आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रोग्रेस कार्डः तंटामुक्तीपासून शहर कोसो दूर, प्रायोगिक अभियानाला अपयश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महात्मा गांधी तंटामुक्त शहर अभियानांतर्गत 11 हजार 499 पैकी 424 तंटे मिटवण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. गृह मंत्रालयाने 18 मार्च 2012 पासून प्रायोगिक तत्त्वावर हे अभियान सुरू केले होते. वाळूज वगळता 11 पोलिस ठाण्यांतील गठित 157 वॉर्ड समित्यांनी हे तंटे मिटवले. मिटवलेल्या तंट्यांचे प्रमाण 3.8 टक्के आहे. मात्र, तरीही आढावा घेऊन राज्य शासनाला अहवाल सादर करू, असे पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी औरंगाबाद शहरात प्रायोगिक तत्त्वावर हे अभियान सुरू केले. येथे यशस्वी झाल्यास राज्यातील शहर पोलिसांच्या हद्दीतही हे अभियान सुरू करण्याचा गृहमंत्र्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने पोलिस आयुक्त संयजकुमार यांच्या मार्गदर्शनात मागील वर्षी हे अभियान सुरू झाले. तंटामुक्त शहर अभियानातील कार्यकारी समितीचे सदस्य सचिव तथा उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी अभियानाला चालना दिली. सर्व वॉर्ड समित्यांच्या वर्षभरात 108 बैठका झाल्या. त्यात 424 दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हे सामंजस्याने मिटवण्यात पोलिसांना यश आले आहे. अकरा ठाण्यांच्या हद्दीत 2201 गुन्हे दखलपात्र, तर 9298 गुन्हे अदखलपात्र स्वरूपाचे नोंदवले गेले. त्यापैकी 424 तंटे मिटवले गेल्यामुळे पोलिस विभागात चिंतेचे वातावरण आहे. सर्वाधिक 128 तंटे उस्मानपुरा पोलिसांनी मिटवले, तर सर्वात कमी म्हणजे केवळ तीन तंटे मिटवण्याची नामुष्की एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यावर आली आहे. क्रांती चौक पोलिस ठाण्याने 12 दखलपात्र तंटे मिटवले आहेत. साताराने 19, जवाहरनगर-16, मुकुंदवाडी-14, सिडको-13, जिन्सी-60, बेगमपुरा-61, छावणी-27, तर सिटी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 71 तंटे सामंजस्याने मिटवले आहेत.

लोकन्यायालये भरवून तंटे मिटवण्याचे काम

पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठित आहे. त्याशिवाय प्रत्येक ठाण्यात पोलिस निरीक्षकांच्या अध्यक्षतेत समिती निर्माण केली आहे. वॉर्ड अधिकारी, बीट अंमलदार, तंटामुक्त समितीचे तीन प्रतिनिधी, तीन महिला प्रतिनिधी, मागासवर्गीयांचे तीन प्रतिनिधी, स्वयंसेवा संस्था आणि पत्रकार यांचा समितीत समावेश आहे. या समितीने सहायक पोलिस आयुक्तांच्या उपस्थित लोकन्यायालये भरवून तंटे मिटवण्याचे काम सुरू केले आहे.

वॉर्ड समितीचे 28 सदस्य

प्रत्यक्षात तंटे मिटवण्यासाठी वॉर्ड समिती कार्यरत असून सर्वानुमते निवडलेल्या अध्यक्षाच्या नेतृत्वात 27 सदस्य आहेत. त्यामध्ये वॉर्डातील नगरसेवक, माजी सैनिक, निवृत्त न्यायाधीश, वकील, डॉक्टर, पदवीधारक मध्यस्थ, पत्रकार, निवृत्त पोलिस कर्मचारी, महिला बचत गटाचे प्रतिनिधी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, युवक, कामगार, औषधी दुकानदार, बीट जमादार यांच्यासह समाजाच्या सर्व स्तरातील सदस्यांच्या समावेशाने वॉर्ड समिती तयार झाली आहे. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिक, जातीय सलोखा, वाहतूक व्यवस्थापन, गृहनिर्माण संस्था, अवैध धंदे, रॅगिंग प्रतिबंधक, गर्दी नियंत्रण आणि व्यसनमुक्तीसह आठ उपसमित्याही आहेत.

कार्यकारी समिती सदस्य

पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेत पोलिस उपायुक्त घार्गे यांना सदस्य सचिव म्हणून नियुक्त केले आहे. त्याशिवाय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व पोलिस उपायुक्त, सहायक पोलिस आयुक्त, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त, जिल्हा सरकारी वकील, सहायक संचालक व सरकारी वकील, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, जिल्हा व्यसनमुक्ती अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी आणि मनपा आयुक्तांच्या प्रतिनिधींचा समितीत सदस्य म्हणून उपयोग केला जात आहे.