आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad Garidian Minister Speak At Municipal Corporation

पालकमंत्र्यांच्या ‘भाईगिरी’चा आमदारांनाही बसला दणका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ‘जास्त बोलायचे नाही, ‘येस ऑर नो’ एवढ्या एकाच शब्दात उत्तर द्यायचे’ अशा शब्दात पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या पहिल्याच बैठकीत अधिकाऱ्यांना फटकारले अन् अख्खा अधिकारी वर्ग हादरला. केवळ अधिकारीच नव्हे तर कदम यांच्या भाईगिरीचा फटका जिल्ह्यातील आमदारांनाही बसला. कदम यांनी विरोधक आणि सत्ताधारी आमदारांचीही गय केली नाही.

‘मी म्हणेन तेव्हाच बोला’, ‘मला विषय समजला जास्तीचे बोलू नका’ अशी ताकीद ते वेळोवेळी आमदारांना देत राहिले. विशेष म्हणजे बैठक सोडून निघणाऱ्या आमदारांनाही त्यांनी थांबवले. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार, सुभाष झांबड यांनी बाहेर पडताना लघुशंकेला जातोय, अशी खूण केली. तेव्हा ‘मीही तुमच्यासोबतच येथे बसलो मलाही जायचे आहे, तेव्हा मी बैठक सोडून चाललो का’, असा सवाल केल्यानंतर सत्तार खुर्चीवर विराजमान झाले. बैठक सुरू झाली तेव्हा शिवसेना, भाजप काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार कदम यांना पालकमंत्री साहेब, मंत्रीसाहेब असे संबोधत होते. मात्र त्यांच्या काही शब्दांमुळे बैठकीनंतर ही मंडळी कदम यांना सर असे संबोधत होती. सत्तार, झांबड, भाऊसाहेब चिकटगावकर असो की, प्रशांत बंब, संदिपान भुमरे, अतुल सावे या मंडळींना त्यांनी वेळीच समज देत मुद्द्याचे काय ते बोला, असे वारंवार सांगितले. कदम यांच्या स्वभावाची कल्पना असल्यामुळे संजय शिरसाट यांनी दोनच मुद्दे ४० सेकंदातच मांडले. यावरून कदम यांची धास्ती किती होती, हे दिसून येते.

कदम यांनी सेनेला दिले झुकते माप
कदमयांनी बैठकीदरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सेनेलाच झुकते माप दिल्याचे समोर आले. भाजपचे आमदार तसेच पदाधिकारी बोलण्यास उभे राहिल्यास तुम्ही नंतर बोला असे सांगून थांबवण्यात आले. दुसरीकडे सेनेच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला बोलण्याची पूर्ण संधी देण्यात आली. सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथे यांना लोकप्रतिनिधीपेक्षा जास्त वेळ दिला, तर उपमहापौर संजय जोशी यांना दोन वेळा बोलण्यापासून रोखले. हा पक्षपात उपस्थितांच्या लगेच लक्षात आला, पण कुणीही आक्रमक पवित्रा घेतला नाही.

खैरे शेवटपर्यंत ‘खामोश’
आतापर्यंतच्याकोणत्याही बैठकीत खैरे सर्व सूत्रे स्वत:कडे घेतात, असा अनुभव आहे. मात्र, आज खैरे अडीच तास कमालीचे नि:शब्द होते. घाटी रुग्णालयातील उपकरण खरेदीच्या चौकशीत खैरे यांना नेमा, अशी मागणी सत्तार यांनी केल्यानंतर ‘मी नको, मला काम आहे’ एवढाच शब्द खैरे यांनी उच्चारला. त्यावर ‘खैरेंना दिल्ली सांभाळू द्या’ असे वाक्य कदम यांच्याकडून आले. त्यानंतर तर खैरे यांनी बोलण्याचा प्रयत्नही केला नाही. खैरे यांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी एवढी शांतता पाळलेली कदाचित पहिलीच बैठक असावी, असे त्यांच्यासोबत गेल्या दोन दशकांपासून राहणाऱ्या एका शिवसैनिकाने सांगितले.

महापौरांनाही केले गप्प
शहरातीलरस्ते विकासासाठी अमुक इतका निधी द्या, अशी मागणी महापौर कला ओझा यांनी केली. तेव्हा मी १४ कोटी रुपये आधीच जाहीर केले आहेत, असे कदम यांनी सांगितले. पण ओझा यांनी लिखित मागण्या वाचणे सुरू केले, तेव्हा मला जास्त बोलायला लावू नका. तुमच्यामुळेच कसे नुकसान होत आहे, याची मला कल्पना आहे, असे सांगताच महापौरांनी लिखित कागद बाजूला ठेवून, साहेब तुमचे आम्ही आभारी आहोत, असे सांगत बोलणे बंद केले.
‘मराठी येते ना मग बोला की’ : औरंगाबादमध्यचे आमदार इम्तियाज जलील यांनी शहराच्या विकास कामांबाबत वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले. त्यांनी हिंदीतून बोलण्यास सुरुवात केली. तेव्हा कदम यांनी त्यांना ‘तुम्हाला मराठी येत नाही का?’, असा प्रश्न केला. ‘हो मी बोलू शकतो’ असे उत्तर त्यांनी देताच, ‘मग मराठीतूनच बोला की’ असे त्यांनी सुचवले. त्यानंतर जलील यांनी मराठीतूनच बोलण्याचा प्रयत्न केला.