आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Gardian Minister Ramdas Kadam Special Interview

सेनेच्या वाघाने ओवेसींचे आव्हान स्वीकारले, हैदराबादला घेणार सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी गप्पा डावपेचांच्या सदरात त्यांची मते नोंदवली. संपादकीय सहकाऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारताना महापालिका निवडणुकीतील त्यांची भूमिका स्पष्ट केली.
बंडखोरांना थंड करणे, यावरच माझा भर असल्याचे सांगताना समांतर जलवाहिनी योजना, शहराचा विकास आणि शिवसेनेतील अंतर्गत राजकारण यावरही मते व्यक्त केली. आेवेसींचे आव्हान स्वीकारून हैदराबादला त्यांच्या घरासमोर सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले, या गप्पांचा तपशील असा...
श्रीकांत सराफ : शिवसेना व भाजपला बंडखोरांचा कितपत धोका आहे?
उत्तर : अहो, अनेक बंडोबा थंडोबा झाले आहेत. मी बंडखोरांवर नियंत्रणासाठीच इथे आलो आहे. जिथे जिथे बंडखोर आहेत तिथे तिथे मी सभा घेणार आहे. सभा घेणे, रॅली काढणे सुरूच केले आहे. प्रत्येक ठिकाणी लोकांना सांगतोय की युतीच्या अधिकृत उमेदवारालाच मतदान करा. त्यामुळे जे कोणी शिल्लक आहेत त्यांचेही डिपाॅझिट जाणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा.
संतोष देशमुख : पण बंडखोरी एवढी का झाली? काही पदाधिकाऱ्यांनाही तिकीट का मिळाले नाही?
उत्तर : तुम्ही लक्षात घ्या. महापालिकेच्या निवडणुकीत एका वॉर्डात तिकीट एकच असते आणि इच्छुक दहा दहा जण असतात. आम्ही कोणत्याही एकाला तिकीट दिले, तर तो उरलेल्या नऊ जणांवर अन्यायच असतो. आता याच प्रश्नात तुमचा जो दुसरा प्रश्न आहे की, पदाधिकाऱ्यांना तिकिटे का मिळाली नाहीत. मला तुम्ही नेमके कुणाबद्दल म्हणताय ते लक्षात आले. परंतु तुम्हाला असे सरसकट म्हणता येणार नाही. अहो, तुमच्या खैरेंच्या मुलाला आम्ही तिकीट दिलेच ना. आता त्याला का तिकीट दिले असे म्हणाल; पण खैरेंचा मुलगा म्हणून त्याची उमेदवारी कशी कापता येईल, शेवटी तो युवा सेनेचा जिल्ह्याचा पदाधिकारी आहे. त्यानेही पक्षासाठी काम केलेच आहे.

सतीश वैराळकर : पदाधिकाऱ्यांचे ठीक, पण तुम्ही सरकारच्या योजनेसारखा पती-पत्नी एकत्रीकरणाचा प्रकारही का केला?
उत्तर : हां. हां. तुम्ही असे फिरवून कुणाबद्दल बोलताय, हे मला लगेच लक्षात आले. बघा. आमच्या पक्षात पती-पत्नी असले आणि ते चांगले काम करणारे असतील, तर हरकत असायचे काहीच कारण नाही. उलट पती-पत्नी एकत्रीकरणाची सरकारची योजना आम्ही इकडेही अमलात आणली म्हणून तुम्ही आमचे अभिनंदनच करायला हवे. जे काम सरकारने करायला हवे ते आम्ही करतोय ना?

शेखर मगर : बंडखोरांना पक्षातूनच छुपा पाठिंबाही दिला जातोय?
उत्तर : मुळीच नाही. छुपा वगैरे कोणताही पाठिंबा दिलेला नाही. देणार नाही. पक्षाशी गद्दारी करणारे सूर्याजी पिसाळ आहेत ते. त्यांना धडा शिकवा असे आम्ही मतदारांना आवाहन केले आहे. मी काल भाजपच्या नेत्यांसोबतही बोललो आहे. चांगली चर्चा झाली, बरेच बंडोबा लवकरच थंड होतील. तुम्ही निकालानंतर पाहालच ते. पक्षापुढे कुणीही मोठा नाही.
महेश देशमुख : युतीच्या चर्चेत तुम्ही नव्हता..
उत्तर : मी वांद्र्याची निवडणूक आणि अधिवेशनात व्यग्र होतो, पण सगळी माहिती मला होती. मी आणि रावसाहेब दानवे तीन वेळा भेटलो. आम्ही दोघांनी वेळोवेळी सर्व मुद्द्यांवर चर्चा केली आहे.
रोशनी शिंपी : पण शिवसेनेला युती हवी होती, भाजप तयार नव्हता, असे चित्र होते
उत्तर : हे चूक आहे. त्यांना पण युती हवीच होती. मी सांगितले ना की दानवेंना तीन वेळा भेटलो. युती करायची आहे, असे त्यांनीही म्हटले होतेच. आमची सगळ्यांची तयारी होती. तसेच झाले.
मंदार जोशी : वरच्या पातळीवर झाली युती, पण खाली तसे दिसत नाही.
उत्तर : काय आहे खालच्या पातळीवर बऱ्याचदा मनोमिलन होत नाही, हे खरे आहे. कार्यकर्ते बरीच तयारी करत असतात. युती झाल्यामुळे काही जणांना धक्का बसतो. वाईटही वाटते, पण निर्णय झाला आहे. आता सगळ्यांनी एकत्रितपणे झटून काम करायचे आहे. ते आम्ही करतोय.
सतीश वैराळकर : शिवसेना-भाजप युतीला एमआयएमचा धोका वाटतो का?
उत्तर : एमआयएमचा मुळीच धोका नाही, पण ते विष कालवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या देशाची फाळणी धर्मावर आधारित होती. मग आता पुन्हा इथे कापून काढण्याची भाषा करणार असाल, तर ती सहन करणार नाही. आम्ही काही मेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही.
महेश रामदासी : एमआयएमने शिवसेनेला आव्हान दिले आहे...
उत्तर : होय. ही निवडणूक होऊ द्या. मी स्वत: हैदराबादला जाणार आहे. ओवेसीच्या घरासमोर सभा घेणार आहे. बघुयात मला कोण विरोध करतो ते?
प्रवीण ब्रह्मपूरकर : पाणीपट्टी वसुली ठेकेदार कंपनी करणार नाही, असे सांगूनही वसुली सुरूच आहे.
उत्तर : ही योजना सुरू व्हावी यासाठी मी प्रयत्न केले. दोन-तीन वेळा मीटिंग घेतली. लवकर काम सुरू करा, असे स्पष्ट बजावले, पण कंपनीचा मालक ऐकत नव्हता, तर उद्धव ठाकरे यांना सांगून त्याला काम सुरू करायला लावले. त्यांची एवढीच भूमिका त्यात होती. वसुलीचे म्हणाल, तर समांतरच्या कंपनीने वसुली करणे बेकायदा आहे. त्यामुळे मनपाला तसा ठराव करायला सांगून ती वसुली थांबवली. कुठे सुरू असेल, तर आचारसंहिता संपल्यावर त्यावरही निर्णय घेऊ. लोकांनी मुळीच काळजी करू नये.
शेखर मगर : पण काम कोठे सुरू झाले?
उत्तर : कोण म्हणतो सुरू झाले नाही? नऊ ठिकाणी कामे सुरू झाली आहेत. त्यालाही आता वेग येईल. निवडणुकीनंतर मी स्वत: त्यात लक्ष घालतो.
शेखर मगर : समांतर जलवाहिनीला आधी तुमचा विरोध होता, आता तुम्ही योजनेच्या बाजूने बोलत आहात, असा बदल कसा?
उत्तर : मी काय म्हणालो आणि त्याचा तुम्ही काय अर्थ काढला? माझा विरोध होता हे साफ चूक आहे. योजना झालीच पाहिजे, असे माझे ठाम मत आहे. कारण ही योजना झाली नाही तर शहराला पाणी मिळणार नाही. केंद्राची ती योजनाही आता बंद झाली आहे. त्यामुळे योजना रद्द झाली तर शहराला पैसा येणार नाही. पाण्याच्या योजनेसाठी ७०० कोटी रुपये देण्याची राज्य सरकारची ऐपत नाही. म्हणून आलेला पैसा परत गेला असता व नंतरचा निधीही आला नसता. एक दमडा मिळाला नसता.
संतोष देशमुख : पाणी दिल्यावर पाणीपट्टी वाढवायची असा करार असताना आताच पाणीपट्टी वाढवली जात आहे, याबाबत काय?
उत्तर : पाणीपट्टी कशी वाढली याची मी चौकशी लावणार आहे. काय गडबड झालीय ते बघतोय. मूळ करार वेगळा होता. त्यातील अटी वेगळ्या होत्या आणि आता जो करार पाहायला मिळतो. त्यात अटी बदलल्या आहेत.
सतीश वैराळकर : म्हणजे समांतरमध्ये मोठा घोळ झाला आहे?
उत्तर : एक सांगतो. ते कोण कांबळे आयुक्त होते. हर्षदीप कांबळे. त्यांनी बरीच गडबड करून ठेवली आहे. चंद्रकांत खैरेही माझ्याशी सहमत होतील. त्या कांबळेंची मी चौकशी लावणार आहे. आचारसंहिता संपताच तीन दिवसांत ही चौकशी सुरू होईल, हा रामदास कदमचा शब्द आहे.
शेखर मगर : मुळात नेत्यांमुळे हा सगळा पेच निर्माण झाला आहे का?
उत्तर : तुम्हाला खैरेंचे नाव घ्यायचे आहे का? पण मी तुम्हाला सांगतो यात खैरेंचा काहीही दोष नाही. एक मात्र खरे की मी ही योजना सुरू करून दाखवणार. नागरिकांना पाणी पुरवणार. हे करताना कोणताही भ्रष्टाचार सहन करणार नाही.
संतोष देशमुख : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणतात आधी हिंदुत्व मग विकास, भाजप म्हणते आधी विकास मग हिंदुत्व.
उत्तर : मी कालही विकासावरच बोललो. आजही तेच बोलतो. विकास हाच आमचा प्रमुख मुद्दा आहे. मी इथे पालकमंत्री म्हणून आल्यापासून तीन महिन्यांत विकासाचेच काम केले आहे. रस्त्यांसाठी निधी आणला, कामे सुरू झाली आहेत. पुलांचे काम जोरात सुरू आहे. मुक्तिसंग्राम संग्रहालयाला साडेपाच कोटी रुपये निधी देत काम पूर्ण केले. शहरात ५२ झोपडपट्ट्या आहेत. तेथे एसआरएसारखी योजना राबवण्याचा निर्णय घेतला. हजारो नागरिकांना मोफत फ्लॅट मिळणार आहेत. मग ते या दाढीवाल्याचे फोटो लावतील की नाही घरात? जलसुधार योजनेसाठी १० कोटी रुपये दिले, शौचालयांच्या योजनेला ९ कोटी रुपये दिले. सीसीटीव्हीसाठी १५ कोटी रुपयांचा निधी दिला. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेची हमी देऊ शकतो. ही सगळी विकासाचीच कामे आहेत ना!
शेखर मगर : निधी येतो, पण कामे दर्जेदार होत नाहीत त्याचे काय?
उत्तर : आता होणार. कामाचा दर्जा तपासण्याचे काम निश्चित होणार आहे. मी स्वत: दर तीन महिन्यांनी या रस्त्यांची तपासणी करणार आहे. त्यांचे नमुने पुण्याला तपासायला पाठवणार आहे. त्यात जर कुणी गडबड केल्याचे समोर आले, तर अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करायलाही मागेपुढे पाहणार नाही.
सतीश वैराळकर : मागच्या सरकारने शहरातील तीन पुलांसाठी पैसे दिले होते, पण मनपाने पाठपुरावाच केला नाही म्हणून काम झाले नाही.
उत्तर : साफ खोटे आहे हे. आघाडी सरकारने या शहराला कधी पैसेच दिले नाहीत. नुसत्या घोषणा केल्या. मी मंत्री झाल्यावर ते समोर आले. मग त्या त्या मंत्र्यांशी बोलून पैसा आणून दिला. हे तीन महिन्यांत केले आहे. आणखी निधी मी आणणार. तुम्ही निश्चिंत राहा हो.
महेश रामदासी : शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. सिटी बसेस मनपाने चालवल्या, पण नंतर बंदही करून टाकल्या. तुम्ही काय करणार?
उत्तर : अहो, हे कोणी मला बोललेच नाही. कुणी सांगेल तर लक्षात येईल ना. तुम्ही द्या मागणी लगेच काम मार्गी लावतो. रावतेंकडेच परिवहन मंत्रालय आहे. काही अडचण येणार नाही.
विद्या गावंडे : घाटीत एमआरआयच्या चाचण्यांचे दर कमी करा, असे आदेश तुम्ही दिले; पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. कधी होणार?
उत्तर : होईल ना. निर्णय झालाच आहे. वित्त मंत्रालयाकडे तो सध्या आहे. आम्ही निर्णय घेतला की त्या रकमेतील फरक डीपीडीसीतून आम्ही देऊ. इतर जिल्ह्यांनीही तसा निर्णय घ्यायला हवा. या निर्णयाची लवकरच त्याची अंमलबजावणी होईल.
प्रवीण ब्रह्मपूरकर : घाटीला आलेले ९ कोटी रुपये न खर्चता परत गेले.
उत्तर : ९ कोटी नाही, दीड कोटी रुपये आहेत ते; पण आता मी ३० कोटी रुपये दिले आहेत. कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती नेमली आहे. या निधीवर समिती नजर ठेवेल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, काय म्हणाले रामदास कदम...