आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Ex Mayor Anita Ghodale Loss In Aurangabad Corporation Election

मिस्टर घोडेले जिंकले, मिसेस हरल्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - यंदाच्या मनपा निवडणुकीला जोडीने उतरणाऱ्या घोडेले दांपत्याला आनंद आणि दु:ख यांचा फिफ्टी-फिफ्टी अनुभव आला. नंदकुमार घोडेले जिंकले, पण त्यांच्या अर्धांगिनी पराभूत झाल्या. त्यामुळे मोजणी केंद्राबाहेर पडताना नंदकुमार घोडेले यांना आपल्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यापेक्षा पत्नीचे अश्रू पुसावे लागले. दुसरीकडे, आमदार संजय शिरसाट यांच्या पुत्राची राजकीय एंट्री विजयामुळे झाली. धक्कादायक निकालांत उपमहापौर संजय जोशी यांच्या पत्नीचा पराभव प्रमुख ठरला.
या मतमोजणी केंद्रावरील ११ पैकी ज्योतीनगर वेदांतनगर या दोन वाॅर्डांत बिनविरोध निवडणूक झाल्याने तेथे वाॅर्डांची मतमोजणी होती. सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. तासाभरात पोस्टल मतदानाची मोजणी झाली. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला. अधिकृत निकाल घोषित होण्याआधीच अनिता घोडेले डोळे पुसत बाहेर आल्या. त्यांचे पती नंदकुमार घोडेले त्यांची समजूत काढत होते.
आत मतमोजणीत अनिता घोडेले यांना पराभवाची चव चाखावी लागली होती, तर दुसरीकडे त्यांचे पती नंदकुमार घोडेले यांनी दणदणीत विजय मिळवला होता. हसू आणि अासू असे फिफ्टी-फिफ्टी अनुभव घेणारे हे जोडपे फारसे न बोलता निघून गेले. हाच प्रकार जनार्दन कांबळे विमल कांबळे या जोडप्याच्या बाबतीतही झाला. विमल कांबळे यांनी अनिता घोडेले यांना पराभूत केले, तर जनार्दन कांबळे यांना नंदकुमार घोडेले यांच्याकडून हार पत्करावी लागली. यानंतर पटापट निकाल यायला सुरुवात झाली. काही वेळातच भाजपचे नेते उपमहापौर संजय जोशी आणि त्यांच्या पत्नी स्वाती जोशी हताश चेहऱ्याने बाहेर पडले. पत्रकारांना पाहून त्यांनी हाताने इशारा करत खेळ संपल्याचे सांगितले बोलता काढता पाय घेतला.

यानंतर स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे, विकास जैन हे बन्सीलालनगरचे विजयी उमेदवार सिद्धांत शिरसाट यांना घेऊन बाहेर आले. तिघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. हे तिघे बाहेर गेले लगतच असलेल्या वाॅर्डात जाऊन जल्लोष सुरू झाला. काही वेळानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी आमदार संजय शिरसाट यांना सोबत घेत ते पुन्हा आले. या वेळी बोलताना आमदार संजय शिरसाट यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, माझ्या मुलाचा विजय हा त्याच्या राजकीय शाळेतील प्रवेश आहे. त्याला प्रवेश मिळाला आहे, आता चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळवणे हे त्याचे काम राहणार आहे.

जसजसा निकाल जाहीर होत होता, तसतसे पराभूत उमेदवार निराश चेहऱ्याने बाहेर पडत होते, तर विजयी उमेदवार प्रमाणपत्राची वाट पाहत होते. विजयाच्या बातम्या समजल्यानंतर बाहेर गुलालाची उधळण, घोषणाबाजी फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. यानंतर उमेदवार बाहेर येताच एकच जल्लोष झाला. माजी महापौर अनिता घोडेले यांचा पराभव झाला असला तरी नंदकुमार घोडेले यांचा विजय झाला.