनी पोलिस आयुक्त संजयकुमार यांना केली आहे.
आरोपींना अटक केल्याबद्दल कुलगुरूंनी पाठवलेले पोलिस यंत्रणेचे आभार मानणारे दोनपानी पत्र आयुक्तांना शनिवारी मिळाले. त्यात म्हटले आहे की, या प्रकरणाचा तपास अजून सुरू असून, तपासादरम्यान पोलिसांना आढळलेल्या त्रुटी त्यांनी विद्यापीठाला कळवाव्यात. त्या त्रुटी दुरुस्त करण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासन करणार आहे. तसेच यापुढे अशा चुका होणार नाहीत याची खबरदारीदेखील घेतली जाईल. असे पत्र पहिल्यांदाच विद्यापीठाकडून पोलिस आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. दोन-तीन दिवसांत त्रुटींची माहिती कुलगुरूंना कळवली जाईल, असे ते म्हणाले.
अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचा गणित विषयाचा तृतीय सत्राचा पेपर फुटल्यानंतर विद्यापीठाचे उपकुलसचिव डी. एम. नेटके यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पेपरफुटी प्रकरणाचा तपास पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांनी परीक्षा विभाग नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण, नेटके आणि पेपर सेटर समितीचे अध्यक्ष डॉ. एम.डी. पाटील यांचे 28 मे रोजी जबाब नोंदवले. दुसर्‍या दिवशी स्ट्राँगरूममधील शिपाई, सहायक व कनिष्ठ लिपिक अशा 22 जणांना याच विषयाची प्रश्नपत्रिका लिहिण्यासाठी दिली. त्या आणि गणिताच्या प्रश्नपत्रिकेवरील हस्ताक्षर एकाच व्यक्तीचे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी सचिन राजू साळुंकेला अटक केली.