आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीन म्हणतात, कर्मचारी माझे ऐकत नाहीत !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कर्मचारी माझे ऐकत नाहीत. मुळात काम करण्याची इच्छाच नाही. सेवकही कमीच आहेत. समोर असेपर्यंत काम, पाठ केली की कामचुकारपणा ठरलेलाच. प्रत्येक काम डीनने समोर उभे राहून करून घेतले पाहिजे का? वॉर्डनला इन्सेंटिव्ह मिळत नसल्याने कुणी काम करण्यास इच्छुक नाही. वॉल, तोट्या, बेसिन बसवले तर विद्यार्थी तोडून टाकतात.. अशा शब्दांत घाटीचे अधिष्ठाता डॉ. के. एस. भोपळे यांनी वसतिगृहातील पाण्याच्या नासाडीबाबत उद्विग्नता व्यक्त केली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुलांच्या जुन्या वसतिगृहातून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने ‘कॉलनीची गरज भागेल एवढय़ा पाण्याची नासाडी’ या मथळ्याखाली सोमवारी (28 जानेवारी) प्रसिद्ध केले. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून वसतिगृहाचे हौद व नादुरुस्त तोट्यांमधून दररोज चार ते पाच हजार लिटर पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांनीच ‘दिव्य मराठी’च्या चमूला रविवारी दिली. विशेष म्हणजे पाणी कुणी बंद करायचे, या होस्टेलच्या कर्मचार्‍यांतील वादामुळे पाण्याची नासाडी होत असल्याची वस्तुस्थितीही यानिमित्ताने समोर आली. इमारतींच्या भिंतींमध्ये ओल गंभीररीत्या जिरल्याने तसेच वायरिंग सडल्याने रविवारी सकाळी नऊ-साडेनऊच्या सुमारास धोकादायक स्पार्किंग झाले. या एकूणच प्रश्नाबाबत अधिष्ठाता डॉ. भोपळे म्हणाले, मी जेव्हापासून अधिष्ठाता म्हणून रुजू झालो आहे, तेव्हापासून स्वत: अनेक वेळा होस्टेलमध्ये जाऊन अडचणी सोडवल्या आहेत. त्या वेळी होस्टेल हे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी योग्य नसल्याचे लक्षात येताच, अनेक दुरुस्त्या केल्या.

शंभरावर तोट्या बसवल्या. मात्र विद्यार्थी तोट्या तोडून टाकतात. हौद ओव्हरफ्लो होतो म्हणून वॉल बसािला; पण तोही विद्यार्थ्यांनी तोडून टाकला. सेवकांची संख्या कमीच आहे; शिवाय पाणी-टॉयलेटची जबाबदारी असणार्‍या सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या दोन जागाही रिक्त आहेत, तरीही होस्टेलचा प्रश्न तातडीने सोडवण्याचा प्रयत्न आहे. सर्वच वसतिगृहांच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव संचालकांना पाठवण्यात आल्याचे अधिष्ठाता म्हणाले.

पाण्याच्या नासाडीचे चित्र जैसे थे !

पाहणीदरम्यान सोमवारीही हौदातून पाण्याची नासाडी झाल्याचे स्पष्ट झाले. किमान तीन-चार नादुरुस्त तोट्यांमधून पाण्याची गळती सुरूच असल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे अधिष्ठातांनी वसतिगृहास भेट दिल्याने वसतिगृहाची वरवर का असेना, थोडीफार स्वच्छता केल्याचेही आवर्जून लक्षात आले. बहुतेक ठिकाणी नेहमीचेच चित्र होते.

नुकसानीबाबत दोन्हींकडून आरोप
तोट्या, बेसिन, इलेक्ट्रिक बोर्ड आदी साहित्याचे विद्यार्थ्यांनीच नुकसान केले, असे अधिष्ठातांसह प्रशासनाकडून सांगण्यात येते, तर आम्ही हे नुकसान केले नसल्याचे विद्यार्थी म्हणतात. तोट्यांसह अनेक साहित्याची, मोबाइल, दुचाकींची वसतिगृहातून चोरी होते, असेही विद्यार्थी म्हणतात.