आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटी प्रकरण. डॉक्टरांच्या कोडगेपणाची होणार चौकशी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एचआयव्हीबाधित आणि कर्करोगाने जर्जर असलेल्या महिला रुग्णाला उपचारासाठी दाखल करून न घेता घाटीच्या डॉक्टरांनी तिला रात्रभर बारा तास थंडीत रस्त्यावर कुडकुडत ठेवले. या महिलेचा मंगळवारी रात्री मृत्यू झाला. घाटीच्या डॉक्टरांनी दाखवलेल्या कोडगेपणाची घाटी प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून अत्यवस्थ महिलेला दिलेल्या निर्दयी वागणुकीची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी तीन ज्येष्ठ डॉक्टरांची समिती नेमण्यात आली आहे.

‘घाटीच्या डॉक्टरांची माणुसकी मेली !’ या मथळय़ाखालील वृत्त ‘दिव्य मराठी’ने बुधवारी (23 जानेवारी) प्रसिद्ध करताच घाटी प्रशासनाने तातडीने पावले उचलत चौकशी समिती नेमली असून, दोषींवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

लोणी (नगर) येथील प्रवरा रुग्णालयातून संबंधित महिलेला उपचारासाठी घाटीत पाठवले होते. महिलेच्या नातेवाइकांनी तिला तातडीने सोमवारी मध्यरात्री दोन वाजता घाटीत आणले. मात्र, तिचे केसपेपर बघून तिला अपघात विभागात दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. माणुसकी हरवलेल्या कर्मचार्‍यांनी तिला बाहेर काढले. नाइलाजाने या रुग्णाला रस्त्यावर बोचर्‍या थंडीत रात्र काढावी लागली. एवढय़ावरच तिचे दुष्टचक्र संपले नाही तर दुसर्‍या दिवशी (22 जानेवारी )सकाळी तिला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये व पुन्हा हॉस्पिटलमधून घाटीत, अशी अर्धा दिवस टोलवाटोलवी सुरूच होती. तिला दुपारी एक वाजेपर्यंत दाखल करून घेतले नव्हते.

‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने हस्तक्षेप केल्यानंतर तिच्या तपासण्यांना सुरुवात झाली. शस्त्रक्रिया करून उपयोग होणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर नातेवाईकांनी गावाची वाट धरली. वाटेत असतानाच काळाने तिच्यावर झडप घातली. रात्री तिचा मृत्यू झाला.

‘कॉलेज कौन्सिल’मध्ये सूचना
गंभीर महिला रुग्ण दगावल्याचा प्रकार चव्हाट्यावर आल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या कॉलेज कौन्सिलच्या बैठकीत या रुग्णांना ‘अँटमिट’ करून घेण्याबाबत सूचना देण्यात आली. गंभीर रुग्णांना दाखल करून तातडीचे उपचार करणे, त्यानंतर संबंधित विभागाच्या डॉक्टरांना कळविणे व पुढील उपचारासाठी सर्व विभागप्रमुखांना अधिष्ठातांनी सूचना दिली असे डॉ. गट्टाणी यांनी सांगितले.

समिती करणार चौकशी
घाटीतील डॉक्टरांच्या कोडगेपणावर आसूड ओढणारे वृत्त प्रसिद्ध होताच उपअधिष्ठाता व अँनॉटॉमी विभागप्रमुख डॉ. छाया दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर, विकृतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजन बिंदू व वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एल. गट्टाणी यांचा समावेश आहे. समिती आठवड्यात आपला अहवाल देईल व दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे डॉ. गट्टाणी यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.